जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाईची सुरवात

 


Ø अनेक महत्वाचे निर्णय पारीत

 

यवतमाळ, दि. 6 :  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम.देवेंदरसिंह यांचे अध्यक्षतेखाली आज झालेल्या बँकेच्या सभेत महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले असून  गैरव्यवहार करणाऱ्या एका कर्मचाऱ्यास बडतर्फ करण्यात आले तर इतर काही कर्मचारांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.

आजच्या सभेत सुरवातीला मागील सभेच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. त्यांनतर बँकेच्या मंजुर धोरणानुसार नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या सभासदांना शेती संस्थेमार्फत विकासात्मक कर्ज, सिंचन कर्ज तसेच वाहन कर्ज मंजुर करण्यात आले. याशिवाय बँक कर्मचाऱ्यांची कर्ज प्रकरणेदेखील निकाली काढण्यात आली. शेती कर्जासोबतच बिगरशेती सहकारी संस्थांच्या कर्ज मर्यादेचे नुतनिकरण करण्यात आले. तर खरेदी विक्री संघा सारख्या सहकारी संस्थांना देखील त्यांचा व्यवहार पाहुन त्यांची कर्ज मर्यादा निश्चीत करण्यात आली. बँकेची सीबीएस प्रणाली व्यवस्थीत कार्यान्वीत रहावी व सभासदांना योग्य सेवा देता याव्या याकरीता नेटवर्क कनेक्टीव्हीटी मेन्टेनन्सचा वार्षिक करार मंजूर करण्यात आला. बँकेचा आर्थीक डाटा सुरक्षीत राहणेकरीता आवश्यक परिक्षण व तपासणी करुन घेण्यास देखील मान्यता देण्यात आली. सभेच्या शेवटी थकीत कर्ज प्रकरणांचा देखील आढावा घेण्यात आला व सन २०२०-२१ च्या कृती कार्यक्रमाची देखील नोंद घेण्यात आली.

या सभेस बँकेचे मुख्य कार्यकारी व सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. सभेत झालेल्या निर्णयांची कार्यालयाने तात्काळ अंमलबजावणी करावी असे प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिंह यांनी सुचित केले .

००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी