जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे वाढवा - पालकमंत्री भुमरे

 


Ø मजूरांच्या मागणीनुसार कामे उपलब्ध करून देण्याचे निर्देश

       यवतमाळ, दि. 2 : कोरोना संसर्गाची मानवी साखळी तोडणे, याला शासनाने सर्वोच्च प्राधान्याने दिले असून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संचारबंदी लागू केली आहे. परिणामी मोठ्या संख्येने मजूर वर्ग आपापल्या गावाकडे परत आले आहे. या वर्गाला कामे उपलब्ध करून देणे शासन - प्रशासनाची मुख्य जबाबदारी आहे. त्यामुळे जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे वाढवून मजुरांच्या मागणीनुसार कामे उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी दिले.

            जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार हमी योजनेच्या कामाचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी खासदार बाळू धानोरकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संगिता राठोड,  विभागीय वन अधिकारी एम.वाय. तोरो, यवतमाळचे उपवनसंरक्षक डॉ. राम गुजर आदी उपस्थित होते.

            जिल्ह्यात मग्रारोहयोची कामे वाढविली तर जास्तीत जास्त मजुरांना रोजगार उपलब्ध होईल, असे सांगून पालकमंत्री श्री. भुमरे म्हणाले, जिल्ह्यात फळबाग लागवड वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. केवळ कृषी विभागामार्फत नाही तर ग्रामपंचायतीमार्फतसुध्दा फळबाग लागवड कार्यक्रम राबवा. दिव्यांग व्यक्तिंनी रोजगार हमी योजनेंतर्गत कामाची मागणी केली असता त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार कामे उपलब्ध करून द्यावीत. लेबर बजेट कृती आराखड्याअंतर्गत अडचणी निर्माण होऊ देऊ नका. बांधावरील वृक्षलागवड वाढविण्यासाठी प्रयत्न करा, अशा सुचना त्यांनी दिल्या.

            रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात निर्गमित जॉबकार्डची संख्या 4 लक्ष 18 हजार 418 असून सक्रीय जॉबकार्डची संख्या 1 लक्ष 26 हजार 687 आहे. जिल्ह्यात मजुरांची एकूण संख्या 10 लक्ष 35 हजार 331 आहे. यापैकी सक्रीय मजूर 2 लक्ष 58 हजार 629 आहे. सन 2021 - 22 मध्ये रोजगाराची मागणी केलेल्या कुटुंबाची संख्या 20451 असून मजुरांची संख्या 33374 आहे. सद्यस्थितीत ग्रामपंचायत यंत्रणेमार्फत 1425 कामे सुरू असून यावर 10453 मजूरांची उपस्थिती, कृषी विभागाच्या 8 कामांवर 70 मजूर, वन विभागाच्या 32 कामांवर 651 मजूर, सामाजिक वनीकरण विभागाच्या 25 कामांवर 213 मजूर, जि.प. बांधकाम विभागाच्या 97 कामांवर 2018 मजूर, जि.प. सिंचन विभागाच्या 25 कामांवर 665 आणि सा.बा. विभागाच्या दोन कामांवर 33 मजूर अशा एकूण 1614 कामांवर 14013 मजूरांची उपस्थिती असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी संगिता राठोड यांनी दिली.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी