टंचाई निवारणासाठी गांभिर्याने काम करा – जिल्हाधिकारी येडगे

 


Ø टँकरची संख्या कमी करण्याचे निर्देश

       यवतमाळ, दि. 10 : सन 2019 आणि 2020 या दोन्ही वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. मात्र गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी जिल्ह्यात टँकरची संख्या जास्त आहे. टँकर आणि विहीर अधिग्रहणाची आवश्यकताच पडू नये, असे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळे यापुढे टंचाई निवारणार्थ गांभिर्याने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.

            जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी टंचाई व जलजीवन मिशनच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता प्रदीप कोल्हे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता राहूल जाधव आदी उपस्थित होते.

            मागील दोन्ही वर्षी सारखाच पाऊस झाला असतांना यावर्षी टँकरची संख्या जास्त का, असे विचारून जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठा योजनेतून पाण्याचे नियोजन करा. तसेच चालू असलेले टँकर कमी किंवा बंद करण्यासाठी प्रयत्न करा. पाणी उपलब्ध आहे, पण ते वेळेवर मिळत नाही, अशा तक्रारी येऊ देऊ नका. यवतमाळ न.प. क्षेत्रात नियमित पाणी पुरवठा झाला पाहिजे. तसेच अमृत योजनेच्या कामाची डेडलाईन 1 जुलैपर्यंत ठरविण्यात आली आहे. तोपर्यंत अमृत योजनेचे काम टेस्टिंगसह पूर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी सतत पाठपुरावा करा. यवतमाळ शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी विद्युत विभागाच्या नेहमी संपर्कात राहा, अशा सुचना त्यांनी केल्या.

            तसेच नळयोजना विशेष दुरुस्तीची जिल्ह्यात काय परिस्थिती आहे. माळपठारावर किती टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. टँकरची संख्या कधीपर्यंत कमी होईल, याबाबतही त्यांनी विचारणा केली. सद्यस्थितीत जिल्ह्यात 26 गावांत 26 टँकर सुरू असून 115 गावात 109 विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रदीप कोल्हे यांनी बैठकीत दिली.

००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी