जिल्ह्यात 3 हजार 465 व्हीव्हीपॅट उपलब्ध


जनजागृती अंतर्गत एक लाखाच्या वर व्हीव्हीपॅटमध्ये प्रात्यक्षिकाद्वारे मतदान
यवतमाळ, दि. 14 : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पारदर्शी मतदान प्रक्रिया होण्यासाठी प्रथमच व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरीफायबल पेपर ऑडीट ट्रायल) चा वापर करण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात 3465 व्हीव्हीपॅट उपलब्ध झाले असून 5754 बॅलेट युनीट आणि 3346 कंट्रोल युनीट प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात व्हीव्हीपॅट जनजागृती अंतर्गत 1 लक्ष 13 हजार 492 नागरिकांनी प्रात्यक्षिकाद्वारे मतदान केले असून दिलेल्या मताची व्हीव्हीपॅटद्वारे खात्री केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात एकूण 2491 मतदान केंद्र आहेत. तर 14 – यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदार संघात 2181 मतदान केंद्र आहेत. त्यानुसार जिल्ह्यासाठी 5480 बॅलेट युनीट आवश्यक असतांना 5754 बॅलेट युनीट प्राप्त झाले आहेत. तसेच 3114 कंट्रोल युनीटची आवश्यकता असतांना 3346 कंट्रोल युनीट तर 3363 व्हीव्हीपॅटच्या आवश्यकतेपेक्षा 3465 व्हीव्हीपॅट उपलब्ध झाले आहेत. निवडणुका पारदर्शी होण्याकरीता व मतदाराने दिलेले मत याची खात्री करण्याकरीता जिल्हा प्रशासनाच्या वतीने व्हीव्हीपॅटबाबत नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम प्रत्येक मतदान केंद्रावर तसेच विविध शाळा महाविद्यालये, जिल्हा परिषद सभागृह, तालुका स्तरावरील कार्यालये आदी ठिकाणी पार पडली. या अंतर्गत दोन टप्प्यांमध्ये संपूर्ण जिल्ह्यात आतापर्यंत 1 लक्ष 28 हजार 735 नागरिकांना व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यात पहिल्या टप्प्यात 1 लक्ष 5 हजार 740 तर दुस-या टप्प्यात 22 हजार 995 नागरिकांचा समावेश होता. व्हीव्हीपॅट जनजागृती अंतर्गत पहिल्या टप्प्यात 91 हजार 859 नागरिकांनी तर दुस-या टप्प्यात 21 हजार 633 नागरिकांनी अशा एकूण 1 लक्ष 13 हजार 492 नागरिकांनी मतदान करून व्हीव्हीपॅटद्वारे दिलेल्या मतांची खात्री केली आहे. यासाठी दोन्ही टप्प्यात एकूण 174 अधिकारी व कर्मचा-यांनी नागरिकांना प्रात्यक्षिक करून दाखविले.
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट : आगामी लोकसभा निवडणुकीत एम-3 या ईव्हीएम मशीनचा वापर करण्यात येणार आहे. मशीन सुरू केल्यानंतर तारीख आणि वेळ योग्य दाखविली तर मशीन योग्य आहे. एम-3 या मशीनमध्ये जास्तीत जास्त 2 हजार मते नोंदविता येतील. तर व्हीव्हीपॅट म्हणजे एक प्रिंटर असून मतदाराने कोणाला मत दिले हे त्याला कळणार आहे. यासाठी थर्मल पेपरवरील 56 बाय 99 मिमी लांबीची स्लीप बाहेर येईल. ती सात सेकंद मतदाराला बघता येणार आहे. त्यानंतर ती कट होऊन बॅलेट स्लीप बॉक्स मध्ये जमा होईल. एका मशीनमधून जवळपास 1200 ते 1400 स्लीप निघणार आहे.
००००००००



Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी