प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण




यवतमाळ, दि. 05 : असंघटीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांना नियमित पेंशन मिळावी या उद्देशाने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचे जिल्हास्तरीय लोकार्पण बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दुर्योधन चव्हाण, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव आदी उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, बांधकाम कामगार तसेच असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत. कामगारांना पेंशन मिळावी, या उद्देशाने सरकारने ही योजना सुरु केली आहे. देशाच्या पंतप्रधानांनी ‘श्रममेव जयते’ हा नारा दिला आहे. कामगारांच्या भरोश्यावर देशाची प्रगती अवलंबून असून विकासात त्यांचे मोठे योगदान आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. तसेच प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेसाठी नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरूपात प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचे कार्ड वाटप करण्यात आले.
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेंतर्गत कामगारांचे पेंशन खाते असणार आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खातेदाराला वेगळा पेंशन नंबर दिला जाईल. भारत सरकार व एलआयसी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना अंमलात आली आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आधारकार्ड व बँक पासबुक आवश्यक असून 18 ते 40  वयोगटातील नागरिक यात सहभागी होऊ शकतील. ज्यांचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांच्या खाली आहे व ज्यांचे एनपीएस किंवा ईपीएफओ खाते नाही, असे  सर्व या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेंतर्गत वयोमानानुसार हप्ता राहील. ज्यांचे वय कमी त्याला कमी व जास्त वयाच्या नागरिकांना जास्त हप्ता राहणार आहे. सीएससी पोर्टलवरून नोंदणी करता येणार असून खातेदाराचा पहिला मासिक हप्ता हा आपल्या सीएससी पोर्टलवरूनच जाईल, याची नोंद घ्यावी. नोंदणी करून झाल्यावर एक फॉर्म तयार होऊन त्याची प्रिंटआऊट काढावी. या फॉर्मवर स्वत:ची स्वाक्षरी करून तो परत अपलोड करणे गरजेचे आहे. अपलोड केल्यानंतर त्या नागरिकाचे पेंशन अकाऊंट नंबरसहीत पेंशन अकाऊंट कार्ड तयार होईल. खातेधारक मासिक जेवढा हप्ता आपल्या अकाऊंटला भरेल तेवढाच हप्ता भारत सरकार महिन्याला त्या खातेदाराच्या खात्यावर भरणार आहे. वयाच्या 60 वर्षानंतर मासिक मानधन तीन हजार रूपये चालू होतील. कोणत्याही कारणाने संबंधीत खातेदाराचा मृत्यू झाल्यास त्याचा वारसदार ही योजना पूढे चालू ठेवू शकतो.
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी