दिव्यांग मतदारांसाठी विविध सुविधा


v मतदान केंद्रावर व्हीलचेअर व रॅम्पची व्यवस्था
v तक्रारीकरीता ‘पीडब्ल्यूडी’ मोबाईल ॲप उपलब्ध
      यवतमाळ, दि. 24 : निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांसाठी सुलभ निवडणुका(Accessible Elections) हे घोषवाक्य निश्चित केले आहे. त्या अनुषंगाने दिव्यांग मतदारांना आगामी लोकसभा निवडणूक अधिक सुलभ होणार आहे. गरज असेल त्या मतदान केंद्रावर व्हीलचेअर उपलब्ध करून देण्याचे नियोजन असून प्रत्येक केंद्रावर रॅम्पची सुविधा राहणार आहे. तसेच दिव्यांग मतदारांसाठी तक्रारीकरीता ‘पीडब्ल्यूडी’ मोबाईल ॲप सुरू करण्यात आले आहे.
राज्यात दिव्यांग मतदारांची संख्या 2 लाख 24 हजार 162 इतकी आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात दिव्यांग मतदारांची एकूण संख्या 4781 एवढी आहे. तर 14 – यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात हा आकडा 6562 आहे. यात अंधत्व किंवा कमी दृष्टी असलेले, मूकबधीर, शारीरिक अपंगत्व असलेले व इतर अक्षमता असलेल्या दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या 34 – वाशिम मतदारसंघात 1686 दिव्यांग मतदार, 35 – कारंजा मतदारसंघात 1515 दिव्यांग मतदार, 77 – राळेगाव मतदारसंघात 992 मतदार, 78 – यवतमाळ मतदारसंघात 540 मतदार, 79 – दिग्रस मतदारसंघात 1530 आणि 81 – पुसद विधानसभा मतदारसंघात 299 असे एकूण 6 हजार 562 दिव्यांग मतदार आहेत.  याशिवाय हिंगोली लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या 82 – उमरखेड विधानसभा मतदारसंघात 286 आणि चंद्रपूर लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील 76 – वणी मतदारसंघात 566 आणि 80 - आर्णि विधानसभा मतदारसंघात 568 दिव्यांग मतदार आहेत.
दिव्यांगांना मतदानाकडे आकर्षित करण्यासाठी तसेच त्यांच्यासाठी मतदान प्रक्रिया अधिकाधिक सुलभ व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाने यावर्षी पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यात 3 डिसेंबर 2018 रोजी दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. जिल्हा प्रशासन व दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था यांच्या सहाय्याने यंदा दिव्यांग मतदारांची विशेष नोंदणी मोहीम राबविण्यात आली. अपंगांना मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश निवडणूक आयोगामार्फत सर्व जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.
मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांना रांगेशिवाय प्रवेश, संख्या अधिक असल्यास दिव्यांगांसाठी स्वतंत्र रांग, रॅम्प सुविधा, अधिक प्रकाश व्यवस्था, व्हीलचेअर जाऊ शकेल असा मोठा दरवाजा, दिव्यांगांसाठी स्वतंत्र पार्किंग आदी सुविधा असणार आहेत. याशिवाय मागणीनुसार मतदान केंद्रावर व्हीलचेअरची सुविधाही प्रशासनामार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहे. सोबतच बॅलेट युनीटवर ब्रेल लिपी राहणार आहे. यासाठी मुकबधीर व अपंग विद्यालयातील विशेष नियुक्ती करण्याचे नियोजन आहे.
दिव्यांगांसाठी ॲप
दिव्यांगांची मतदारनोंदणी, मतदान केंद्राचा शोध, व्हीलचेअरची मागणी इत्यादी सोयी उपलब्ध करुन घेण्यासाठी पीडब्ल्यूडी (PWD) हे ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे मोबाईल ॲप डाऊनलोडसाठी ‘गुगल प्ले स्टोअर’वर उपलब्ध आहे. या ॲपवर जाऊन मागणी केल्यास दिव्यांग मतदारांना प्रशासनामार्फत व्हीलचेअर तसेच मतदान केंद्रापर्यंत मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
०००००








Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी