निवडणुकीसाठी जिल्ह्यात 7827 शाईच्या बाटल्या



v प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय वाटप
यवतमाळ, दि. 30 : निवडणूक प्रक्रियेमध्ये शाईचे अनन्यसाधारण महत्व आहे. बोटावर लावलेली मतदानाची शाई, ही लोकशाही प्रक्रियेत सामान्य मतदारांचा सहभाग दर्शविते. जिल्ह्यात एकूण मतदारांची संख्या 21 लक्ष 28 हजार 163 आहे. मतदान करणा-या नागरिकांच्या बोटावर लावण्यासाठी जिल्ह्यात 7827 शाईच्या बाटल्या प्राप्त झाल्या आहेत. यापैकी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय त्याचे वाटप करण्यात आले आहे.
सुरवातीच्या काळात मतपत्रिकेवर मारण्यात येणा-या ‘फुली’ साठी इंकपॅड व त्याची शाई लागत होती. आता मतपत्रिकेची जागा ईव्हीएमने घेतल्यामुळे इंकपॅड व शाईची बचत झाली आहे. मात्र बोटावर लावण्यात येणा-या शाईचे महत्व अबाधित आहे. मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य असो की लोकप्रतिनिधी अथवा सेलिब्रिटींकडून शाई लावलेल्या डाव्या हाताची तर्जनी अभिमानाने दाखविली जाते. लोकशाही मजबूत करणारा हा काळा ठिपका निवडणुकांचा अविभाज्य घटक बनला आहे.
येत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी राज्यात सुमारे 3 लाख शाईच्या बाटल्या लागणार आहे. हाच आकडा जिल्ह्यासाठी 7827 असून त्या प्राप्त झाल्या आहेत. यापैकी 7600 बाटल्यांचे विधानसभा मतदारसंघनिहाय वाटप झाले आहे. यात वणी विधानसभा मतदारसंघात 1000 शाईच्या बाटल्या, राळेगाव 1030, यवतमाळ 1250, दिग्रस 1160, आर्णि 1120, पुसद 1000 आणि उमरखेड विधानसभा मतदारसंघासाठी  1040 अशा एकूण 7600 शाईच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले आहे.
साधारणत: एका बाटलीमध्ये 700 मतदारांच्या बोटाला शाई लावण्यात येणार आहे. जिल्ह्यात 2491 मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी 1000 ते 1200 मतदार आहेत. त्यानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर दोन शाईच्या बाटल्या देण्यात येईल. तर तिसरी बाटली राखीव म्हणून क्षेत्रीय अधिका-यांकडे राहणार आहे. मतदारांच्या तर्जनीवर लावण्यात येणारी आणि काही दिवस न पुसली जाणारी ही शाई म्हैसूर पेंटस् कंपनीमार्फत बनवली आहे.
मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या तर्जनीवर न पुसली जाणारी शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. मतदानापूर्वी पोलींग ऑफीसर मतदाराच्या डाव्या तर्जनीवर शाई लावलेली नाही, याची तपासणी करतात. जी व्यक्ती डाव्या तर्जनीची तपासणी करू देत नाही ते मतदानासाठी अपात्र असल्याचे मतदान अधिकारी सांगू शकतात. जर एखाद्या मतदाराला डाव्या हाताची तर्जनी नसेल तर त्या व्यक्तीच्या डाव्या हातावरील कोणत्याही बोटाला शाई लावली जाते.
०००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी