सायफळ येथे वाहनातून सहा लाख रुपये जप्त, मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद


यवतमाळ, दि. 28 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. सायफळ (ता. घाटंजी) येथे वनविभाग चेक पोस्टवर नाकाबंदी दरम्यान बोलेरो पिकअप वाहनाची तपासणी करीत असतांना सहा लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
सारकणी कडून येणारी बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एमएच 26 – एडी 5154 सायफळ येथील वनविभागाच्या चेक पोस्टवर तपासणीकरीता थांबविण्यात आली. यावेळी वाहनात एका पॉलेथिनमध्ये नगदी रोकड दिसून आली. याबाबत चालक प्रवीण मेश्राम (रा. दवाखाना उमरी, ता. केळापूर) याला विचारणा केली असता सदर रक्कम मालक विक्की उर्फ मनोज सिंघानिया यांची असून सारकणी येथील बनाणी सेठ यांच्याकडून लोखंडाच्या वसुलीची आणल्याचे सांगितले. मात्र याबाबत चालकाने कुठलाही कागदोपत्री पुरावा सादर केला नाही. वाहनातून मिळालेल्या रकमेमध्ये दोन हजार रुपयांच्या 107 नोटा (2 लक्ष 14 हजार रुपये), 500 रुपयांच्या 160 नोटा (80 हजार रुपये), 200 रुपयांच्या 455 नोटा (91 हजार रुपये), 100 रुपयांच्या 2100 नोटा (2 लक्ष 10 हजार रुपये), 50 रुपयांच्या 100 नोटा (5 हजार रुपये) असे एकूण 6 लक्ष रुपये जप्त करण्यात आले.
रकमेबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा नसल्यामुळे कलम 102 सीआरपीसीप्रमाणे जप्त करण्यात आली आहे. सदर बाब निवडणूक आयोग, आयकर विभाग, जिल्हा निवडणूक समिती यांच्याकडून खात्री करून योग्य कार्यवाही करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात घाटंजी येथील उप-कोषागार कार्यालयात ठेवण्यात आली आहे. सदर कारवाई पोलिस हेडकाँस्टेबल सुनील कुडमेथे, शिपाई सागर केराम आणि एसएसटी टीममधील महसूल विभागाचे मंडळ निरीक्षक बेलसरे व तलाठी लढे, सुखदेवे, मंडळ अधिकारी नाईक आदींनी केली.
तसेच स्थिर सर्वेक्षण पथकाने केळापूर तालुक्यातील पिंपळखुटी चेकपोस्टवर 12 लक्ष 2 हजार 520 रुपयांचे साहित्य (इनोव्हा कार व बिअर बॉक्स) जप्त केला आहे.
०००००००
यवतमाळ, दि. 28 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या मतदानाच्या दिवशी म्हणजे 11 एप्रिल रोजी आठवडी बाजार बंद ठेवण्यास पणन संचालनालय यांनी परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी मार्केट ॲन्ड फेअर ॲक्ट 1862 च्या कलम 5 (अ) नुसार गुरुवार दि. 11 एप्रिल रोजी जिल्ह्यातील वणी (76), राळेगाव (77), यवतमाळ (78), दिग्रस (79), आर्णि (80) व पुसद (81) या विधानसभा मतदार संघातील समाविष्ठ गावांमध्ये भरविण्यात येणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सदर आठवडी बाजार अन्य दिवशी भरविण्यास हरकत नाही, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी