चांगली उगवण क्षमता असलेले बियाणे शेतक-यांना उपलब्ध करून द्या - जिल्हाधिकारी येडगे

 


Ø सोयाबीनचे घरगुती बियाणे वापरण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 5 : खरीप हंगाम सुरू झाल्यामुळे कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी शेतक-यांची लगबग सुरू आहे. अशा परिस्थितीत चांगली उगवण क्षमता असलेले बियाणे तसेच उत्कृष्ट दर्जाच्या कृषी निविष्ठा शेतक-यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे. त्यासाठी दैनंदिन पाठपुरावा करून जिल्ह्यात बियाणे, खते आदींची कमतरता पडणार नाही, याबाबत कृषी विभागाने सुक्ष्म नियोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जि.प. कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक अशोक ठाकरे आदी उपस्थित होते.

जास्तीत जास्त उगवण क्षमता असलेल्या घरगुती सोयाबीन बियाणांचा वापर करण्याचे शेतक-यांना आवाहन करा, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, महाबीजने जिल्ह्याला सोयाबीन बियाणांचा पर्याप्त स्वरुपात पुरवठा करावा. तसेच खाजगी कंपन्यांकडूनसुध्दा जास्तीत जास्त सोयाबीनचे बियाणे जिल्ह्याला उपलब्ध होईल, यासाठी कृषी विभागाने रोज पाठपुरावा करावा. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यात बोगस बियाणांचे वाटप होता कामा नये. अशी प्रतिष्ठाने शोधण्यासाठी टीममार्फत शोधमोहीम राबवा. तसेच चोरट्या मार्गानेसुध्दा बियाणांची वाहतूक न होऊ देण्यासाठी पोलिस विभागाची मदत घ्या.

जिल्ह्यात अप्रामाणिक नमुने सापडल्यास तात्काळ कारवाई करा. कृषी सहाय्यक शेतक-यांच्या बांधावर दिसले पाहिजे. त्यांच्यामार्फत शेतक-यांना योग्य मार्गदर्शन करून मोबाईल संदेशाच्या माध्यमातूनसुध्दा कृषी विभागाने शेतक-यांपर्यंत पोहचावे. जिल्ह्यात सर्व कृषी निविष्ठा वेळेत उपलब्ध होतील, यासाठी दक्ष राहावे. तसेच निविष्ठा वाटपाचे काम कोव्हीड प्रतिबंधात्मक वर्तणूकीचे पालन करून करण्यात यावे, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सोयाबीनचे 1 लक्ष 31 हजार 242 क्विंटल बियाणे, तूर 15008 क्विंटल बियाणे, ज्वारी 1065 क्विंटल, मुंग 770 क्विंटल, उडीद 760 क्विंटल बियाणांची तर कापूससाठी 25 लक्ष 59 हजार 256 पॅकेटची मागणी  नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे 16 भरारी पथकाची स्थापना तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे. तर एक जिल्हास्तरीय पथक निर्माण करण्यात आले आहे. तसेच पंचायत समिती स्तरावर गुणवत्ता नियंत्रण व तक्रार कक्षाची स्थापना करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी