लोकांच्या मनातून कोरोनाबाबतची भीती नष्ट करा

 






Ø विधासभा अध्यक्षांचे प्रशासनाला निर्देश

Ø सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची पाहणी

यवतमाळ, दि. 4 : कोरोनाचे संकट हे एका युध्दासारखे आहे. या संकटातून लोकांचा जीव वाचविणे हेच आमचे दायित्व आहे. रेकॉर्डला आले म्हणून आपल्याला आकडे दिसतात. जे नागरिक भीतीमुळे समोरच आले नाही, त्यांचे घरातच मृत्यु झाले. त्यामुळे जिल्ह्याचा मृत्युदर कमी करायचा असेल तर सर्वात पहिले लोकांच्या मनात कोरोनाबाबत असलेली भीती पूर्णपणे नष्ट करा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोव्हीड - 19 संदर्भात प्रशासनासोबत घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, माजी आमदार सर्वश्री किर्ती गांधी, वामनराव कासावार, विजय खडसे, श्याम पांडे, देवानंद पवार आदी उपस्थित होते.

कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासून जिल्ह्यात पहिल्या अडीच महिन्यात एकही मृत्यु न झालेल्या यवतमाळचा मृत्युदर आज 3.1 टक्के आहे, याबाबत खंत व्यक्त करून श्री. पटोले म्हणाले, 2.8 टक्के हा सरासरी मृत्युदर आहे. त्यापेक्षा मृत्युदर जास्त असणे हे आपले अपयश आहे. हा दर कमी करण्यासाठी लोकांच्या मनातून कोरानाबाबतची भीती घालविणे, हे प्रशासनाचे पहिले प्राधान्य असले पाहिजे. कोरोना ही बिमारी फुफ्फुसाशी निगडीत आहे. फुफ्फुसाला दुसरा पर्याय नाही. तीन – चार दिवस ही बिमारी अंगावर काढली तर आपले काहीही होऊ शकते. या सर्व प्रक्रियेमधून मी गेलो आहे. त्यामुळे नागरिकांनी लक्षणे दिसताच आपली चाचणी करून घ्यावी. जिल्ह्यात चाचण्या करण्याची प्रक्रिया वाढवा.

ऑक्सीजनवरचा रुग्ण आपल्या हातात आहे. व्हेंटीलेटरवर त्याला जाऊ देऊ नका. तसेच रुग्णालयाची गर्दी कमी करायची असेल तर रुग्ण घरीच बरा झाला पाहिजे, याबाबत प्रशासनाने निश्चित धोरण आखावे. कोरोना हा पैसे लागणारा आजार आहे. खाजगी रुग्णालयात अव्वाच्या सव्वा बिल काढले जाते. त्यामुळे रुग्णांची लूट थांबवा. कोरोनाबाधितांवर शासनाकडून मोफत औषधी, उपचार आहे, हा संदेश नागरिकांत गेला पाहिजे. यासाठी सर्व स्तरातून जनजागृती करा.

कोरोनाच्या युध्दात आपल्याला जिंकायचे आहे. त्यामुळे वेळेवर चाचणी आणि उपचार केले तर या कालावधीतील 14 दिवस आपल्या भविष्यातील जीवनाचे आहे, याची प्रत्येक नागरिकाने जाणीव ठेवावी. मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेला ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ हा उपक्रम नागरिकांची आरोग्याबाबतची माहिती घेऊन ते त्वरीत बरे कसे होतील, या संकल्पनेतून आहे. कोव्हीडबाबत प्रत्येकाने अलर्ट राहावे. जिल्ह्यात आरोग्य सुविधा उभारायच्या असेल तर शासनाच्या निधीची वाट न बघता कंपन्यांचा सीएसआर फंड उपयोगात आणा. खनीजमधून असा फंड उभारण्यास यवतमाळ जिल्ह्यात अडचण यायला नको, असेही विधानसभा अध्यक्ष म्हणाले.    

यावेळी त्यांनी जिल्ह्याचा कोव्हीडचा आढावा घेतला. सादरीकरण जिल्हाधिकारी सिंह यांनी केले. बैठकीला डॉ. गिरीश जतकर, डॉ. सुरेंद्र भुयार, डॉ. विजय डोंबळे, डॉ. मनवर, किरण कुमरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलची पाहणी केली.

००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी