निवडणूक प्रक्रिया लोकाभिमुख होण्यासाठी विविध ‘ॲप’


पीडब्ल्यूडी, सी-व्हिजील, सुगम, सुविधा, समाधानच्या माध्यमातून होणार समन्वय
यवतमाळ, दि. 15 : आगामी लोकसभा निवडणूक पारदर्शीपणे पार पडण्यासाठी निवडणूक आयोग विविध डीजीटल ॲपचा वापर करणार आहे. निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी ‘सी-व्हिजील’ (c-Vigil) हे नवे मोबाईल ॲप तर दिव्यांग मतदारांच्या मदतीसाठी ‘पीडब्ल्यूडी’ हे ॲप तयार करण्यात आले आहे. यासोबतच सुगम, सुविधा आणि समाधानच्या माध्यमातून प्रशासन, उमेदवार आणि मतदारांमध्ये समन्वय होण्यास मदत होणार आहे.
निवडणूक प्रक्रिया अधिक लोकाभिमुख होण्यासाठी आयोगाने यावेळी प्रथमच ‘टेक्नोसॅव्ही’ उपाय अंमलात आणले आहेत. निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास ‘सी-व्हिजील’ ॲपच्या माध्यमातून नागरिकांना थेट ऑनलाईन तक्रार करता येणार आहे. ‘सी- व्हिजील’ ॲपचा वापर निवडणूक अधिसूचनेच्या तारखेपासून मतदानाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत केला जाऊ शकतो. तक्रारीचे छायाचित्र अथवा व्हीडिओ पुरावा म्हणून थेट अपलोड करण्याची यात सुविधा आहे. कॅमेरा, इंटरनेट कनेक्शन आणि जीपीएस सुविधा असलेल्या अँड्रॉइड स्मार्टफोनद्वारे या ॲपच्या माध्यमातून तक्रार करता येईल. आदर्श आचारसंहिता भंग होत असल्याचे वाटल्यास नागरिकाने त्या घटनेचे छायाचित्र अथवा 2 ते 3 मिनिटांचा व्हीडिओ रेकॉर्ड करावा. जीपीएस प्रणालीद्वारे स्वयंचलित स्थान मॅपिंगसह फोटो अथवा व्हीडिओ या ॲपवर अपलोड करावा. त्यानंतर तक्रारदार नागरिकाच्या मोबाईलवर एक युनिक आयडी प्राप्त होईल. ॲप वापरकर्त्यास ‘सी –व्हिजिल’ ॲपद्वारे आपली ओळख लपवून तक्रार नोंदविण्याचा पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये मोबाईल नंबर आणि इतर व्यक्तिगत तपशील ॲप प्रणालीवर पाठवले जात नाहीत. त्यामुळे निनावी तक्रारीच्या बाबतीत तक्रारकर्त्यास पुढील संदेश मिळत नाहीत. मात्र त्याच्या तक्रारीवर कारवाई केली जाते.  
तक्रार अपलोड केल्यापासून 100 मिनिटांच्या आत तक्रारीचा निपटारा करण्यात येणार आहे. तसा संदेश तक्रारकर्त्याच्या मोबाइलवर प्राप्त होईल. मतदारांना पैसा, मद्य, अंमली पदार्थांचे वाटप करणे, शस्त्रसाठा अथवा शस्त्रवापर, मतदारांना मारहाण, दमबाजी, चिथावणीखोर भाषण, पेड न्यूज,फेकन्यूज, मतदारांना आमिष म्हणून वस्तूंचा वापर, मतदान केंद्रापर्यंत मतदारांची मोफत वाहतूक, उमेदवाराची मालमत्ता आदी विविध प्रकारच्या आचारसंहिता उल्लंघनाच्या प्रकरणात ‘सी –व्हिजिल’ मोबाईल ॲपवर तक्रार करता येईल.
दिव्यांग मतदारांची नोंदणी, मतदान केंद्राचा शोध, व्हील चेअरची मागणी इत्यादी सोयी उपलब्ध करून घेण्यासाठी ‘पीडब्ल्यूडी’ हे ॲप उपलब्ध आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत ‘1950’ या क्रमांकाचा टोल-फ्री दूरध्वनी सुरू करण्यात आला आहे. ‘समाधान’ ही सुविधा 1950 या टोल-फ्री क्रमांकावर उपलब्ध आहे. निवडणुकीसंदर्भातील अडचणी, मतदार यादीची माहिती, यासोबतच मतदारांच्या तक्रारींची दखल या माध्यमातून घेण्यात येणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाने ‘सुविधा’ नावाने वेब पोर्टल व मोबाईल ॲप सुरू केले आहे. याद्वारे उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरणे, वाहन परवानगी, सभा/मिरवणुका व मतगणनेबाबत माहिती निवडणूक लढविणा-या उमेदवारांना तसेच राजकीय पक्षांना या पोर्टल व ॲपद्वारे उपलब्ध होणार आहे.
याशिवाय नागरिकांनी तक्रारी नोंदविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या https://eci.nic.in या मुख्य संकेतस्थळाचा वापर करता येईल. 1800111950 तसेच  1950  या टोल फ्री क्रमांकावरही संपर्क साधता येईल.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी