कुमारी मातांच्या प्रश्नांबाबत संवेदनशीलता ठेवा - जिल्हाधिकारी डॉ. देशमुख

यवतमाळ, दि. 20 : कुमारी माता ह्या कुटुंबाचाच एक भाग आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी सर्व विभाग आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन काम केले तर चांगल्या उपाययोजना होऊ शकतात. त्यामुळे कुमारी मातांच्या प्रश्नांकडे गांभिर्याने बघून त्यांच्याबाबत संवेदनशीलता ठेवा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी  केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात महिला व बालविकास विभागातर्फे कुमारी मातांची सद्यस्थिती व उपाययोजनाया विषयावर आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अरुणा खंडाळकर, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले,जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकरी ठमके, झरी-जामणी पंचायत समितीच्या सभापती लता आत्राम, महिला व बालविकास अधिकारी व्ही. एस. पवार उपस्थित होते.
            कुमारी मातांच्या प्रश्नांवर उपाययोजना सुचविण्यासाठी मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे आज ही बैठक आयोजित करण्यात आली आहे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, या प्रश्नांवर नागरिकांनी सुचविलेल्या सुचना अतिशय महत्वाच्या आहेत. या प्रश्नासंदर्भात शासनाच्या विविध विभागाच्या योजनांची अंमलबजावणी होत आहे. त्या अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागांचा समन्वय असणे गरजेचे आहे. केवळ शासनाच्या इष्टांकपुर्तीचा उद्देश न ठेवता या प्रश्नाकडे अतिशय संवेदनशीलतेने लक्ष द्यावे. या प्रश्नासंदर्भात सर्वसमावेशक आरोग्य तपासणी, कौशल्य विकासाचे कार्यक्रम, शबरी आदिवासी घरकुल योजना आदी कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण कुमारी मातांना लाभ मिळवून देऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक विभागाने वेगवेगळे काम करण्यापेक्षा एकत्रित आणि समन्वय ठेवून काम केले तर त्याचा नक्कीच फायदा होईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.
            यावेळी याचिकाकर्ते रविंद्र तळपे, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) विशाल जाधव, डॉ. लिला भेले आदींनी मार्गदर्शक सुचना आणि उपाययोजना सुचविल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला व बालविकास अधिकारी व्ही.एस.पवार यांनी तर संचालन रवी आडे यांनी केले. यावेळी एकात्मिक आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी इवनाथे, डाखोरे, संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
                                                               0000000000 

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी