बाजारपेठेची वेळ आता रात्री 9 वाजेपर्यंत

 

यवतमाळ, दि. 15 : कोरोना विषाणुमुळे उद्भवणाऱ्या आरोग्य विषयक आपत्कालीन  परिस्थितीत जिल्ह्यात टाळेबंदीची मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. तर अनलॉक फेज मध्ये टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील करण्यात येत असल्याने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सुधारित मार्गदर्शन सूचना आदेश लागू केले आहेत. या सुचनांनुसार जिल्ह्यातील सर्व दुकाने व बाजारपेठा सकाळी 9 वाजेपासून रात्री 9 वाजेपावेतो सुरू ठेवण्यास 15 ऑक्टोबर 2020 पासून मुभा देण्यात येत आहे.

 सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था व शिकवणी वर्ग इत्यादी बंद राहतील. तथापी ऑनलाईन आंतरशिक्षण यास मुभा राहील. शाळेमध्ये शिक्षक व कर्मचारी यांना 15 ऑक्टोबर पासून 50 टक्केपर्यंत उपस्थित राहण्यास मुभा देण्यात येत आहे व यासंबंधात शासन स्तरावरून शिक्षण विभाग वेगळ्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करणार आहे. कौशल्य किंवा उद्योजकता प्रशिक्षण राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे आयोजित करण्याची परवानगी देण्यात येत आहे. उच्च शैक्षणिक संस्था मध्ये ऑनलाईन / सामाजिक अंतर राखून शिकवण्यास प्रोत्साहीत करण्यात येत आहे. तथापि पी.एच.डी. आणि विज्ञान शाखेच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांकरीता प्रयोगशाळा वापराकरीता परवानगी देण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी ग्रंथालय कोविड-19 च्या मार्गदर्शक सुचनेचे व सामाजिक अंतर राखुन सुरू करण्यास परवानगी देण्यात येत आहे. याबाबत शासनस्तरावरून उच्च व तांत्रिक शिक्षण विभाग सुधारित मार्गदर्शीका निर्गमित करतील.

लग्न समारंभाच्या कार्यक्रमास वेगळ्या परवानगीची आवश्यकता असणार नाही. लग्न समारंभ खुले लॉन, विना वातानुकुलीक मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 व्यक्तींच्या मर्यादेत सामाजिक अंतर तसेच कोविड-19 संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सुचनांचे पालन करण्याच्या अटीवर सकाळी 9 ते सायंकाळी 9 वाजेपावेतो पार पाडतील.

अंत्यविधी प्रसंगी 20 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येणार नाही व सामाजिक अंतराचे पालन करावे लागेल. करमणुकीकरीता गार्डन, पार्क आणि सार्वजनिक खुली जागा वापरण्यास परवानगी देण्यात येत आहे. आठवडी बाजार व जनावरांचे बाजार नगर परिषदेच्या सुचनांचे पालन करून सुरू करण्यास मुभा देण्यात येत आहे.

वरील आदेश जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रे वगळता उर्वरित ग्रामीण व शहरी क्षेत्रास लागू राहतील. आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समुह यांचेवर साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा व इतर संबंधीत कायद्यानुसार फौजदारी दंडात्मक कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी