२ जून पासून अत्यावश्यक सेवेसोबतच इतर दुकानेही सकाळी ७ ते २ पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी

 


जिल्हाधिकारी यांचे नवीन आदेश जारी

यवतमाळ दि, 31 (जिमाका):-  जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेसोबत इतर सेवेची दुकाने २ जून पासून १५  जून सकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून सदर दुकाने सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. केवळ कृषिशी संबंधित दुकाने 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने शनिवार आणि रविवार बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत. 

ब्रेक दि चेन अंतर्गत घालून दिलेले निर्बंध दिनांक ०१ जून, २०२१ रोजी जश्याच्या तश्या लागू राहणार असून केवळ अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी ७.०० ते सकाळी ११.०० वाजेपर्यंत सर्व निर्बंधांसाह  सुरु राहतील.

2 जून पासून सुरू असलेल्या सेवा

१. सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दुध डेअरी, बेकरी, मिठाई इ. खाद्य पदार्थाची दुकाने (ज्यामध्ये चिकन,मटन, मच्छी आणि अंडयांची दुकाने) आठवडयाची सातही दिवस सकाळी ७.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.

२. अत्यावश्यक सेवेत मोडत नाहीत अशी एकल दुकाने (Stand-alone) व जी दुकाने शॉपींग सेंटर किंवा मॉल मध्ये नाही अशी दुकाने सोमवार ते शुक्रवार पावेतो सकाळी ७.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात येत आहे. (सदर दूकाने शनिवारी व रविवारी बंद राहतील.)

कृषिशी संबंधित दुकाने 3 वाजेपर्यंत राहणार सुरू

केवळ कृषिशी संबंधित दुकाने 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच कृषी संबंधित बियाणे, खते आणि इतर माल उतरविण्यास 5 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. 

३. अत्यावश्यक व इतर सेवेच्या आस्थापना धारकांनी दुकानात नागरिकांची होणारी गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त होम डिलेव्हरीव्दारे वस्तूंचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. त्यादृष्टीने आस्थापना धारकांनी स्वतःचे व्हॉटसअप नंबर दुकाना समोर प्रसिध्द करावे व व्हॉटसअप ग्रुप व्दारे याबाबत प्रसिध्दी द्यावी. तसेच आस्थापना धारकांनी

ग्राहकांचे व्हॉटसअप नंबर/मोबाईल नंबर घेऊन त्यांना घरपोच वस्तू पुरवठा करण्यास प्राधान्य देण्यात यावे. जेणेकरुन दुकानात प्रत्यक्ष येणा-या ग्राहकांची संख्या कमी होईल व दुकानात गर्दी होणार नाही.

४. नगर परिषद/नगर पंचायत व ग्रामपंचायत यांनी त्यांचे कार्यक्षेत्रात सुरु असलेले अत्यावश्यक व इतर सेवेच्या दुकानांच्या आस्थापना धारकांकडून अत्यावश्यक व इतर सेवांची वस्तूंची विक्री जास्तीत जास्त होम डिलेव्हरी करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. यामध्ये ग्रामस्तरीय समिती व शहरातील प्रभागस्तरीय समिती यांनी सक्रियरित्या काम करुन जास्तीत जास्त ग्राहक होम डिलेव्हरीव्दारे अत्यावश्यक व इतर सेवांचा लाभ घेतील याबाबत कार्यवाही करावी. सदरील कार्यवाहीमध्ये आवश्यकतेनूसार NGO (अशासकीय संस्था) स्वयंसेवक यांचेही सहकार्य घेण्यात यावे.

दुकान मालक, दुकानातील कर्मचारी आणि घरपोच सेवेसाठी कोरोना चाचणी आवश्यक

            अत्यावश्यक व इतर वस्तू/सेवा पुरविणा-या आस्थापना चालक व त्यामधील सर्व कर्मचारी तसेच होम डिलेव्हरी व्दारे वस्तू/सेवा देणारे कर्मचारी यांनी लसीकरण करणे अथवा त्यांच्याकडे कोविड चाचणी निगेटीव्ह असल्याबाबतचा अहवाल सोबत बाळगणे आवश्यक आहे. कोविड चाचणी अहवाल हा अहवालाच्या दिनांकापासून १५ दिवसांसाठी वैध राहील. लसीकरण न केल्याचे किंवा वरील मुदतीतील कोविड निगेटीव्ह अहवाल नसल्यास शासकीय पथाकाव्दारे पहिल्या वेळेस रु. १००/- व त्यानंतर प्रत्येक वेळेस रु. २००/- दंड आकारण्यात येईल.

कोविड नियमांचे पालन न केल्यास ५ हजार दंड

            मुभा देण्यात आलेल्या आस्थापनांमध्ये दुकान मालक/कामगार व ग्राहक यांनी मास्क लावणे, सामाजिक अंतर , सॉनिटायझर किंवा हॅन्डवॉशने नियमित हाताची स्वच्छता इ. कोविड त्रिसुत्रीचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. सदरचे पालन न केल्याचे आढळून आल्यास संबधित आस्थापना धारक यांचेवर पहिल्यांदा रु. ५०००/- दंड व पुन्हा आढळून आल्यास रु. १०,०००/- दंड आकारण्यात येईल. 

इतर आस्थापना सुरू ठेवल्यास 50 हजार दंड

 अत्यावश्यक व इतर सेवाच्या मुभा देण्यात आलेल्या दुकानाव्यतीरिक्त इतर आस्थापना सुरु असल्यास तसेच अत्यावश्यक व इतर सेवेतील दुकाने दिलेल्या वेळेनतंर नियमांचा भंग करुन उघडले असल्यास त्यांचेवर रु. ५०,०००/- (रु.पन्नास हजार) दंड आकारण्यात येईल व सदरील आस्थापना कोवीड-१९ च्या आजाराची अधीसुचना अंमलात असेपर्यंत बंद करण्यात येईल व त्यांचेवर आपत्ती व्यवस्थापन कायदयानूसार गुन्हा नोंद करण्यात येईल.

            मुभा देण्यात आलेल्या दुकान मालकांनी दुकानासमोर नो मॉस्क नो एन्ट्री (मास्क नाही प्रवेश नाही) असे बोर्ड त्यासोबत कोविड त्रिसुत्रीचे पालन करण्याबाबतचे ग्राहकांना आवाहन हयाबाबत डिजीटल किंवा साधा बोर्ड दर्शनी भागात लावणे बंधनकारक राहील. मुभा देण्यात आलेल्या दुकान मालकांनी त्यांचे दुकानासमोर ग्राहकासोबत बोलतांना सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून पारदर्शक काच/प्लास्टीक कव्हर किंवा इतर शिल्ड साहीत्य ठेवावे तसेच ईलेक्ट्रानिक पेमेंट पध्दतीचा वापर करावा.

दुकानासमोर ग्राहकांना योग्य सामाजिक अंतर राखून उभे राहण्याकरीता स्पष्ट दिसेल असे वर्तुळ करण्यात यावे. दुकानासमोरील पार्कीगच्या जागेत व ओटयावर सामान ठेवण्यात येऊ नये जेणेकरुन सदर जागा ग्राहकांना उभे राहण्याकरीता वापरता येईल व गर्दी होणार नाही. लग्न घरगुती स्वरूपात केवळ 25 लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी आहे. मंगल कार्यालयात लग्न समारंभ करण्यास बंदी कायम ठेवण्यात आली आहे 

हॉटेलची घरपोच सुविधा कायम

हॉटेलची घरपोच  सुविधा पूर्वीप्रमाणे रात्री आठपर्यंत सुरू ठेवण्यात आली आहे

तसेच बँकिंग सेवा त्यांच्या नियमित वेळेनुसार सुरू राहतील.

ई-कॉमर्स मार्फत अत्यावश्यक व इतर सेवा घरपोच सुरु राहतील. सर्व शासकीय कार्यालये २५ टक्के उपस्थितीसह सुरु राहतील. तथापि कोविड १९ च्या व्यवस्थापनाचे संबधीत असलेली अत्यावश्यक सेवा (उदा. पोलीस विभाग, महसूल विभाग, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा विभाग, विदयुत वितरण विभाग, नगरपरिषद/नगरपंचायत, ग्रामपंचायत इ.) १०० टक्के उपस्थितीने सुरु राहतील. दुपारी २.०० वाजेनंतर वैद्यकीय किंवा इतर अत्यावश्यक कारणाकरीताच जाणे-येणे करीता मुभा राहील. अत्यावश्यक कारणांशिवाय कोणीही बाहेर पडल्याचे आढळल्यास शासकीय पथकामार्फत रुपये २००/- दंड आकारण्यात येईल. 

आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर  आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ , भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, १८९७ , भारतीय दंड संहिता, २८६० चे कलम १८८ व इतर संबंधित कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल.

0000000

 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी