जिल्ह्यात निवडणूक प्रक्रियेसाठी 20 हजारांवर मनुष्यबळ


यवतमाळ, दि. 20 : 22 -  निवडणूक प्रक्रिया म्हटली की पुरेसे मनुष्यबळ हा महत्वाचा विषय असतो. आचारसंहिता लागण्यापूर्वी तीन-चार महिन्यांपासून प्रशासनाची तयारी सुरू असते. मतमोजणीपर्यंत ही सर्व प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्याची संपूर्ण जबाबदारी मनुष्यबळाच्याच आधारे केली जाते. येत्या 11 एप्रिल रोजी 14 – यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे. या प्रक्रियेसाठी जिल्ह्यात जवळपास 20 हजारांच्यावर अधिकारी – कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
            संक्षिप्त मतदार याद्यांचा पुन:रिक्षण कार्यक्रमापासून जिल्हा प्रशासनाची निवडणुकीची तयारी सुरू होते. यात मतदार याद्या अद्ययावत करणे, नवीन मतदारांची नोंदणी, मयत तसेच स्थलांतरीत मतदारांची नावे वगळणे, अधिकारी व कर्मचा-यांचे प्रशिक्षण आदी कामांचा समावेश असतो. सद्यस्थितीत निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्ह्यात 19 हजार 839 अधिकारी व कर्मचा-यांची प्रत्यक्ष मदत घेण्यात आली आहे. याव्यतिरिक्त इतरही निवडणूक विषयक कामे करण्यासाठी वेगवेगळ्या टिमचे गठण करण्यात आले आहे.  पोलिस विभागाच्या जवळपास साडेचार हजार अधिकारी व कर्मचा-यांवर निवडणुकीची जबाबदारी आहे. यात मतदान केंद्रांची सुरक्षा, जिल्ह्याची सीमाबंदी / नाकाबंदी, वाहनांची तपासणी, ईव्हीएम स्ट्राँग रुम आदींची सुरक्षा तसेच प्रतिबंधात्मक कारवायांचा समावेश आहे.
            जिल्ह्यात एकूण 2491 मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर चार याप्रमाणे कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या केंद्रांवर मतदान केंद्राध्यक्ष म्हणून 3207 अधिकारी, मतदान अधिकारी म्हणून 3185 तर मतदान अधिकारी 2 व 3 म्हणून 8947 असे एकूण 15 हजार 339 अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती झाली आहे. यापैकी 6392 कर्मचा-यांचे निवडणूक विषयक प्रशिक्षण पूर्ण झाले असून उर्वरीत अधिकार व कर्मचा-यांचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे.
याशिवाय फिरते पथकाच्या 24 टीम असून यात 150 कर्मचारी, स्टॅटिक सर्व्हेलंन्ससाठी 24 टीम 120 कर्मचारी, व्हिडीओ सर्वेक्षण पथकाच्या 24 टीम 48 कर्मचारी, व्हीडीओ पाहणी पथकाच्या 8 टीम 24 कर्मचारी आणि खर्च तपासणी पथकाचे जवळपास 75 कर्मचारी अतिरिक्त आहेत.
यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघात एकूण 2181 मतदान केंद्र आहेत. यासाठी एकूण 200 क्षेत्रीय अधिका-यांची नेमणूक करण्यात आली असून 10 हजार 905 अधिकारी – कर्मचारी उपलब्ध आहेत. यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघात 29 स्थिर सर्व्हेक्षण पथक, 18 व्हीडीओ सर्व्हेक्षण पथक, 16 व्हीडीओ पाहणी पथक, 24 भरारी पथक, 14 अकांऊंटीग टीम, सात सहाय्यक खर्च नियंत्रक कार्यान्वित करण्यात आले आहेत. 
०००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी