प्रत्येकाने पाणी बचतीचा संकल्प करावा
-जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह
*जलजागृती सप्ताहाचे उद्‌घाटन
*सप्ताहभर विविध कार्यक्रम राबविणार
*कलश पुजन व जलरथाचे लोकार्पण
यवतमाळ, दि. 16 : पाणी निर्माण करता येत नाही. पाणी बचतीतूनच ते निर्माण होते. भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास फार मोठ्या संकटाला समोर जावे लागेल. त्यामुळे पाणी बचतीचे महत्त्व ओळखून प्रत्येकाने पाणी संवर्धन, बचत व पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविण्याचा संकल्प केला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास नगराध्यक्ष कांचन चौधरी, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काटपल्लीवार, जलतज्ज्ञ प्राचार्य अविनाश शिर्के, शंकर अमिलकंठावार, कृषि विज्ञान केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. सी. यू. पाटील, कार्यक्रम समन्वयक डॉ. अनिल ठाकरे, प्रयासचे सुरेश राठी, कार्यकारी अभियंता श्री. बारापात्रे आदी उपस्थित होते.
प्रत्येकाने पाण्याची काटकसर करून बचतीचा मार्ग अवलंबिला पाहिजे. जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरल्यास पाणी पातळी वाढून पिण्याच्या पाण्यासह शेतकऱ्यांना सिंचनासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. लोकांमध्ये जलसंवर्धनाबाबत जनजागृतीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले. यावेळी प्राचार्य श्री. शिर्के आणि शंकर अमिलकंठावार यांनी जलबचतीबाबत मार्गदर्शन केले. नगराध्यक्ष श्रीमती चौधरी, डॉ. पाटील, डॉ. ठाकरे यांच्यासह वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचेही यावेळी भाषण झाले.
प्रास्ताविक श्री. काटपल्लीवार यांनी केले. सुरवातीस दिपप्रज्वलानासह जिल्ह्यातील प्रमुख नद्या असलेल्या अरूणावती, निर्गुडा, बेंबळा, अडाण, निळोणा या नद्यांचे जल असलेल्या पाच कलशांचे पुजन करण्यात आले. जल जागृतीसाठी जलरथ तयार करण्यात आला असून हा रथ जिल्हाभर फिरणार आहे. जिल्हाधिकारी यांच्यासह अन्य मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून रथाचा शुभारंभ केला.
सप्ताहभर विविध कार्यक्रम राबविले जाणार असून दि. 17 मार्च रोजी विविध प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील गावात कार्यशाळा, चर्चासत्र व सभा घेतल्या जातील. दि. 18 मार्च रोजी पाणीवापर संस्थांसाठी कार्यशाळा होईल. दि. 19 मार्च रोजी जिल्हा व तालुकास्तरावर जलजागृती मॅराथॉन काढण्यात येईल. दि. 21 मार्च रोजी पांढरकवडा येथे पाणी वापर संस्थांसाठी कार्यशाळा व दि. 22 मार्च रोजी पाणीवापर संस्थांच्या पदाधिकारी व महिला मेळावा घेतला जाणार असून या दिवशी सप्ताहाचा समारोप होईल.
000000
क्रीडा पुरस्कारासाठी नामांकन आमंत्रित
यवतमाळ, दि. 16 : केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, तसेच क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे पुरस्कृत ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2017साठी केंद्र शासनास नामनिर्देशीत प्रस्ताव 28 एप्रिल 2017 पर्यंत सादर करावयाचे आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील सर्व खेळाडू, संघटक, क्रीडा संघटना आणि मंडळे आणि मार्गदर्शक यांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात 5 एप्रिल 2017 पर्यंत तीन प्रतीत बंद लिफाफ्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू स्टेडीयम, गोधणी रोड येथे कार्यालयीन वेळेत सादर करावे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटीये यांनी कळविले आहे.
00000
जिल्हास्तरीय लोक सांस्कृतिक महोत्सव उत्साहात
यवतमाळ, दि. 16 : नेहरू युवा केंद्राच्या युवा कार्यक्रम आणि केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयातफे येथील जवाहरलाल नेहरू जिल्हा क्रीडा संकुलात शुक्रवारी, दि. 10 मार्च रोजी जिल्हास्तरीय लोक सांस्कृतिक महोत्सव उत्साहात पार पडला.
या महोत्सवाच्या उद्घाटनाला निता कांबळे, नेहरू युवा केंद्राचे अनिल ढेंगे, हरीश राठोड, कविता पवार, भालचंद्र राऊत, प्रेम निनगुरकर, अभिषेक यादव आदी उपस्थित होते. या महोत्सवात यवतमाळच्या नक्षत्र ग्रुपच्या आईचा जोगवाला प्रथम, पुसद येथील आकाशवाणी ग्रुपच्या गोंधळाला द्वितीय, यवतमाळच्या रामजी चन्नावार विद्यालयाच्या कोळी नृत्याला तृतीय क्रमांक देण्यात आला. कार्यक्रमासाठी आनंद पटेल, सुरज भाकरे, रवी दांडगे, सुभाष गिरी यांनी पुढाकार घेतला.
00000



Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी