विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही - पालकमंत्री मदन येरावार

Ø अमृत योजनेंतर्गत पाण्याची टाकी आणि पाईप लाईनचे भुमिपूजन

यवतमाळ, दि. 14 : केंद्र आणि राज्यात विकास करणारे सरकार आहे. पिण्याचे पाणी, रस्ते, घर, विद्युत आदी नागरिकांच्या मुलभूत सुविधा आहेत. या सुविधा जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यवतमाळमध्येही मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरु असून यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
भोसा येथे 9.5 लक्ष लीटर क्षमता असलेली पाण्याची टाकी आणि 35 किमी लांबीच्या पाईप लाईनच्या भुमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे तर मंचावर जि.प. समाजकल्याण सभापती प्रज्ञा भुमकाळे, नगरसेवक प्रवीण प्रजापती, माया शेरे, रिता घावतोडे, संगिता कासार, विजय खडसे, पुष्पा ब्राम्हणकर, जीवन प्राधिकरणचे बेले, बोरकर उपस्थित होते.
जनतेच्या पैशातूनच हा विकास होत आहे, असे सांगून पालकमंत्री येरावार म्हणाले, शहर आणि लगतच्या ग्रामपंचायतीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी चापडोह धरण मंजूर करून घेतले. 69 कोटी रुपयांची ही पहिली योजना आहे. शहरासोबतच लगतच्या ग्रामपंचायतीतील नागरिकांनासुध्दा पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे, याकरीता अमृत योजनेच्या निकषाप्रमाणे नगर पालिका हद्दिचा विस्तार केला. या भागातील रस्त्यासाठी आतापर्यंत 19 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. बाभुळगाव तालुक्यातील बेंबळा येथून अमृत योजनेंतर्गत नागरिकांना 24 तास सात दिवस पाणी मिळणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या योजनेत करण्यात येत आहे. 
पाणी हेच जीवन आहे. पिण्याच्या पाण्याचं महत्व सर्वांनी ओळखले पाहिजे. 2022 पर्यंत सर्वांना घरे देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. सबका साथ, सबका विकास हाच केंद्र आणि राज्य शासनाचा नारा आहे. यवतमाळ मध्ये 100  एकर लँडबँकमध्ये पंतप्रधान आवास योजना करण्यात येईल. या भागातील रस्ते, बगीचे, खेळाची मैदाने, हायमास्ट लाईट आदींसाठी 38 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. 185 कोटी रुपयांची अंडरग्राऊंड ड्रेनेजची योजना सुरु असून उमरसरा, भोसा हा पहिला झोन यात समाविष्ट केला आहे. आपल्या दारापर्यंत विकास पोहविण्याचा शासनाचा मानस आहे. अमृत योजना ही मार्च 2019 पर्यंत पूर्ण होणार असून नागरिकांना मुबलक पिण्याचे पाणी मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक प्रवीण प्रजापती यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांनीसुध्दा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मिलिंद कासार, सतीश विश्वकर्मा, मंगेश ब्राम्हणकर यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                            0000000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी