उद्दिष्टापैकी 60 टक्के पीक कर्जवाटप मे अखेरपर्यंत करा

 


                                                          

Ø जिल्हाधिका-यांनी घेतला पीक कर्जवाटपाचा आढावा

यवतमाळ, दि. 5 : खरीप हंगामात शेतक-यांना पीक कर्जवाटप हा महत्वाचा विषय आहे. कोरोनाची परिस्थिती असली तरी सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच शासनाच्या नियमांचे पालन करून शेतक-यांना कर्जवाटपासाठी बँकांनी उत्साहपूर्वक काम करावे. सध्या कर्जवाटपाची गती जेमतेम आहे. ही गती वाढवून मे महिन्याच्या अखेपर्यंत सर्व बँकांनी 60 टक्के पीक वाटपाचे उद्दिष्ट साध्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात बँकर्सच्या बैठकीत पीक कर्जवाटपाचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अमर गजभिये, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) रमेश कटके, स्टेट बँक ऑफ इंडियाचे गिरीष कोनेर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपसरव्यवस्थापक आर. आर. सिध्दीकी आदी उपस्थित होते.

गत आर्थिक वर्षाची बँकांची सर्व प्रलंबित कामे संपत आली आहे. त्यामुळे आता पीक कर्जवाटपाची गती वाढविणे आवश्यक आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, जिल्ह्यात सद्यस्थितीत 15 टक्के पीक कर्जवाटप झाले आहे. जून अखेरपर्यंत संपूर्ण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मे अखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत 60 टक्के कर्जवाटप झालेच पाहिजे. त्यासाठी बँकांनी रोजचे उद्दिष्ट ठरवून शेतक-यांना वाटप करावे. पीक कर्जासाठी शेतकरी बँकाकडे येणारआहे. बँकासुध्दा शेतक-यांना सहकार्य करीत आहे, असा संदेश     शेतक-यांमध्ये पोहचला पाहिजे. किचकट प्रक्रिया किंवा कागदपत्रांअभावी अडवणूक होऊ देऊ नका.

कोणत्या बँकेने रोज किती शेतक-यांना, किती कर्जवाटप केले आहे, याची तपासणी जिल्हा अग्रणी बँकेकडून केली जाईल. त्यामुळे कसे नियोजन करायचे हे आधीच बँकांनी ठरवून घ्यावे. बँकांनी शेतक-यांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. एखाद्या प्रतिष्ठित शेतक-यांमार्फत गावातील इतर शेतक-यांपर्यंत कर्जवाटप सुरू झाल्याचा संदेश पोहचवा. प्रत्येक आठवड्याला पीक कर्जवाटपाचा आढावा घेण्यात येईल. यात कोणत्याही बँकांची कामगिरी निराशाजनक दिसता कामा नये, अशाही सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या. यावेळी त्यांनी बँकनिहाय पीक कर्जवाटपाचा आढावा घेतला.

खरीप हंगाम 2020-21 मध्ये जिल्ह्याला 2210 कोटी रुपयांचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. 4 मे 2021   पर्यंत 40564 शेतक-यांना 321 कोटी 19 लक्ष रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. यात सर्वाधिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 33952 शेतक-यांना 248 कोटी 37 लाख रुपये, स्टेट बँक ऑफ इंडियाने 2331 शेतक-यांना 26 कोटी 27 लाख, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने 1248 शेतक-यांना 13 कोटी 12 लाख रुपये पीक कर्जवाटप केले केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

बैठकीला बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडीयन बँक, स्टेट बँक ऑफ इंडीया, आयडीबीय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे प्रतिनिधी प्रत्यक्ष तर इतर बँकेचे प्रतिनिधी व्हीसीद्वारे उपस्थित होते.

००००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी