फुटबॉलच्या प्रोत्साहनासाठी आमदार चषक सुरू करणार - पालकमंत्री मदन येरावार

जिल्ह्यातमिशन फुटबॉल 1 मिलीयन कार्यक्रमाचे उद्घाटन

यवतमाळ, दि. 15 : फुटबॉलचा 17 वर्षाखालील विश्वचषक यावेळेस प्रथमच भारतात होत आहे. त्यामुळे देशात फुटबॉल फिवर आहे. यवतमाळच्या फुटबॉलचा इतिहाससुध्दा गौरवशाली आहे. वर्षानुवर्षे फ्रेन्डस क्लबच्या माध्यमातून यवतमाळकरांनी तो अनुभवला आहे. या खेळाला जिल्ह्यात आणखी  प्रोत्साहन मिळावे, यासाठी आमदार चषक सुरु करण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री मदन येरावार यांनी केली.
महाराष्ट्र फुटबॉल मिशन -1 मिलीयन अंतर्गत येथील जवाहरलाल नेहरू जिल्हा क्रीडा संकूलावर आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, दादाजी कोंडदेव क्रीडा पुरस्कार प्राप्त डॉ. उल्हास नंदूरकर, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये उपस्थित होते.
पालकमंत्री येरावार म्हणाले, जगात लोकप्रिय असलेल्या या खेळाचा ज्वर आपल्या देशात आणि राज्यात दिसून येत आहे. फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन (फिफा) च्या माध्यमातून हा विश्वचषक भारतात होत आहे. आपल्या राज्यात मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडीयमवर 6 सामने आयोजित आहे. राज्याने फुटबॉल मिशन 1 मिलीयन हा उपक्रम हाती घेतला आहे. आयुष्य निरोगी, निकोप आणि सुदृढ ठेवायचे असेल तर  जीवनात खेळ आवश्यक आहे. स्पर्धेच्या युगात आपण केवळ व्हॉट्स ॲप, फेसबुक, इंटरनेट आदींवर जास्त लक्ष केंद्रीत करतो. मैदानी खेळापासून आजचा युवक दूर जात आहे. आयुष्यासाठी खेळाचे महत्व अनन्यसाधारण आहे. आपल्यातील खेळाडू वृत्ती प्रत्येकाने ओळखावी, असे आवाहन त्यांनी केले. 
यावेळी संजय आणि साहिल या आपल्या दोन्ही मुलांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉलसाठी घडविणारे भालेराव यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक यांनी मैदानावर जाऊन फुटबॉलचा आनंद घेतला. तत्पूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते फुटबॉल स्पर्धेनिमित्त ध्वजारोहण करून क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. खेळांमध्ये उत्कृष्ट योगदान देणारे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त स्व. पातालबंसी सर, स्व. रामदास दरणे, जिल्हा क्रीडा संघटक स्व. रमाकांत कौशिक, राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू स्व. संजय देशमुख आणि स्व. कुंदन यादव यांना उपस्थितांच्या वतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये यांनी तर आभार मनोज येंडे यांनी मानले. यावेळी सचिंद्र मिलमिले, जितेंद्र सातपुते यांच्यासह विविध क्रीडा संघटनेचे पदाधिकारी, शारीरिक शिक्षक आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                                00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी