महिला अधिकाऱ्यांनीच महिला सक्षमीकरण करावे
-जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह
*जिल्हाधिकारी कार्यालयात महिला दिन साजरा
*महिलांना मतदान ओळखपत्राचे वाटप
*महिला अधिकाऱ्यांकडून निवेदन सादर
यवतमाळ, दि. 8 : अधिकारीपदी कार्यरत असलेल्या महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले असते. त्यामुळे त्यांनी काम करणाऱ्या आणि घरगुती काम करणाऱ्या महिला असा भेदभाव न करता महिला सक्षमीकरणाची जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात आयोजित जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी यवतमाळच्या नगराध्यक्ष कांचन चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक सिंगला, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, महिला व बालविकास अधिकारी अर्चना इंगोले, जिल्हा कारागृहाच्या अधीक्षक किर्ती चिंतामणी, सरकारी अभियोक्ता निती दवे, डॉ. लिला भेले आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, समाजात असंख्य महिला त्यांच्या अधिकारापासून वंचित आहे. त्यांना त्यांच्या अधिकार आणि हक्काची जाणीव करून देण्यासाठी महिलांनीच पुढे येण्याची गरज आहे. या महिलांचा विकास साधण्यासाठी अधिकारीपदावरील महिला चांगल्याप्रकारे कार्य करू शकतील. अधिकारी महिलांनी समाजातील सर्व घटकातील महिलांच्या विकासासाठी कार्य करावे. भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना समानतेचा अधिकार होता. स्वातंत्र्य चळवळीतही त्यांनी सक्रीय सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे महिलांना भयमुक्त वातावरण उपलब्ध करून देणे आवश्यक असून प्रशासनातर्फे त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल.
सामाजिक जीवनात महिलांचा प्रभाव अधिक असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्वावर त्यांच्या आईचा प्रभाव अधिक होता. त्यामुळेच त्यांनी महिलांप्रती एका उच्चकोटीच्या आदराचे उदाहरण निर्माण केले आहे. आज पुरूषांची महिलांप्रती आदराची भावना महिलांनी एक आई म्हणून विकसीत करणे गरजेचे आहे. महिलांची प्रामुख्याने मागणी असणारी दारूबंदीच्या मागणीबाबत राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील दारूची दुकाने 31 मार्चपुर्वीच हटविण्यात येतील. तसेच येत्या काळात दारूच्या दुकानांना परवानगी देण्यात येणार नसल्याचे सांगितले. विविध क्षेत्रासोबतच महिला राजकारणातही सक्रीय होत आहे. महिलांमध्ये मानसिक शक्ती मोठी असते, त्यामुळे राजकारणातील सर्व बंधने झुगारून महिलांनी राजकारणातही यशस्वी व्हावे, असे आवाहन केले.
श्रीमती चौधरी यांनी महिलांचा आदर होणे गरजेचे आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी नगरपालिकेतर्फे पावले उचलण्यात येणार असल्याचे सांगितले. श्री. सिंगला यांनी महिलांच्या विकासासाठी महिलांनीच समोर येणे गरजेचे आहे. स्त्री-पुरूष समानतेची शिकवणूक देण्याची जबाबदारी महिलांवर आहे. महिलांनाही मानाचे स्थान मिळावे, यासाठी महिलांनी संघर्ष करणे गरजेचे असल्याचे सांगितल. एम. राजकुमार यांनी महिलांच्या समस्या दूर करण्यासाठी पोलिस प्रशासन सदैव तत्पर आहे. अत्याचाराची प्रकरणे समोर येण्यासाठी महिलांनी पुढे येण्याची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी किर्ती चिंतामणी, निती दवे, डॉ. लिला भेले, करूणा महतारे, अर्चना वानखेडे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. श्रीमती इंगोले यांनी प्रास्ताविक केले. निवडणूक नायब तहसिलदार रूपाली बेहरे यांनी महिलांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याचे आवाहन केले. शालीनी बुटले यांनी सूत्रसंचालन केले. सुरवातीला उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जिल्हाधिकारी यांनी उपस्थित सर्वांना महिला दिनानिमित्त शपथ दिली. महिलांसाठी विशेष मतदार नोंदणीत जिल्ह्यातील 1 हजार 26 महिलांनी नोंदणी केली आहे. या कार्यक्रमात नव्याने मतदारयादीत नोंदणी केलेल्या महिलांना मतदान ओळखपत्र देण्यात आले.
00000
आजपासून महारेशीम अभियानास सुरवात
यवतमाळ, दि. 8 : जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वतीने 9 ते 25 मार्च या दरम्यान जिल्ह्यात महारेशीम अभियान राबविण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना रेशीम शेतीकडे वळविणे आवश्यक आहे. शेतकऱ्याच्या उत्पन्ना वाढ व्हावी, शासकीय सहाय्याची माहिती व्हावी, यासाठी महारेशीम अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाची सुरवात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गुरूवार, दि. 9 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. जिल्ह्यातील कृषि, हवामान आणि शेत जमिन रेशीम उद्योगास अनुकुल आहे. तसेच हा उद्योग कृषि व वन संपत्तीवर आधारीत रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला उद्योग आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील आर्थिक स्तर व जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.
9 मार्च रोजी वरूड, यावली (ता. बाभुळगाव), 10 मार्च मादनी, दाभा (ता. बाभुळगाव), 11 मार्च वाळकी, पाथ्रट गोळे (ता. नेर), 12 मार्च धनज, वटफळी सलामी (ता. नेर), 14 मार्च पिंपरी, लासिना (ता. यवतमाळ), 15 मार्च भिसनी, बोरगाव (ता. यवतमाळ), 16 मार्च श्रीरामपूर, कृष्णापूर (ता. राळेगाव), 17 मार्च केतुर्ली, अंतरगाव (ता. राळेगाव), 18 मार्च डोंगरखर्डा, पिंपळशेंडा (ता. कळंब), 19 मार्च पारर्डी सावळापूर, ईचोरा (ता. कळंब), 20 मार्च शिवनी, तिवरी (ता. दिग्रस), 21 मार्च पारडी, हुडी, केवठा (ता. पुसद), 22 मार्च ढाकणी, अकोली (ता. उमरखेड), 23 मार्च चूरमुरा टाकळी (ता. उमरखेड), 24 मार्च आंबोडा (ता. महागाव), 25 मार्च तळेगाव, डोर्ली (ता. यवतमाळ) याठिकाणी रेशीम महाअभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
00000
आरोग्‍य विभागात जागतिक महिला दिन साजरा
*पुरस्कार देऊन महिलांचा गौरव
यवतमाळ, दि. 8 : जिल्‍हा परिषदेच्या आरोग्‍य विभागातर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्‍य साधून डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्‍कार आणि उत्कृष्‍ठ आशा पुरस्कार देऊन महिलांचा सत्‍कार करण्‍यात आला.
यावेळी उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले आरोग्‍य आणि शिक्षण सभापती नरेंद्र ठाकरे यांनी स्त्रिया सर्वच क्षेत्रात उत्‍कृष्‍ठ काम करीत असल्‍याचा उल्‍लेख केला. विषेशता ग्रामीण भागात आरोग्‍य विभागातील शेवटचा कर्मचारी म्‍हणजे आशा कार्यकर्ती चांगल्‍याप्रकारे आरोग्‍यसेवा देत असल्‍यामुळे आज माता मुत्‍यू व बाल मृत्‍यूचे प्रमाण कमी झाल्‍याचे सांगितले. प्राथमिक शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यानी स्त्रियांना विज्ञानवादी होण्यासाठी आवाहन केले. सि्त्रयांच्‍या सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन केले. जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. के. झेड. राठोड यांनी प्रास्‍ताविकातून डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्‍कार आणि आशा पुरस्कार देण्‍यामागची भूमिका विषद केली.
            आनंदीबाई जोशी गौरव पुरस्‍कार ग्रामीण रूग्‍णालयस्‍तरीय प्रथम पारितोषिक व सन्‍मान चिन्‍ह ग्रामीण रूग्‍णलय, आर्णी यांना देण्‍यात आले. प्राथमिक आरोग्‍य केंद्रस्‍तरीय प्रथम पारितोषिक प्राथमिक आरोग्‍य केंद्र शेंबाळपिंपरी, द्वितीय प्राथमिक आरोग्य केंद्र हरसूल आणि तृतीय प्राथमिक आरोग्य मुळावा, तर उपकेंद्रस्‍तरीय प्रथम पारितोषिक उपकेंद्र खैरी, द्वितीय कुष्‍णापूर आणि तृतीय पारितोषिक झमकोला उपकेंद्राला देण्‍यात आले. ग्रामीण भागात उत्‍कृष्‍ठ काम करणाऱ्या आशा स्‍वयंसेविकेतून प्र‍थम परितोषिक विडूळ आरोग्‍य केंद्रातील कौश्‍ल्‍या राठोड आणि द्वितीय जांब बाजार आरोग्‍य केंद्रातील सुनिता सुदाम चव्‍हाण तसेच इतर सेवेत उत्‍कृष्‍ठ काम करणाऱ्या छाया चालेकर, नंदा चिंचे, सुनिता धोबे, शुभांगी जाधव, ज्‍योती टोपलेवार यांना सन्‍मान चिन्‍ह आणि रोख रकक्‍म मान्‍यवरांचे हस्‍ते देऊन गौरविण्‍यात आले.
            महिला दिनाचे औचित्‍य साधून आरोग्‍य सेवेत विशेष योगदान दिल्‍याबद्दल महिला वैद्य‍कीय अधिकारी, आरोग्‍य सेविका, आरोग्‍य सहायिका, तसेच कार्यालयीन कर्मचारी यांचे मान्‍यवरांचे हस्‍ते सन्‍मान पत्र देऊन सन्‍मानित करण्‍यात आले. जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. टी. जी. धोटे आणि आशा स्‍वयंसेविका गट प्रर्वतक यांनी मार्गदर्शन केले. डॉ. डी. डी. भगत, डॉ. लव्‍हाळे, डॉ. पी. एस. चव्‍हाण, डॉ. कोषटवार, डॉ. आगरकर उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी प्रशांत पाटील, श्री. चव्‍हाण, वैशाली काकदे, श्री. मनवर, सचिन विरूटकर, श्री. पोले, अभय राठोड, श्री. येडसकर, श्रीमती तिरपुडे यांनी पुढाकार घेतला.
00000
मार्च महिन्यासाठी केरोसिनचे दुप्पट नियतन मंजूर
यवतमाळ, दि. 8 : जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना वितरीत करण्यासाठी मार्च महिन्यांचे केरोसिन नियतन मंजूर करण्यात आले आहे. घाऊक, अर्धघाऊक परवानाधरकांना उचल करण्याबाबत कळविण्यात आले आहे. 1932 केएल केरोसिनचा यात समावेश आहे. यापैकी 876 केएल केरोसिनचे वितरण द्वार प्रणाली अंतर्गत करण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात 960 केएल केरोसिनचे नियतन मंजूर झाले होते.
नियतनाबाबत सर्व तहसिलदारांना कळविण्यात आले असून शिधापत्रिकाधारकांना त्यांना देय असलेल्या प्रमाणात वितरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यानुसार परवानाधारकांनी मुदतीत नियतनाची उचल करून त्याचे वाटप करावयाचे आहे. उचल उशिरा केल्यास मुदतवाढ देण्यात येणार नाही. तसेच वाटप व्यवस्थित होते किंवा नाही यावर लक्ष ठेवण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी यांनी केल्या आहेत.
केरोसिनचे वाटप आकारणी करण्यात आलेल्या दरातच करावयाची आहे. महिन्याच्या अखेरच्या तारखेस तालुकानिहाय वाटपाची यादी सादर करणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

 00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी