निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर वाहनातून 10.80 लक्ष रोख रक्कम जप्त



यवतमाळ, दि. 17 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर आंतरजिल्हा नाकेबंदी अंतर्गत वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. चंद्रपूर –यवतमाळ दरम्यान वणी-कोपरणा मार्गावर तपासणी सुरू असतांना वाहनात 10 लक्ष 80 हजार रुपये आढळून आले. याबाबत विचारणा केली असता कुठलेही कायदेशीर कागदपत्रे नसल्यामुळे ही रक्कम सदर पथकाने जप्त केली आहे.
            13 - चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने 76 – वणी विधानसभा मतदारसंघामध्ये शिरपूर येथील पोलिस पेट्रोलिंग पथक वणी ते कोपरणा राज्य मार्गावर रात्री 10.30 वाजता (दि.16) वाहनांची तपासणी करीत होते. आबई बसस्थानकाच्या परिसरात होंडा ॲसेट वाहन क्रमांक एम.एच.34 – बी.एफ. 8022 संशयित वाहन आढळल्यामुळे पोलिस पथकाने वाहनास थांबविले. तपासणी दरम्यान सदर वाहनात रोख रक्कम असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिस विभागामार्फत भरारी पथकाला पाचारण करण्यात आले. सदर वाहन शिरपूर येथील पोलिस स्टेशनमध्ये आणल्यावर त्याची तपासणी करण्यात आली.
            या वाहनाचे मालक कोपरणा तालुक्यातील हेटी येथील रहिवासी आशिष विधाते व त्यांच्यासोबत असलेल्या सचिन गिरसावळे यांच्याकडे पांढ-या रंगाच्या पिशवीत 10 लक्ष 80 हजार एवढी रोख रक्कम आढळून आली. या रकमेबाबत दोघांनाही विचारणा केली असता सदर रक्कम कोपरणा तालुक्यातील पारंबा येथील वैभव जिनींग येथे नेत असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु रकमेबाबत कुठलेही कायदेशीर कागदपत्र नसल्यामुळे सदर रक्कम जप्त करण्यात आली असून मारेगाव येथील कोषागार कार्यालयात सुरक्षित ठेवण्यात आली आहे.  ही कारवाई भरारी पथक प्रमुख एन.व्ही. बांगडे, मंडळ अधिकारी रासा यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी