'सर्वांग सुंदर शाळा' उपक्रम जिल्ह्यात राबविणार - पालकमंत्री संजय राठोड




                                              

Ø यवतमाळ न.प.चा स्तुत्य उपक्रम

यवतमाळ, दि. 2 : सध्या सर्वत्र शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याचे निदर्शनास येते. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत तसेच शहरी व ग्रामीण भागातील गरीबांच्या मुलांपर्यंत दर्जेदार व गुणात्मक शिक्षण पोहचणे अत्यंत गरजेचे झाले आहे. यासाठी सोयीसुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे. यवतमाळच्या नगराध्यक्षा कांचन चौधरी यांच्या संकल्पनेतून 'सर्वांग सुंदर शाळा' हा उपक्रम गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक बळ देणारा आहे. त्यामुळे या उपक्रमाची व्याप्ती जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा तसेच सर्व नगर परिषदेच्या शाळेत वाढविण्यास आपले प्राधान्य आहे, असे मत जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केले.

नगर भवन येथे यवतमाळ नगर परिषद शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळच्या नगराध्यक्षा कांचन चौधरी तर प्रमुख अतिथी म्हणून न.प.शिक्षण सभापती कोमल ताजणे, मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, मुल्यांकन समितीचे अध्यक्ष पद्माकर मलकापुरे आदी उपस्थित होते.

यवतमाळ नगर परिषदेने राबविलेला 'सर्वांग सुंदर शाळा' हा उपक्रम काळाची गरज आहे, असे सांगून पालकमंत्री राठोड म्हणाले, सर्व शाळांमध्ये चांगल्या सोयीसुविधा व प्रसन्न वातावरण असणे गरजेचे आहे. तसेच वर्गखोल्या, स्वच्छतागृह यासोबतच सजावट, शैक्षणिक व गुणात्मक वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे. शिक्षकांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्ञान अवगत करून बदलत्या जागतिक परिस्थितीनुसार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. तरच जिल्हा परिषद किंवा नगर परिषद शाळेतील विद्यार्थी स्पर्धात्मक युगात टिकू शकेल. जिल्ह्यातील सर्व शाळा चांगल्या करण्यासाठी नक्कीच मदत केली जाईल. यवतमाळ नगर परिषदेच्या शाळांसाठी पहिल्या टप्प्यात मार्च पर्यंत 50 लक्ष व दुस-या टप्प्यात मार्चनंतर पुन्हा 50 लक्ष असे एकूण 1 कोटी रुपये खनिज विकास निधीतून देण्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली. मी पण नगर परिषदेच्या शाळेचा विद्यार्थी आहे व आज पुरस्कार प्राप्त झालेल्या शाळांच्या यादीत मी शिक्षण घेतलेल्या शाळेचासुध्दा समावेश आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. हा अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल नगराध्यक्षांसह न.प.चे सर्व अधिकारी, शिक्षक व इतर कर्मचारी अभिनंदनास पात्र आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी नगराध्यक्षा कांचन चौधरी म्हणाल्या, पालिकेच्या शाळेत अतिशय गरीब विद्यार्थी शिक्षण घेतात. स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर या शाळांचा दर्जा वाढविण्याचा संकल्प केला. शाळांचा दर्जा सुधारण्याची ही सुरवात असून विद्यार्थी व शिक्षकांमध्ये उर्जा निर्माण करण्यासाठी केलेला हा एक प्रयत्न आहे. यासाठी न.प.च्या सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांनी सहकार्य केले. शाळांच्या मुल्यांकनासाठी तज्ज्ञांची समिती निर्माण केली. या समितीच्या सदस्यांनी अमुल्य वेळ देऊन मुल्यांकनाचे काम केले आहे. दारव्हा येथे न.प. शाळा क्रमांक 2 येथे जवळपास 1800 पटसंख्या आहे. त्याच धर्तीवर यवतमाळातील शाळा झाल्या पाहिजे, असा आपला प्रयत्न आहे. यापुढेही ही स्पर्धा सुरू राहील, असे नगराध्यक्षा कांचन चौधरी यांनी सांगितले.

मुल्यांकन समितीचे अध्यक्ष पद्माकर मलकापुरे म्हणाले, बाभळेवाडीची शाळा राज्यात सुंदर मानली जाते. असेच वातावरण न.प.च्या शाळांमध्ये झाले पाहिजे. शिक्षकांमध्ये समर्पित भावना असली पाहिजे तर विद्यार्थी हा ज्ञाननिष्ठ आणि शिक्षक हा विद्यार्थीनिष्ठ असणे गरजेचे आहे. न.प.च्या सर्व शाळांमध्ये वातावरण चांगले करण्यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी प्रथम क्रमांकाचे 10 लक्ष रुपयांचे बक्षीस तहसील चौकातील माँ जिजाऊ न.प.प्राथमिक शाळा क्रमांक 20, द्वितीय क्रमांकाचे सात लक्ष रुपयांचे बक्षीस साने गुरुजी न.प.शाळा क्रमांक 7, तर तृतीय क्रमांकाचे पाच लक्ष रुपयांचे बक्षीस इस्लामपुरा येथील न.प. उर्दु कन्या शाळा क्रमांक 14, पाटीपुरा येथील न.प.कन्या शाळा क्रमांक 6 या दोन शाळांना विभागून देण्यात आले. तसेच उत्तेजनार्थ बक्षीस आठवडी बाजार येथील न.प.शाळा क्रमांक 11 या शाळेला आणि रोल मॉडेल म्हणून एक लक्ष रुपयांचे बक्षीस संजय गांधी शाळेला देण्यात आले.  यावेळी मान्यवरांच्या हस्ते मुल्यांकन समितीचे अध्यक्ष पद्माकर मलकापुरे, सदस्य डॉ. अविनाश शिर्के, डॉ. प्रशांत गावंडे, उत्तमराव भोयर यांचासुध्दा सत्कार करण्यात आला.

तत्पूर्वी महात्मा गांधी, लालबहाद्दूर शास्त्री, माँ जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांनी केले. संचालन वैजयंती भेंडारकर यांनी तर आभार प्रशासन अधिकारी योगेश डाफ यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. विजय अग्रवाल, गजानन इंगोले, विजय खडसे यांच्यासह न.प.शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी