जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली मान्सूनपूर्व आढावा बैठक

 


       यवतमाळ, दि. 17 : आगामी काळात मान्सूनचे आगमन लक्षात घेता जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अमोल येडगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व आढावा बैठक घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खांडेराव धरणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता श्री. सोनटक्के, विज वितरण विभागाचे अधिक्षक अभियंता सुरेश मडावी, जिल्हा कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर, बेंबळा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता श्री. बनसोड, तहसिलदार डॉ. संतोष डोईफोडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतिश मुन आदी उपस्थित होते.

            यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, मान्सून कालावधी लक्षात घेता संबंधित यंत्रणांनी मान्सूनपूर्व सर्व कामे तातडीने पूर्ण करावी. पूरप्रवण गावांची ओळख करणे, मुख्य नद्यांच्या प्रवाहामधील अडथळे काढणे, पूरप्रवण भागातील नैसर्गिक जलाशयांचे साफसफाई करणे व त्यातील गाळ काढणे तसेच सरळीकरण  करण्यात यावे. तसेच नदीकाठावरील बंधाऱ्यांची, साठवण तलावाची पाहणी करणे आणि गरज असल्यास त्यांचे बळकटीकरण करणे, डागडूजी करणे इ. कामे मान्सूनपूर्व करावी. सर्व प्रमुख धरणावर नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी व त्यांची माहिती सर्व नियंत्रण कक्षास उपलब्ध करून देण्यात यावी. पावसाचे प्रमाण व धरणातील पाण्याच्या साठ्यावर लक्ष ठेवणे, धरणाच्या आजूबाजूला राहणाऱ्या गावकऱ्यांना धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबद्दल सावधगिरीचा इशारा देण्यात यावा. धरणाचे पाणी सोडण्यापूर्वी कमीतकमी 5 ते 6 तास अगोदर सूचना द्यावी. पाणी सोडण्याबाबत संबंधीत विभागातील अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवणे. पूर परिस्थितीत व पूर परिस्थिती ओसरल्यानंतर लागणारे औषधीद्रव्यांचे पूर्व नियोजन करणे आदी बाबी प्राधान्याने कराव्यात.

जिल्ह्यांमध्ये स्वच्छता व आरोग्यदायी परिसर टिकवून ठेवण्यासाठी सर्व उपाययोजना करणे. साथीचा आजार, रोगांवर नियंत्रण व उपाययोजनेचा आराखडा तयार ठेवणे. जनावरांच्या औषधांचा मुबलक साठा पशू वैद्यकीय केंद्रावर ठेवण्यात यावा. अतिवृष्टीचा काळात जनावरांसाठी आवश्यक चाऱ्याचा साठा ठेवण्यात यावा. जिल्ह्यांमध्ये शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. आपत्तीचा प्रसंग उद्भवल्यास आपत्कालीन परिस्थितीतही शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध होईल यांचे नियोजन करण्यात यावे.

            जिल्हा व तालुकास्तरावर कार्यरत असलेल्या विभागनिहाय नोडल अधिकाऱ्यांचे नाव व संपर्क दुरध्वनी क्रमांकाची यादी तयार करून सर्व संबंधितांना उपलब्ध करून देण्यात यावी. पुरामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये आवश्यक धान्यसाठा उपलब्ध ठेवण्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कार्यवाही करावी. नुकसानीचे आकलन जलद गतीने होण्यासाठी, तलाठी, कृषी सेवक, ग्रामसेवक, बांधकाम विभागाचे अभियंता यांची तालुका स्तरीय समिती बनविण्यात यावी. तालुका स्तरावरील नियंत्रण कक्ष 24 तास सुरु ठेवावे व मान्सुन कालावधीत नुकसानीची माहिती सादर करण्याकरीता नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी व त्यांचा संपर्क क्रमांक जिल्हा कार्यालयास सादर करावा.

विद्युत खांब, झाडे पडल्यामुळे रस्ते बंद अथवा ट्रॅफीक जाम होणार नाही, याची काळजी घेवून रस्ते खुले करण्याची कार्यवाही करणे व याकरीता नियंत्रण कक्ष सुरु ठेवणे. विद्युत वितरण कंपनीने त्यांचा नियंत्रण कक्ष 24 x 7 सुरु ठेवावे, अतिवृष्टीमुळे पोल पडल्यास रिस्टोर करणे, रोहीत्र किंवा इलेक्ट्रिकल केबल पाण्याखाली आल्यास विद्युत पुरवठा खंडीत करणे, पुरपरिस्थितीमध्ये विद्युत खंडीत होणाऱ्या गावाची तपासणी करणे व आवश्यक उपाययोजना करणे, नियंत्रण कक्ष, व संबंधित अधिकारी यांचे संपर्क क्रमांक सर्व नियंत्रण कक्षास उपलब्ध करून देणे. अतिवृष्टी, पुरामुळे संपर्क तुटणारी गावे तपासणी करून संपर्क तुटणार नाही याची काळजी घेणे. अतिवृष्टी, पुरामुळे संपर्क तुटणारी गावातील तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, कृषी सेवक, यांचे संपर्क जिल्हा नियंत्रण कक्षात उपलब्ध करून देण्यात यावे तसेच तालुका नियंत्रण कक्षात व गावातील दर्शनी भागात प्रसिध्द करण्यात यावे, अशा सुचना दिल्या.

            यावेळी व्हीसीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व तहसिलदार, तालुका आरोग्य अधिकारी, सर्व गटविकास अधिकारी, सर्व मुख्याधिकारी, बांधकाम व पाटबंधारे विभागाचे सर्व कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते.

००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी