जिल्ह्यात अनुदानावर 4 हजार 44 क्विंटल हरभरा बियाणे

 


Ø प्रमाणित बियाण्याचे अनुदानावर वितरण सुरु

यवतमाळ, दि. 29 : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यात अनुदानावर 4 हजार 44 क्विंटल हरभरा बियाणे वाटप करण्यात येत आहेत. यात महाबीजचे एकूण 3444 तसेच एन. एस. सी. व कृभको यांचे मार्फत प्रत्येकी 300 क्विंटल प्रमाणे बियाणे वितरणाची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत एका शेतकऱ्याला त्याच्या सातबारा क्षेत्रानुसार जास्तीत जास्त तीन बॅग (20 किलो प्रती बॅग) अनुदानावर देण्यात येत आहे.

रब्बी हंगामाची तयारी सुरु झाली असून जिल्ह्यामध्ये झालेला पाऊस व त्याअनुषंगाने उपलब्ध जलसाठा या दोन्ही बाबीचा विचार केल्यास रब्बी हंगामातील पीक पेऱ्यामध्ये लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्याचा कल हरभरा व गहू या पिकाच्या पेरणीवर असतो. रब्बी हंगामासाठी महाबिजला यवतमाळ जिल्ह्यासाठी हरभरा या पिकाकरीता कृषी विभागाकडून 10 वर्षाच्या आतील वाणाचे एकूण 2559 क्विंटल व 10 वर्षाचे वरील वाणाचे 885 क्वि. बियाणे वितरण करण्याचे लक्षांक मिळाले आहे. हरभरा बियाण्याच्या 10 वर्षाचे आतील प्रामुख्याने फुले विक्रम हे 10 वर्षाचे आतील वाण महाबिजमार्फत अनुदानावर उपलब्ध करण्यात येत आहे.

शेतकऱ्याला त्याच्या सातबारा क्षेत्रानुसार, जास्तीत जास्त तीन बॅग अनुदानावर उपलब्ध करण्यात येत आहे. त्यासाठी शेतक-यांना महाबिजचे विक्रेते व उपविक्रेत्यांकडे सातबारा, आठ अ आणि आधार कार्डची झेरॉक्स प्रत देऊन हरभरा बियाणे अनुदानावर खरेदी करता येणार आहे. कोणताही शेतकरी बियाणांपासून वंचित राहू नये, याकरीता जिल्ह्यासाठी वाढीव लक्षांकाची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या 20 किलोच्या एका बॅगची मुळ किंमत 1 हजार 520 रुपये आहे. या एका बॅगला 500 रुपये अनुदान देण्यात येत आहे. त्यानुसार 20 किलो बॅगसाठी शेतकऱ्यांना 1 हजार 20 रुपये मोजावे लागतील. जिल्ह्यात प्राप्त झालेल्या लक्षांकाच्या मर्यादेपर्यंतच अनुदानावर हरभरा बियाणे उपलब्ध राहणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने कळविली आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी