पोलिस स्मृती दिनानिमित्त पोलिस मुख्यालयात शहिदांना श्रध्दांजली

 



यवतमाळ, दि. 21 : कर्तव्य बजावतांना देशासाठी बलिदान दिलेल्या पोलिसांच्या स्मरणार्थ जिल्हा पोलिस मुख्यालयात शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह व जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी शहीद स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अपर्ण केले. तसेच यावेळी पोलिस विभागातर्फे हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.

स्मृतीदिनानिमित्त बोलतांना जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, 21 ऑक्टोबर 1959 रोजी जम्मू – काश्मिरच्या लडाख भागात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांवर अचानक चिनी सैनिकांनी हल्ला केला. यात प्रत्येक भारतीय जवानाने शौर्याने प्रतिकार करून देशासाठी बलिदान दिले. 1 सप्टेंबर 2019 ते 21 ऑक्टोबर 2020 या कालावधीत देशातील 266 पोलिसांना वीरगती प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शहिदांच्या आत्म्यास शांती लाभावी, अशी मनोकामना परमेश्वराकडे करीत असल्याचेही ते म्हणाले.

जिल्हा पोलिस अधिक्षक श्री. भुजबळ म्हणाले, कर्तव्यावर असतांना शहीद झालेल्या पोलिस अधिकारी व कर्मचा-यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस पोलिस स्मृती दिन म्हणून पाळला जातो. या दिवशी 1959 रोजी चिनी सैनिकांनी लडाख भागात सीआरपीएफच्या पोलिसांवर अचानक हल्ला केला. यात सर्व जवान शहीद झाले. शहीद जवानांचे मृतदेह 24 दिवसांनी भारताच्या स्वाधीन केल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली. या जवानांवर जेथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्या ठिकाणी पोलिस शहीद स्मारक बांधण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

गतवर्षी शहीद झालेल्या सर्व पोलिस अधिकारी व कर्मचा-यांच्या नावांचा उल्लेख यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन अजित डेहनकर व हेड कॉन्स्टेबल प्रकाश देशमुख यांनी केले. कार्यक्रमाला उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बावीस्कर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक देवानंद लोणारे, यवतमाळ शहर पोलिस निरीक्षक धनंजय सायरे, राखीव पोलिस निरीक्षक श्री. दुबे, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक श्री. किनगे यांच्यासह इतर अधिकारी व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी