देशाच्या विकासात कामगारांचे योगदान महत्वपूर्ण – पालकमंत्री




v कामगारांना आवश्यक व सुरक्षा किटचे वाटप
यवतमाळ, दि. 04 : औद्योगिकीकरणाच्या काळात जगातील अनेक देशात कामगारांच्या लढ्यापासून क्रांतीची सुरवात झाली आहे. भारतातसुध्दा स्वातंत्र्यपूर्व लढ्यापासून ते आजपर्यंत देशाच्या विकासात कामगारांचे महत्वाचे योगदान आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
पोस्टल ग्राऊंड येथे बांधकाम कामगारांना आवश्यक व सुरक्षा किटचे वाटप करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा कामगार कल्याण अधिकारी राजदीप धुर्वे, अमर दिनकर, बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात विविध स्तरावर मेळावे घेऊन कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, यापूर्वी सात वर्षात जिल्ह्यात केवळ 15 हजार कामगारांची नोंदणी करण्यात आली होती. आता हा आकडा 70 हजारांच्या वर आहे. देश घडविण्याची क्षमता कामगारांमध्ये असल्यामुळे देशाच्या पंतप्रधानांनी ‘श्रममेव जयते’ हा नारा दिला आहे. ज्या कामागारांची ऑनलाईन नोंदणी प्रलंबित आहे, अशा अर्जदारांच्या खात्यातसुध्दा पाच हजार रुपये जमा करावे. कामगारांच्या कल्याणासाठी निधी कमी पडू देणार नाही. तसेच एकही कामगार किटशिवाय वंचित राहणार नाही, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. या सुरक्षा किटचा वापर योग्य कामासाठी करा. यातील हेल्मेट, शुज, हातमोजे आदींचा वापर करून सुरक्षित काम करा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कामगार कल्याण अधिकारी राजदीप धुर्वे म्हणाले, कामगार कल्याण मंडळाची स्थापना मे 2007 मध्ये झाली. मात्र कामगारांच्या नोंदणीकरीता पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने विशेष नोंदणी अभियान राबविण्यात आले. त्यामुळेच जिल्ह्यात मोठ्या संख्येने कामगारांची नोंदणी करण्यात यश प्राप्त झाले. आतापर्यंत 18 हजार कामगारांना आठ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. कामगार कल्याण मंडळाच्या अनेक योजना असून यात अवजारे खरेदी, कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती, दुर्देवी मृत्यु झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य आदींचा कामगारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन अमर दिनकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने कामगार बांधव उपस्थित होते.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी