कृषी निविष्ठांच्या दुकानांची वेळ सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत


Ø अत्यावश्यक सेवेंची दुकाने सकाळी 7 ते सकाळी 11 पर्यंतच

            यवतमाळ, दि. 15 : जिल्ह्यात 'ब्रेक द चेन' अंतर्गत 15 मे च्या सकाळी 7 वाजतापासून 1 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत घालून देण्यात आलेले निर्बंध कायम करण्यात आले आहे. मात्र शेतक-यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला खरीप हंगाम लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व प्रकारची कृषी सेवा केंद्रे, बी-बियाणे, किटकनाशके, खते विक्री केंद्र  यापुढे सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहणार आहेत.

            सदर कालावधीत दुकानातील विक्री सोबतच शेतक-यांना व्हॉट्सॲप / मोबाईल कॉलद्वारे माहिती देऊन कृषी निविष्ठा होम डिलीव्हरी (घरपोच विक्री) करण्याच्या अनुषंगाने कृषी निविष्ठा विक्री केंद्रांनी कार्यवाही करावी. जेणेकरून शेतक-यांच्या सोयीनुसार विक्री व गर्दी टाळण्यास मदत होईल. सर्व कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवर कोव्हीड त्रिसुत्रींचे पालन होण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत तालुका कृषी अधिकारी (राज्य तसेच जि.प.) यांनी नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

            जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांच्या आस्थापनाधारकांनी दुकानात नागरिकांची गर्दी कमी होण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त होम डिलीवरीद्वारे वस्तुंचा पुरवठा करावा. यासाठी आस्थापनाधारकांनी स्वत:चा व्हॉट्सॲप क्रमांक दुकानासमोर प्रसिध्द करावा. तसेच ग्राहकांचे व्हॉट्सॲप / मोबाईल क्रमांक घेऊन त्यांना घरपोच वस्तुंचा पुरवठा करण्यास प्राधान्य द्यावे. जेणेकरून दुकानात प्रत्यक्ष येणा-या ग्राहकांची संख्या कमी होईल.

            नगर परिषद / नगर पंचायत व ग्रामपंचायतींनी आपापल्या कार्यक्षेत्रात सुरू असलेले अत्यावश्यक दुकानांच्या आस्थापनाधारकांकडून अत्यावश्यक वस्तुंची विक्री जास्तीत जास्त होम डिलीवरी करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. यात ग्रामस्तरीय समित्यांनी व शहरातील प्रभागस्तरीय समित्यांनी आवश्यकतेनुसार अशासकीय संस्थांची मदत घेऊन कार्यवाही करावी. अत्यावश्यक वस्तु / सेवा पुरविणारे आस्थापनाचालक, त्यामधील सर्व कर्मचारी तसेच होम डिलीवरी करणा-या कर्मचा-यांनी लसीकरण करणे अथवा त्यांच्याकडे कोव्हीड चाचणी निगेटिव्ह असल्याबाबतचा अहवाल सोबत बाळगणे आवश्यक आहे. कोव्हीड चाचणी अहवाल हा अहवालाच्या दिनांकापासून 15 दिवसांपर्यंत वैध राहील. लसीकरण न केल्याचे किंवा वरील मुदतीत निगेटिव्ह अहवाल नसल्यास पहिल्या वेळेस 100 रुपये व त्यानंतर प्रत्येक वेळेस 200 रुपये दंड आकारण्यात येईल.

            याव्यतिरिक्त यापूर्वी जिल्हा प्रशासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांमधील सर्व सुचना व आदेश पुर्वीप्रमाणे लागू राहतील. सदर आदेश पुढील आदेशापर्यंत यवतमाळ शहर व जिल्ह्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील. आदेशाचे उल्लंघन करणा-यांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, कलम 188 व इतर संबंधित नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी