रटीई अंतर्गत प्रवेशासाठी सोमवारी सोडत
*3115 विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल
*स्वयंचलित सोडतीने मिळणार प्रवेश
यवतमाळ, दि. 4 : शिक्षणाचा हक्क अंतर्गत दुर्बल व वंचित घटकांसाठी 25 टक्के राखीव जागांवर ऑनलाईन प्रवेश अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी सोमवारी, दि. 6 मार्च रोजी सकाळी 10 वाजता सोडत काढण्यात येणार आहे.
शिक्षण हक्क अधिनियम 2009, महाराष्ट्र बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियमानुसार 2017-18 या सत्रात दुर्बल आणि वंचित घटकासाठी 25 टक्के राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. या जागांवर प्रवेशासाठी 193 शाळांची नोंदणी पुर्ण झाली आहे. संपूर्ण राज्यात 10 जानेवारीपासून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यात 25 टक्के प्रवेशांतर्गत नर्सरीसाठी 1 हजार 94 जागा, तसेच पहिलीसाठी 647 अशा एकूण 1 हजार 741 जागा राखीव आहेत. यात 3 हजार 195 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरले आहेत.
यातील प्रवेशाची पहिली लॉटरी सोमवारी जिल्हा परिषद सभागृह येथे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत काढण्यात येणार आहे.
अर्ज करताना पालकांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर लॉटरीचा दिनांक, निवड झालेल्या शाळेचे नाव, प्रवेशाचा कालावधी आदी माहिती एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे पालकांनी student.maharashtra.gov.in मध्ये आरटीई पोर्टल संकेतस्थळावर लॉगईन-आयडी आणि पासवर्डद्वारे लॉग ईन करून प्रवेश निश्चिती पत्राची प्रिंट काढून संबंधित शाळेत 7 ते 15 मार्च दरम्यान आवश्यक मुळ कागदपत्रासह उपस्थित राहून प्रवेश घ्यावा लागणार आहे. या शाळेत कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. प्रवेश घेतला नसल्यास संबंधित विद्यार्थ्याला पुढील सोडतीमधून बाद करण्यात येणार आहे. प्रवेशामध्ये अडचण आल्यास पालकांनी गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या आरटीई हेल्‍प सेंटरशी संपर्क साधावा, याबाबतची माहिती वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नसल्यास उर्वरीत जागांसाठी सोडती काढण्यात येणार आहे. तसेच अंतिम सोडत एनआयसीतर्फे ऑनलाईन स्वयंचलित सोडत करण्यात येणार आहे. सोडतीवेळी नागरीकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.
00000


ग्रामीण भागातील संस्थांनी लघु उद्योगातून प्रगती साधावी
- गणेश शिंदे
*अटल महापणन कार्यशाळेला उत्स्फुर्त प्रतिसाद
यवतमाळ, दि. 4 : सहकारातील ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था, जिनिंग प्रेसिंग संस्था, तसेच खरेदी विक्री संस्थांनी लघु उद्योग स्थापन करून संस्था बळकट करण्यासोबतच सभासदांचीही आर्थिक उन्नती साधावी, असे प्रतिपादन पुणे येथील निर्मिती उत्पादनचे संचालक गणेश शिंदे यांनी केले. ते अटल महापणन विकास अभियानांतर्गत गुरूवारी, दि. 2 मार्च रोजी आयोजित कार्यशाळेत बोलत होते.
कार्यशाळेला जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन, जिल्हा मार्केटींग अधिकारी बी. एस. डाखरे, जिल्हा विशेष लेखापरिक्षक एस. एस. बनसोड, सहाय्यक निबंधक अर्चना माळवे, वणी येथील वसंत जिनिंगचे अध्यक्ष देविदास काळे आदी उपस्थित होते.
गणेश शिंदे यांनी, संस्थेच्या संचालक मंडळाला घरी दैनिक गरजेच्या वस्तू लागतात त्याच वस्तू बाजारातून ठोक भावात आणून पहिले संचालक मंडळाने विकत घ्याव्यात. त्यानंतर संस्थेच्या सभासदांना विक्री करावी. त्यातुन कमी भांडवलातून संस्थेचा व्यवसाय सुरु होईल. शेतकरी उत्पादन घेतात, परंतू त्याची त्यांना विक्री मात्र करता येत नाही. त्यामुळे शेकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाचे ब्रान्डींग कंपनी करतात, जादा दराने विक्री करतात, मात्र उत्पादन करणाऱ्याला नफा कमी मिळातो. या उलट विक्री करणारा भरघोस नफा मिळवितो. त्यामुळे ग्रामीण भागातील संस्थांनी त्यांच्या सभासदांनी उत्पादित केलेल्या शेतमालाची ब्रान्डींगचे करावी, तसेच ते संस्थेच्या सभासदांना विक्री करावी.
राज्यातील ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था, खरेदी विक्री संघ, तसेच जिनिंग प्रेसिग संस्थांच्या बळकटीकरणासाठी अटल महापणन विकास अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ, जिनिंग प्रेसिंग संस्था, तसेच ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे कर्मचारी, संचालकांची कार्यशाळा घेण्यात आली.
देविदास काळे यांनी जिनिंग संस्था नोंदणीपासून ते आजपर्यंत संस्थेने केलेली वाटचाल, तसेच संस्थेच्या भविष्यातील योजनांबाबत मार्गदर्शन केले. संस्थेच्या अडीअडचणींवर मात करुन संस्थेने प्रगती करावी, त्याचप्रमाणे जिल्ह्यातील संस्थांनीही प्रगती करावी असे मत व्यक्त केले. सहाय्यक निबंधक सुचिता गुघाने यांनी अटल महापणन विकास अभियानातील विविध उपक्रमांची माहिती, तसेच संस्था बळकटीकरणासाठी करावयाच्या उपाययोजना सांगितल्या.
कार्यक्रमासाठी सहाय्यक निबंधक बालाजी काळे, मनोज भगत, हनुमंत आठवले यांनी पुढाकार घेतला. अजित डेहनकर यांनी सूत्रसंचालन केले. सहाय्यक निबंधक अर्चना माळवे यांनी आभार मानले.
00000
सोमवारी तुरळ पावसाची शक्यता
यवतमाळ, दि. 4 : नागपूर येथील प्रादेशिक मौसम पूर्वानुमान केंद्राने हवामानाचा अंदाज जाहिर केला आहे. त्यानुसार सोमवार ते बुधवार, दि. 6 ते 8 मार्चदरम्यान विदर्भात काही‍ ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरीकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
00000
सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची बुधवारी सभा
            यवतमाळ, दि. 4 : सार्वजनिक बांधकाम विभाग यवतमाळ अंतर्गत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची काम वाटप सभा 8 मार्च 2017 रोजी दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या सभागृहात होणार आहे. या सभेला आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन यवतमाळ येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी