एकही बालक व गरोदर माता लसीकरणापासून वंचित राहू नये - जिल्हाधिकारी डॉ. देशमुख

यवतमाळ, दि. 27 : आरोग्य विभागाच्यावतीने जिल्ह्यात इंद्रधनुष्य ही विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. लसीकरणापासून वंचित असलेली शुन्य ते दोन वर्षे वयोगटातील बालके आणि गरोदर माता यांच्यासाठी ही विशेष मोहीम आहे. त्यामुळे या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील एकही बालक व गरोदर माता लसीकरणापासून वंचित राहू नये, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात मिशन इंद्रधनुष्य संदर्भात आयोजित जिल्हा सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे समन्वयक डॉ. एस.आर. ठोसर, इंडियन मेडीकल असोसिएशन यवतमाळ शाखेचे अध्यक्ष डॉ. स्वप्नील मानकर, बालरोग तज्ज्ञ डॉ. संजीव जोशी, डॉ. पी. एस. चव्हाण, डॉ. मनोज तगडपल्लीवार, डॉ. एस.एस. ढोले उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, मिशन इंद्रधनुष्य गांभिर्याने राबविणे गरजेचे आहे. यात सहभागी होणा-या इतरही विभागांनी आपापल्या जबाबदा-या काळजीपूर्वक पार पाडाव्यात. तसेच कोणत्या विभागाचे कोणते काम आहे, त्याचा नियमित फॉलो-अप आरोग्य विभागाने घ्यावा. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात दैनंदिन वैद्यकीय नोंदी ठेवणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील गरोदर माता आणि बालके यांनी या मोहिमेंतर्गत लसीकरण करून प्रशासन व आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यातील 43 प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच 83 उपकेंद्रांतर्गत 146 क्षेत्रात मिशन इंद्रधनुष्य मोहीम राबविण्यात येणार आहे. यादरम्यान जवळपास 1.15 लक्ष गृह भेटीद्वारे सर्वेक्षण करून वंचित बालके आणि गरोदर माता यांना लसीकरण करण्यात येईल. ऑक्टोबर 2017 ते जानेवारी 2018 या चार महिन्यात प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला संबंधितांना बीसीजी, ओपीव्ही, आयपीव्ही, पेन्टाव्हॅलेन्ट, डीपीटी, जेई, व्हिटॅमीन – ए यासारख्या लसींचा डोस देण्यात येणार आहे.
यावेळी डॉ. ढोले यांनी मिशन इंद्रधनुष्य बद्दल सादरीकरण केले. बैठकीला डॉ. साहू, डी.एम. रावते, डॉ. मनश्री भुयार, डॉ. मनोज सक्तेपार, श्रीमती तिरपुडे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
                                                000000000
वृत्त क्र.914
फवारणीसंदर्भात शेतक-यांना फिल्डवर मार्गदर्शन करा
    - जिल्हाधिकारी डॉ. देशमुख
यवतमाळ, दि. 27 : पिकांवर किटकनाशकांची फवारणी करतांना शेतकरी आणि शेतमजूरांना विषबाधा झाल्याची प्रकरणे निदर्शनास येत आहे. ही विषबाधा टाळण्यासाठी तसेच दुर्घटना घडू नये, यासाठी कृषी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचा-यांनी तात्काळ फिल्डवर जाऊन शेतक-यांना फवारणीसंदर्भात मार्गदर्शन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
किटकनाशक फवारणी संदर्भात घ्यावयाची काळजी याबाबत कृषी विभागाने जनजागृती अभियान राबवावे. प्रत्येक गावात तात्काळ दवंडी देऊन शेतक-यांना अवगत करावे. तसेच मार्गदर्शक सुचनांची घडीपत्रिका, पोस्टर्स गावागावात वाटावे. गावपातळीवर शेतकरी, शेतमजूरांची तातडीने सभा घेऊन किटकनाशके वापरासंदर्भात आवश्यक दक्षता घेण्याबाबत प्रात्यक्षिक स्वरुपात माहिती देऊन मार्गदर्शन करावे. यावेळी ग्रामस्तरीय सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचा सहभाग अनिवार्य करावा. तसेच सभेसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनासुध्दा आमंत्रित करावे. प्रत्येक गावात कृषी वार्ता फलकावर संदेश द्यावा. ग्रामपंचायत आणि ग्रामसभेमध्ये याबाबत माहिती द्यावी अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या आहेत.
                                                      000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी