जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेतील पदे रिक्त राहणार नाही - पालकमंत्री मदन येरावार

बेलोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण
यवतमाळ, दि. 3 : नागरिकांच्या दृष्टिने सक्षम आरोग्य यंत्रणा महत्वाची असते. यवतमाळ जिल्ह्यात वैद्यकीय अधिका-यांच्या रिक्त जागा भरण्याचे अधिकार प्रथमच जिल्हाधिका-यांना देण्यात आले आहे. त्यानुसार वैद्यकीय अधिका-यांच्या स्थानिक पातळीवर मुलाखती घेणे सुरु आहे. या मुलाखतीसाठी विदर्भ आणि मराठवाड्यातील डॉक्टर्स येत आहेत. जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेतील एकही पद रिक्त राहणार नाही, याकडे आपण विशेष लक्ष देऊ, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
यवतमाळ तालुक्यातील बेलोरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. बांधकाम व अर्थ सभापती निमिष मानकर, शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनी दरणे, समाजकल्याण सभापती प्रज्ञा भुमकाळे, पंचायत समितीचे सभापती एकनाथ तुमकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. जी. चव्हाण, बेलोराच्या सरपंच कल्पना नेवारे उपस्थित होत्या.
बेलोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे नियोजनबध्द आणि उत्कृष्ट काम केल्याचे सांगून पालकमंत्री येरावार म्हणाले, वस्तुनिष्ठ आधारीत अशी ही सुंदर इमारत येथे उभारण्यात आली आहे. दशरथ गुघाणे आणि मारोतराव भारती यांनी सर्वात प्रथम 1970 च्या दशकात लोकवर्गणीतून या प्राथमिक आरोग्य केंद्राकरीता अर्थसहाय्य केले. या सामाजिक बांधिलकीचा गावातील नागरिकांनी आदर करावा. आज त्याच इमारतीचे लोकार्पण करण्याची संधी मला मिळाली, याचा मला आनंद आहे. सुदृढ भारत, बलवान भारत, स्वच्छ भारत पंतप्रधानांचे स्वप्न आहे. त्यामुळे या इमारतीचे पावित्र्य राखा. सर्वसामान्य जनतेला सुविधा देणारे हे केंद्र आहे. वैद्यकीय अधिका-यांच्या नियमित मुलाखती घेणे सुरु आहे. येथील रिक्त जागांचा प्रश्न लवकरच निकाली काढला जाईल. आरोग्य विभागात आता ऑनलाईन सेवा मिळत आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्यात आला आहे. बेलोरामध्येसुध्दा या सुविधा उपलब्ध होतील. डिजीटल हेल्थ क्लिनिकच्या माध्यमातून बंगलुरु, मुंबई येथील डॉक्टरांना स्थानिक रुग्णांची माहिती होईल. जिल्ह्यातील दहा प्राथमिक आरोग्य केंद्र ऑनलाईन करण्यावर आपला भर आहे.
ऑप्टीक फायबर केबलच्या माध्यमातून प्रत्येक गाव जोडण्यात येणार आहे. यवतमाळमध्ये 150 कोटी रुपये खर्च करून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्यात येत असून त्याचे काम पुर्णत्वाकडे आहे. एम.एस, एम.डी असे अभ्यासक्रम तेथे राहतील. महात्मा फुले जीवनदायी योजना, राजीव गांधी जीवनदायी योजनेमध्ये 500 ते 600 आजारांचा समावेश केला असून जिल्ह्यात आरोग्य शिबिराच्या माध्यमातून 85 हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच नेत्र शिबिरातून 25 हजार रुग्णांना चश्मांचे वाटप करण्यात आले आहे. नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहिले तरच देश बलवान होईल. सुदृढ शरीर निरोगी मनाला जन्म देते. निरोगी मन निकोप विचारांना जन्म देते आणि निकोप विचार हा देशाला समृध्दीकडे घेऊन जातो. भारताची अर्थव्यवस्था ही शेतीप्रधान आहे. शासनाने शेतक-यांसाठी कर्जमाफी योजना आणली. कर्जमाफीचा लाभ मिळणा-या सर्व शेतक-यांचा डाटा तयार झाला पाहिजे. हा जनतेचा पैसा आहे. या पैशाचा लाभ गरजू शेतक-यांना मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यात थोडाफार त्रास होत असला तरी योग्य लाभार्थ्यांना योग्य मोबदला मिळणे हा शासनाचा हेतु आहे. जिल्ह्यात 3 लक्ष 14 हजार शेतक-यांना कर्जमाफी मिळणार आहे. त्याचा शेतक-यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा परिषद, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत भवन आदींसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. यवतमाळला अग्रेसर करण्यासाठी रस्ते, टेक्सटाईल, इमारती आदी विकास कामांसाठी 1 हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. 2022 पर्यंत एकही व्यक्ति घरापासून वंचित राहणार नाही. त्यासाठी पंतप्रधान आवास योजना, घरकुल योजना, रमाई आवास, शबरी आदिवासी घरकुल योजना आदींच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे पालकमंत्री येरावार यांनी सांगितले. तत्पूर्वी पालकमंत्र्यांनी संपर्ण प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली.
यावेळी बोलताना कार्यक्रमाच्या अध्यक्षा माधुरी आडे म्हणाल्या, बेलोरामध्ये सक्षमपणे आरोग्य सेवा मिळेल. जनसेवा हीच इश्वरसेवा मानून अधिका-यांनी काम करावे. प्रामाणिकपणे काम करून ग्रामीण जनतेला तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध होईल, यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचा-यांनी प्रयत्न करावे.
मान्यवरांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्रथम अर्थसहाय्य करणा-या दशरथ गुघाणे यांच्यावतीने जयंत गुघाणे आणि लता गुघाणे यांचा तसेच मारोतराव भारती यांचा सत्कार करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे विक्रांत शिरभाते, सुनील खडसे आणि कंत्राटदार तुकाराम जाधव यांचासुध्दा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिध्दार्थ मानकर यांनी केले. संचालन सहायक अभियंता विलास चावरे यांनी तर आभार सुनील खडसे यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य सचिन राठोड, कविता इंगळे, रेणु शिंदे, पंचायत समिती उपसभापती गजानन पाटील, बेलोराच्या उपसरपंचा रुपाली मडावी, पंचायत समिती सदस्य कांता कांबळे, कार्यकारी अभियंता आनंद राजुस्कर, अंकूर साहित्य संघाच्या अध्यक्षा विद्या खडसे, जिजाऊ फाऊंडेशनच्या सचिव सुवर्णा खात्रे, उपाध्यक्षा दिपा दुधाणे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                                            000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी