वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्या प्राधाण्याने सोडवू - पालकमंत्री संजय राठोड

 









Ø  विश्राम गृहात घेतली आढावा बैठक

यवतमाळ, दि. 11 : जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यू दर कमी होत असून मागील तीन दिवसांपासून कोरोनामुळे एकही मृत्यू नाही, हे आशादायी चित्र आहे. कोविड आजारावर नियंत्रण ठेवण्यात जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाच्या योगदानासमवेतच आरोग्य यंत्रणेचेही फार मोठे योगदान आहे. जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यस पालकमंत्री या नात्याने प्राधाण्य देण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

            जिल्ह्यात कोविड-19 अंतर्गत उद्भवणाऱ्या समस्या व करावयाच्या उपाययोजना तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या समस्यांबाबत पालकमंत्री संजय राठोड यांनी विश्रामगृह येथे आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष कालिंदा पवार, आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुळकर्णी, विनय ठमके, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, डॉ. गिरीश जतकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत पवार, मॅग्मा संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विजय आकोलकर प्रामुख्याने उपस्थित होते.

            कोरोनाच्या सुरवातीला जिल्ह्यात सर्वत्र तातडीने कोविड केअर सेंटर उभारण्यात आले होते. तेथे डॉक्टरांची पदे तातडीने भरण्यास प्रर्याप्त वेळ नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आरोग्य विभाग व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फत पदभरती करणे आवश्यक होते, शासनाने देखील कंत्राटी पद्धतीने सदर जागा भरण्याचे निर्देश दिले होते. मात्र ही पदे परिपर्णुपणे भरण्यात न आल्याने पालकमंत्री राठोड यांनी नाराजी व्यक्त केली.  प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना कोवीड केअर सेंटरमधून कार्यमुक्त न केल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. आरोग्य विभागाचा हा हलगर्जीपणा खपवून घेतल्या जाणार नाही, असेही पालकमंत्र्यांनी सुनावले.

आता पुढील पाच वर्ष राज्य सरकारचे प्रथम धोरण आरोग्य यंत्रणा हेच आहे. जिल्ह्यात आरोग्य विभागाकरिता वेळोवेळी राज्य शासनाकडून निधी मंजूर करवून घेतला असून दोन दिवसांपुर्वीच साडेपाच कोटी निधी देखील वितरीत केला आहे. जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेला कोणतीही कमतरता भासू नये म्हणून शासनाकडून शक्य ती सर्व मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री म्हणून मी तत्पर असल्याचे संजय राठोड यांनी सांगितले.

आगामी दुर्गोत्सव व दसरा तसेच दिवाळी सणाचे प्रसंगी कोरोना संसर्ग वाढल्यास आरोग्य यंत्रणेने पुर्वनियोजन करून ठेवावे असे पालकमंत्री यांनी सांगितले. यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुळकर्णी यांनी दुर्गादेवी मंडळांनी डॉक्टरांची सेवा, सॅनिटायझर व इतर आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करण्याच्या अटीवरच परवानगी देण्यात यावी असे सूचविले.

            यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद गुडधे, डॉ. संघर्ष राठोड, डॉ. आशिष पवार, डॉ. मनिष साऊळकर, विजय राठोड, पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, डॉ. धर्मेश चव्हाण व जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी  उपस्थित होते.

००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी