अठरा वर्षांवरील नागरिकांच्या कोविड लसीकरणाला सुरुवात

 


Ø जिल्ह्यात पाच केंद्रावर लसीकरण

यवतमाळ, दि. 2 : महाराष्ट्र दिनापासून 18 ते 44 वयोगटातील नागरीकांचे लसीकरण  करण्याबाबत शासनाच्या सुचना प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासन व आरोग्य  विभागाने नियोजन केले. त्यानुसार जिल्ह्याला 7500 कोव्हीशिल्ड लसींचे डोजेस उपलब्ध झाल्याने जिल्ह्यात 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला 1 मे पासून सुरुवात करण्यात आली.

सध्या 18 वर्षांवरील वयोगटाकरीता जिल्ह्यात पाच केंद्रावर लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यात यवतमाळ शहरातील लोहारा व पाटीपुरा केंद्र तर पुसद, दारव्हा आणि पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयाचा समावेश आहे. जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण‍ पांचाळ यांनी लोहारा येथील लसीकरण केंद्रावर भेट दिली. त्यांच्या उपस्थितीत नोंदणी केलेल्या सिध्दे‍श दिवाकर पांडे (वय 33) या लाभार्थ्याला प्रथम लस देण्यात आली. तसेच जि.प.अध्यक्षा कालिंदा पवार यांनी लोहारा लसीकरण केंद्रावर भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनीसुध्दा दारव्हा येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन 18 ते 44 वयोगटातील लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला.

45 वर्षे वयोगटावरील नागरिकांसाठी उपलब्ध लसीनुसार नियमित मोहीम विविध केंद्रावर सुरू राहणार आहे. 18 वर्षांवरील नागरिकांनी लसीकरणाकरीता 'कोव्हीन ॲपवर' ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्यांना लस मिळणार नाही. नोंदणी केल्यानंतर संबंधित व्यक्तिने कोणत्या केंद्रावर किती वाजता जावे, याबाबत संदेश प्राप्त होईल. दिलेल्या ठराविक वेळेत केंद्रावर जावून लाभार्थ्यांनी लसीकरण करणे आवश्यक आहे. जेणेकरून लसीकरणासाठी एकाच वेळी गर्दी होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

लस घेतल्यावरसुध्दा दैनंदिन मास्कचा वापर, गर्दी टाळणे, वारंवार हात स्वच्छ धुणे, विनाकारण बाहेर न फिरणे आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करून कोरोनाची मानवी साखळी तोडण्यासाठी शासन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पाचांळ यांनी केले आहे.

यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पी.एस.चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुषमा खोडवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. जया चव्हाण, डॉ. अंकीता चंदन, आरोग्य सेविका सी.आर.मस्के, शिला भगत, एस.दोडेवार, एस.आर पठाण, लस टोचक के.एस कोळकर, माला मसराम, आशा खडसे, जयश्री राउत, श्रीमती अलोणे, डी.आर.लांडे, गणेश मोरे आदी उपस्थित होते .

००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी