जिल्हाधिका-यांची दारव्हा, दिग्रस व पुसद येथे डीसीएचसी व सीसीसीला भेट

 



Ø दारव्हा येथील दोन किराणा दुकानांवर कारवाई व दंड

            यवतमाळ, दि. 16 : कोरोना परिस्थितीचा आढावा तसेच तालुका प्रशासनाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दारव्हा, दिग्रस व पुसद येथील डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर तसेच कोव्हीड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिका-यांसोबत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ उपस्थित होते.

सर्वप्रथम जिल्हाधिका-यांनी दारव्हा येथील डीसीएचसी ला भेट देऊन पाहणी केली. तसेच शहरातील निधी मंगल कार्यालय व कविता मंगल कार्यालय या कोव्हीड केअर सेंटरला भेट दिली. वरील तिनही ठिकाणी भरती असलेल्या रुग्णांना बाहेरचे कोणी भेटायला येता कामा नये, याबाबत येथील प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशा सुचना केल्या. तसेच सीसीसी ची क्षमता किती, सद्यस्थितीत येथे किती रुग्ण भरती आहेत, नियमित स्वच्छता होते की नाही, याबाबत विचारणा केली.

यानंतर शहरातून फेरफटका मारत असतांना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन किराणा दुकानांवर जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली. सदर दोन्ही दुकानांना प्रत्येकी 10 हजार रुपये याप्रमाणे 20 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेतांना जिल्हाधिकारी म्हणाले, कोव्हीड संदर्भात शासन आणि प्रशासनाने दिलेल्या निर्बंधाची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. पॉझेटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा त्वरीत शोध घेऊन त्यांची तपासणी करा. तसेच बफर झोन आणि प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांचे सुध्दा टेस्टिंग आणि ट्रेसिंग होणे गरजेचे आहे. तालुक्यात लसीकरणाची गती वाढवा. 45 वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोज प्राधान्याने देण्यावर भर द्यावा. संभाव्य प्रादुर्भाव लक्षात घेता तालुक्यातील 7-8 मोठ्या गावात रुग्ण ठेवण्यासाठी जागांचा शोध घ्या. जेणेकरून वेळेवर अडचण येणार नाही, अशा सुचना त्यांनी दिल्या.

यावेळी त्यांनी तालुक्यात प्रतिबंधित क्षेत्र किती, ॲक्टीव्ह रुग्ण किती आदींबाबत विचारणा करून 'जाणीव-जागृती-खबरदारी' योजनेचासुध्दा आढावा घेतला. बैठकीला उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, तहसीलदार सुभाष जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खानंदे,  गटविकास अधिकारी राजू शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी उदयसिंह चंदेल, ठाणेदार बावीस्कर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिंदे, डॉ. कदम आदी उपस्थित होते.

यानंतर जिल्हाधिका-यांनी दिग्रस व पुसद येथे भेट देऊन उपजिल्हा रुग्णालय, कोव्हीड केअर सेंटर आणि आयुर्वेदिक कॉलेजला भेट दिली व तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेतला.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी