अतिरिक्त बील आकारणी : रुग्णांना पैसे परत करण्याचे आदेश

 

                                                      

Ø पाच खाजगी कोव्हीड रुग्णालयांचा समावेश

यवतमाळ, दि. 6 : कोरोनाच्या काळात जिल्ह्यात खाजगी डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पीटलमध्ये उपचारादरम्यान रुग्णांकडून अतिरिक्त बील आकारणी केल्याप्रकरणी सदर रुग्णालयांना जिल्हा प्रशासनाने आदेश बजावले आहे. यात शहरातील उजवणे हॉस्पीटल, राठोड हॉस्पीटल, शहा हॉस्पीटल, साईश्रध्दा हॉस्पीटल आणि धवणे हॉस्पीटल या पाच रुग्णालयांचा समावेश आहे. रुग्णांकडून वसुल करण्यात आलेली अतिरिक्त रक्कम त्वरीत संबंधित रुग्णांच्या खात्यात जमा करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहे.

जिल्ह्यातील खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये भरती असलेल्या रुग्णांकडून मनमानी बील घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने या रुग्णालयात ऑडीटर नियुक्त केले. ऑडीटर यांनी बिलांच्या तपासण्या करून जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर केला. त्यानुसार प्रशासनाने अतिरिक्त बिलांबाबत संबंधित रुग्णालयांना 48 तासांच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले. मात्र संबंधित रुग्णालयाचे खुलासे समाधानकारक नसल्यामुळे शहरातील पाच खाजगी रुग्णालयांना अतिरिक्त आकारणीचे पैसे परत करण्याचे आदेश देण्यात आले.

यात यवतमाळ शहरातील उजवणे हॉस्पीटलमध्ये वेगवेगळ्या सात रुग्णांकडून अनुक्रमे 4 हजार रुपये, 4500 रुपये, 9 हजार रुपये, 21 हजार 500 रुपये, 14 हजार 700 रुपये, 9 हजार रुपये आणि 18 हजार रुपये असे एकूण 81 हजार 700 रुपये अतिरिक्त आकारण्यात आले होते. तसेच राठोड हॉस्पीटलमध्ये चार वेगवेगळ्या रुग्णांकडून अनुक्रमे 600 रुपये, 5 हजार रुपये, 6 हजार, 7 हजार असे 18 हजार 600 रुपये, शहा हॉस्पीटलमध्ये पाच रुग्णांकडून अनुक्रमे 1200 रुपये, 1200 रुपये, 6200 रुपये, 5 हजार रुपये, 3 हजार रुपये असे 16 हजार 600 रुपये, साईश्रध्दा हॉस्पीटलमध्ये सात रुग्णांकडून अनुक्रमे 8100 रुपये, 9200 रुपये, 4600 रुपये, 4600 रुपये, 8100 रुपये, 8700 रुपये, 4100 रुपये असे 47900 रुपये तर धवणे हॉस्पीटलमध्ये एका रुग्णाकडून 26 हजार रुपये अतिरिक्त स्वरुपात आकारण्यात आले होते.

या पाचही रुग्णालयात एकूण 24 रुग्णांकडून 1 लक्ष 90 हजार 800 रुपये अतिरिक्त घेतल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्येक रुग्णांकडून घेण्यात आलेली बिलाची अतिरिक्त रक्कम संबंधित रुग्णांच्या खात्यात जमा करावी. या आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून सात दिवसांच्या आत करण्यात यावी. रुग्णालयांकडून विहित कालावधीत अंमलबजावणी झाली नाही तर आपत्ती व्यवस्थापन कायद्यामधील कलम 51 (ख) चे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनाकडून पुढील कारवाई करण्यात येईल. तसेच रुग्णालयांनी सात दिवसात रक्कम परत न केल्यास सात दिवसानंतर आदेशाची अंमलबजावणी होईपर्यंत प्रतिदिवस एक हजार रुपये याप्रमाणे दंडाची रक्कम आकारण्यात येईल, असेही जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी