माळराणावर फुलविलेल्या फळबाग शेतीला जिल्हाधिका-यांची भेट

 



Ø नाविण्यपूर्ण उपक्रमाबाबत केले शेतक-यांचे कौतुक

यवतमाळ, दि. 30 : पारंपरिक शेतीला फाटा देऊन 'विकेल ते पिकेल' या उपक्रमांतर्गत शेतीमध्ये नाविण्यपूर्ण प्रयोग करणा-या फळबाग शेतीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह आणि जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी भेट दिली. विशेष म्हणजे माळरानावर फुलविलेल्या या शेतीबद्दल जिल्हाधिका-यांनी शेतक-यांचे विशेष कौतुक केले.

नेर तालुक्यात एलगुंडा गावातील प्रयोगशील शेतकरी उत्तम चव्हाण व मैथिली औदार्य यांनी माळराणावर शेतीमध्ये आंबा, सिताफळ व पेरुची बाग लावली आहे. सेंद्रीय पध्दतीने शेती करणा-या शेतक-यांच्या शेताला भेटी देऊन त्यांनी राबविलेल्या नाविण्यपूर्ण शेतीपयोगी उपक्रमाची पाहणी करणे, त्यांना प्रोत्साहन देणे, या उद्देशाने प्रक्षेत्र भेटीचे आयोजन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी केले होते. या भेटीदरम्यान जिल्हाधिका-यांनी श्री. चव्हाण यांच्या शेतातील आंबा, सिताफळ व पेरुची फळबाग, त्यासाठी केलेले सुयोग्य व्यवस्थापन, पाण्याचा कार्यक्षम वापर, सोयाबीन पीक, गांडूळ खत उत्पादन प्रकल्प आदींची पाहणी केली.

तसेच महिला शेतकरी मैथिली औदार्य यांच्या तूर डाळ व गांडूळ खत विक्री केंद्राला भेट दिली. दोन्ही शेतक-यांनी आपापल्या शेतीमध्ये राबविलेल्या अभिनव उपक्रमांबद्दल जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिका-यांनी संबंधित शेतक-यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच या उपक्रमाचा विस्तार करण्यासाठी प्रशासनाकडून कोणतेही सहकार्य लागल्यास त्वरीत संपर्क करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी नेरचे तहसीलदार अमोल पोवार, गटविकास अधिकारी श्रीमती ढोले, नायब तहसीलदार चितकुंटलवार, तालुका कृषी अधिकारी नामदेव कुंभरे आदी उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी