डीसीसीच्या थकबाकीदारांनी परतफेडीबाबत नियोजनबध्द कार्यक्रम द्यावा

 


Ø प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हाधिका-यांचे आवाहन

यवतमाळ, दि. 5 : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभासदांनी कर्जवसुलीकरीता सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे खरीप हंगाम 2020 मध्ये बँकेने 100 टक्के पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. ही निश्चितच अभिनंदनाची बाब आहे. मात्र तरीसुध्दा बँकेची जवळपास एक हजार कोटींची थकबाकी अद्याप सभासदांकडे बाकी आहे. त्यामुळे या कर्जाच्या वसुलीबाबत सभासदांनी बँकेशी संपर्क करून आपल्याकडील परतफेडीचा नियोजनबध्द कार्यक्रम सादर करावा, असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले आहे.

कोरोना संकटाचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झाला असून यात शेती व बिगरशेती क्षेत्रसुध्दा ढवळून निघाले आहे. त्याचा एकूणच परिणाम बँकेच्या कर्ज परतफेडीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच कोव्हीड – 19 परिस्थितीचा विचार करता थकीत कर्जदार सभासदांनी आपल्याकडील कर्ज परतफेडीचा कार्यक्रम बँकेस सादर करावा. जेणेकरून कोरोनाच्या काळात कोणत्याही सभासदावर अप्रिय कारवाई करण्याची वेळ येणार नाही.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जवळपास एक हजार कोटी रुपयांचे कर्ज सभासदांकडे थकित आहे. यात एक लक्ष शेतक-यांकडे अंदाजे 850 कोटींचे शेतीकर्ज तर जवळपास 800-900 शेतक-यांकडे 150 कोटींचे बिगरशेती कर्ज आहे. बँकेने गत महिन्यात 500 सभासदांना परतफेडीकरीता नोटीस पाठविल्या आहेत. नोटीस पाठविलेल्या सभासदांनी संबंधित शाखा व्यवस्थापकांशी संपर्क साधून आपल्या कर्जाची अद्ययावत स्थिती जाणून घ्यावी. तसेच परतफेडीचे नियोजन लेखी स्वरूपात बँकेला सादर करावे. जेणेकरून बँकेला आपला कृती कार्यक्रम तयार करण्यास मदत होईल. ज्या सभासदांना थकीत कर्जाची परतफेड करणे शक्य आहे, त्यांनी परतफेड करावी. तसेच कोरोनाच्या परिस्थितीमुळे ज्यांना शक्य नाही त्यांनी शाखा व्यवस्थापकांना परतफेडीचा निश्चित कार्यक्रम देऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिंह यांनी केले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी