सलग पाचव्या दिवशीसुध्दा बरे होणा-यांच्या संख्येत वाढ

 

Ø 24 तासात बाधितांपेक्षा बरे होणारे 427 ने जास्त

Ø 658 जण पॉझेटिव्ह, 1085 कोरोनामुक्त, 8 मृत्यु

       यवतमाळ, दि. 14 : चालू आठवड्यात सलग पाचव्या दिवशीसुध्दा जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-यांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर गत दोन दिवसांपासून मृत्युच्या आकड्यातही कमी आली असून जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. गत 24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या 427 ने जास्त आहे. जिल्ह्यात 658 जण पॉझेटिव्ह तर 1085 जण कोरोनामुक्त झाले असून 8 जणांचा मृत्यु झाला. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सात तर एक मृत्यु खाजगी रुग्णालयातील आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण 8451 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 658 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 7793 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5387 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2439 तर गृह विलगीकरणात 2948 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 66475 झाली आहे. 24 तासात 1085 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 59503 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1585 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.84 , मृत्युदर 2.38 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 72 वर्षीय पुरुष, मारेगाव तालुक्यातील 56 वर्षीय महिला व 77 वर्षीय पुरुष, नेर येथील 45 वर्षीय पुरुष, घाटंजी येथील 50 वर्षीय महिला, बाभुळगाव येथील 52 वर्षीय पुरुष आणि वणी येथील 65 वर्षीय पुरुष आहे. तर खाजगी रुग्णालयात यवतमाळ येथील 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला.

            शुक्रवारी पॉझेटिव्ह आलेल्या 658 जणांमध्ये 410 पुरुष आणि 248 महिला आहेत. यात पांढरकवडा येथील 128 पॉझेटिव्ह रुग्ण, यवतमाळ 95, मारेगाव 75, वणी 67, दारव्हा 56, झरीजामणी 41, राळेगाव 28, आर्णि 25, बाभुळगाव 25, महागाव 22, पुसद 20, दिग्रस 17, उमरखेड 15, नेर 14, घाटंजी 13, कळंब 9  आणि इतर शहरातील 8 रुग्ण आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 517649 नमुने पाठविले असून यापैकी 514793 प्राप्त तर 2856 अप्राप्त आहेत. तसेच 448318 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

            जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 949 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नऊ डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 30 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण 949 बेड उपलब्ध आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 402 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 175 बेड शिल्लक, नऊ डीसीएचसीमध्ये एकूण 506 बेडपैकी 173 रुग्णांसाठी उपयोगात, 333 बेड शिल्लक आणि 30 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1099 बेडपैकी 658 उपयोगात तर 441 बेड शिल्लक आहेत.  

कोव्हीशिल्डच्या दुस-या डोजचा कालावधी 12 ते 16 आठवड्यांचा : केंद्र शासनाच्या सुचनेनुसार कोव्हीशिल्ड लसीसाठी दुस-या डोजचा कालावधी 12 ते 16 आठवड्यांनी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे कोव्हीशिल्ड लसीचा पहिला डोज दिल्यानंतर दुसर डोस 12 ते 16 आठवड्याच्या अंतराने देण्यात येणार आहे. तर कोव्हॅक्सीन लसीच्या सुचनेमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसून कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोज पूर्वीप्रमाणेच चार आठवड्याच्या अंतराने देण्यात येईल. उपलब्ध लसीचा साठा प्राधान्याने दुस-या डोजसाठी करण्यात येणार असून कोव्हीशिल्ड लसीचा उपलब्ध साठा ज्या हेल्थ केअर वर्कर आणि फ्रंट लाईन वर्कर यांचा दुसरा डोस शिल्लक आहे, त्यांना प्राधान्याने तर उर्वरीत साठा 45 वर्षांवरील वयोगटातील लाभार्थ्यांच्या पहिल्या डोजसाठी वापरण्यात येईल.

जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 3 लक्ष 42 हजार 225 जणांचे लसीकरण झाले असून गुरूवारी एकाच दिवशी 3318 लोकांचे लसीकरण करण्यात आले.

 

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी