अत्याधुनिक सभागृहातून जिल्ह्याच्या विकासाची दिशा ठरावी - पालकमंत्री मदन येरावार

प्रशासकीय इमारतीमध्ये नियोजन समितीच्या सभागृहाचे उद्घाटन

यवतमाळ, दि. 15 : जिल्हा नियोजन समिती ही जिल्ह्याच्या विकासासाठी अतिशय महत्वाचा घटक आहे. या समितीची निवडणूक नुकतीच सर्वानुमते पार पडली. जिल्ह्याच्या विकासासंदर्भात शासन, निवडून आलेले नवीन लोकप्रतिनिधी आणि जिल्ह्याचे प्रशासन या अत्याधुनिक सभागृहात निर्णय घेणार आहेत. 27 लक्ष 72 हजार लोकसंख्या असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या विकासाची दिशा या सभागृहात ठरावी, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या प्रशासकीय इमारतीतील नियोजन समितीच्या सभागृहाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, महसूल राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री संजय राठोड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, राळेगावचे आमदार डॉ. अशोक उईके, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता शशीकांत सोनटक्के उपस्थित होते.
या सभागृहाचे रितसर उद्घाटन झाले असे घोषित करून पालकमंत्री येरावार म्हणाले, आज संपूर्ण देशात भारतरत्न डॉ. विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस अभियंता दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून बांधकामाचा अतिशय उत्कृष्ट नमुना जिल्ह्याच्या विकासासाठी सुपुर्द केला आहे. जिल्ह्याचा विकास होण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी नियोजन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्ह्याचा विकास आराखडा 477 कोटी रुपयांचा असून संपूर्ण जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचविण्यासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्नशील आहे. आपला जिल्हा अग्रणी ठेवण्याकरीता तसेच उपेक्षित माणसांचे प्रश्न सोडविण्याला सर्वांचेच प्राधान्य आहे. विदर्भ-मराठवाड्यात यावर्षी पाऊस कमी झाला. यवतमाळ जिल्ह्यासाठी पाण्याचे नियोजन करतांना 14 व्या वित्त आयोगातून पाणी पुरवठा योजनेला प्राधान्य दिले आहे. पालकमंत्री म्हणून पाणी टंचाईचा आढावा नियमित घेणे सुरु आहे. आलेल्या संकटावर सर्व मिळून मात करू तसेच यातूनसुध्दा मार्ग काढण्यात सर्वांचे योगदान मिळेल, असा मला विश्वास आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी ओळख पुसण्यासाठी शासन, प्रशासन प्रयत्न करीत आहे. शेतक-याला वीज, युवकांच्या हाताला काम, शेतक-यांच्या मालाला दाम देण्यासाठी अनेक उपक्रम शासनाच्या वतीने सुरु करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्गाचे जाळे, समृध्दी मार्ग, वर्धा-यवतमाळ- नांदेड रेल्वे मार्ग जिल्ह्याच्या विकासासाठी द्योतक ठरणार आहे. त्यामुळे चांगल्या सभागृहाच्या माध्यमातून चांगला विचार करून लोकांच्या जीवनात आमुलाग्र बदल होईल, असा विश्वास आहे. हे सभागृह केवळ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या बैठकीसाठी नाही तर हे जनतेच्या विकासाचे सभागृह आहे, असे पालकमंत्री येरावार म्हणाले. आजपासून स्वच्छता पंधरवाड्याला सुरुवात झाली. या इमारतीचा भागही सर्वांनी स्वच्छ ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.  
विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे म्हणाले, जिल्ह्याच्या विकासासाठी ही अत्यंत महत्वाची वास्तु आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन जिल्ह्याचे महत्वाचे निर्णय स्थानिक पातळीवरच होण्यासाठी नियोजन समितीचे महत्व आहे. या सभागृहातून जिल्ह्याच्या विकासाचे उत्तम नियोजन व्हावे. जिल्ह्याच्या समस्या मोठ्या असून आणखी विकासाभिमुख बनविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून शेतक-यांच्या आत्महत्या कमी करण्यात यश मिळाले असले तरी शेतक-यांसाठी आणखी भरीव उपाययोजना करणे गरजेचे आहे. पिण्याच्या पाण्यासंदर्भात तात्काळ उपाययोजना करा. भविष्यात अनेक बाबींच्या चर्चा या सभागृहात होईल. ही चर्चा जिल्ह्याच्या विकासाकरीता उपयुक्त ठरेल, असे ठाकरे यांनी सांगितले.
यावेळी महसूल राज्यमंत्री राठोड म्हणाले, नियोजन विभाग जिल्ह्याचा विकासाचा केंद्रबिंदू आहे. बांधकाम, नियोजन आणि महसूल विभागाने अतिशय सुंदर सभागृह उभे केले. जिल्ह्याच्या अनेक प्रश्नांवर या सभागृहात चर्चा होऊन ते सोडविले जातील. नियोजन यंत्रणा जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन करीत असते. भविष्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर होणार आहे. प्रशासनाने आतापासून याबाबत नियोजन करावे. पाण्यासाठी अतिरिक्त्‍ निधी देण्यासंदर्भात उपाययोजना कराव्यात. जेणेकरून येत्या उन्हाळ्यात लोकांना त्याची झळ बसणार नाही. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनीसुध्दा मनोगत व्यक्त केले.
तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते फित कापून या सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. सभागृहाच्या बांधकामात महत्वाचे योगदान देणारे प्रवीण कुलकर्णी, प्रदीप तंबाके, एस.बी. ताकसांडे, नांदेड  येथील कंत्राटदार कृष्णा एंटरप्रायझेस, इन्फोटकेचे राम संगम, कार्यकारी अभियंता सी.यु. मेहेत्रे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिक्षक अभियंता शशिकांत सोनटक्के यांनी केले. आभार मेहेत्रे यांनी मानले. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, संदीप महाजन, एनआयसीचे राजेश देवते, जिल्हा पुरवठा अधिकारी भराडी यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी अधिकारी उपस्थित होते.
                                                          00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी