कोरोनाविरुध्दच्या लढाईत पोलिस ‘फ्रंटलाईन वॉरीअर्स’ - पालकमंत्री राठोड

                     





                                        

Ø पोलिसांकरीता कोव्हीड केअर सेंटरचे लोकार्पण

यवतमाळ, दि. 18 : गत सात-आठ महिन्यांपासून आपण कोरोनाविरुध्दची लढाई लढत आहोत. शासन, प्रशासन, आरोग्य विभाग, पोलिस विभाग नागरिकांच्या आरोग्यासाठी अहोरात्र झटत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये याकरीता तर पोलिस विभाग प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून नागरिकांना शिस्त लावण्याची जबाबदारी पार पाडत आहे. एकप्रकारे कोरोनाविरुध्दच्या लढाईत पोलिस हे ‘फ्रंटलाईन वॉरीअर्स’ आहेत, असे गौरवोद्वागार पालकमंत्री संजय राठोड यांनी काढले.

पोलिस मुख्यालयात जिल्हा पोलिस तसेच त्यांच्या कुटुंबियांकरीता निर्माण करण्यात आलेल्या कोव्हीड केअर सेंटरचे लोकार्पण करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, डॉ. मनवर आदी उपस्थित होते.

पोलिस विभागाचा कुटुंबप्रमुख म्हणून पोलिसांसाठी तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी कोव्हीड केअर सेंटरची निर्मिती करण्याची जबाबदारी पोलिस अधिक्षकांनी पार पाडली, ही अतिशय अभिनंदनीय बाब आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, या रुग्णालयात अतिशय सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाविरुध्दच्या लढाईत अहोरात्र रस्त्यावर उतरून पोलिस विभाग काम करीत आहे. यात राज्यातील अनेक पोलिसांचा मृत्युदेखील झाला आहे. तरीसुध्दा पोलिस आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. नागरिकांना शिस्त लावण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर आहे. यवतमाळात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर त्यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधिक्षक तसेच आरोग्य विभागाने प्रतिबंधित क्षेत्रात मिटींग घेतल्या. ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. जिल्हा प्रशासन कोरोनाविरुध्दच्या लढाईत अग्रेसर आहे.

सध्या काही प्रमाणात कोरोनापासून दिलासा मिळाला असला तरी दुर्गा उत्सव, दसरा, दिवाळी आदी सणांमध्ये गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने आतापासून नियोजन करावे. पोलिस विभागाला शासन किंवा प्रशासनाकडून जे काही सहकार्य पाहिजे, ते सर्व दिले जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.

प्रास्ताविकात पोलिस अधिक्षक श्री. भुजबळ म्हणाले, ‘कोरोनाविरुध्द युध्द आमचे सुरू’ या संकल्पनेतून हे 30 खाटांचे रुग्णालय पोलिसांकरीता तसेच त्यांच्या कुटुंबियांकरीता उभारण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील पाच अधिकारी व 150 कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर राज्यात जवळपास 250 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. रस्त्यावर उतरून पोलिस आपले कर्तव्य बजावत आहे. व-हाड प्रांतातील जुनी इमारत या रुग्णालयासाठी उपयोगात आणली असून प्रशासनाकडून सर्व सहकार्य मिळत आहे, असे पोलिस अधिक्षकांनी सांगितले.

तत्पूर्वी पोलिसांच्या वतीने पालकमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी फित कापून ‘कोव्हीड केअर सेंटर फॉर पोलिस’ रुग्णालयाचे पालकमंत्र्यांनी लोकार्पण करून नोंदणी कक्ष, महिला व पुरुषांकरीता असलेले विलगीकरण कक्ष, औषधी वितरण कक्ष आदींची पाहणी केली. यावेळी रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. निलिमा धुर्वे उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी केले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बावीस्कर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक देवानंद लोणारे, यवतमाळ शहर पोलिस निरीक्षक धनंजय सायरे, राखीव पोलिस निरीक्षक श्री. दुबे यांच्यासह इतर अधिकारी व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी