आज जलजागृती सप्ताहाचे उद्‌घाटन
*विविध कार्यक्रमाचे आयोजन
यवतमाळ, दि. 15 : जिल्ह्यात जलजागृती सप्ताह 16 ते 22 मार्चदरम्यान राबविण्यात येत आहे. या सप्ताहाचे उद्घाटन गुरूवारी, दि. 16 मार्च रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात होणार आहे. या सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. जागतिक जलदिनानिमित्ताने आयोजित उपक्रमांमध्ये नागरिकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे.
जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्या हस्ते होणार आहे. यात जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमधील पाण्याचे कलश पुजन आणि जलजागृती सप्ताहानिमित्त चर्चासत्र, तसेच जलप्रतिज्ञेचे सामुदायिक वाचन करण्यात येणार आहे. 17 मार्च रोजी लाभक्षेत्रातील प्रत्येक गावात नागरिकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. यात गावालगत असलेली धरणांची माहिती, पाण्याची उपलब्धता, सिंचनाच्या विविध पद्धती, पिकांना लागणारे पाणी, पाण्याच्या बचतीसाठी अवलंबायची सुक्ष्मसिंचन पद्धती याबाबत तालुका कृषी अधिकारी नागरिकांचे प्रबोधन करतील. तसेच यावेळी जलहमी अंतर्गत लाभधारकांची नोंदणी करण्यात येणार आहे. क्षेत्रीयस्तरावरील निरीक्षण वाहनांवर जलजागृतीबाबतचे बॅनर लावण्यात येणार आहे.
18 मार्च रोजी कळंब, राळेगाव तालुक्यातील प्रकल्पावरील पाणी वापर संस्था व लाभधारकांची कार्यशाळा राळेगाव येथे घेण्यात येणार आहे. यात कळंब, राळेगाव, नेर, दारव्हा, दिग्रस तालुक्यातील प्रकल्पांवरील पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी आणि लाभधारक सहभागी होतील. 19 मार्च रोजी सकाळी साडेसात वाजता पोस्टल मैदान येथे जलजागृती मॅराथॉन (जलदौड) आयोजित करण्यात आली आहे. यात यवतमाळ येथील शासकीय कर्मचारी यांच्यासह नागरीक सहभागी होतील.
21 मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये जलजागृती सप्ताहानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. गावातील शाळेतील विद्यार्थी जलप्रतिज्ञा घेणार असून विद्यार्थ्यांची जलदिंडी काढण्यात येणार आहे. तसेच निबंध, चित्रकला आणि स्लोगन स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यासोबतच पांढरकवडा, झरी, वणी, मारेगाव, घाटंजी तालुक्यातील प्रकल्पांवरील पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी आणि लाभधारकांसाठी पांढरकवडा येथे कार्यशाळा घेण्यात येणार आहे. 22 मार्च रोजी पालकमंत्री मदन येरावार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात सप्ताहाचा समारोप करण्यात येणार आहे. यानिमित्ताने कार्यशाळा, महिला मेळावा घेण्यात येणार आहे.
00000
कलापथकातून एड्सविषयी प्रभावी जनजागृती
-जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह
*लोककलेतून जनजागृती अभियानाचा शुभारंभ
यवतमाळ, दि. 15 : जनजागृतीसाठी इतर माध्यमांच्या तुलनेत कलापथकाचे स्थान उच्च आहे. त्यामुळे कलापथकाच्या माध्यमातून व्यापक आणि प्रभावी जनजागृती होईल, असे मत जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी व्यक्त केले. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात कलापथकाच्या माध्यमातून एड्स जनजागृती अभियानाला सुरवात करण्यात आली, यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. टी. जी. धोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. के. झेड. राठोड, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. डी. डी. भगत आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, लोकांच्या बोलीभाषेत, स्थानिक शैलीत आणि त्यांना परिचित असलेल्या पोवाडा, भारूड, शाहिरी, गोंधळ, लावणी, लोकनाट्य, बतावणी आदी कलाप्रकारातून कलापथकातर्फे एचआयव्ही, एड्सविषयी जनजागृती करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. लोककला ही जनजागृतीसाठी एक प्रभावी माध्यम आहे. ग्रामीण तसेच शहरी भागात लोककलेच्या माध्यमातून आणि मनोरंजनातून जनजागृती करण्यात येणार आहे. कलापथकाचे सादरीकरण मुख्यत: अतिसंवेदनशील क्षेत्रात केंद्रीत केले जाईल. तसेच विद्यापीठातील युवकांमध्ये एड्सबाबत योग्य माहिती लोककलेच्या माध्यमातून पोहोचविण्यात येईल.
जिल्ह्यात एचआयव्ही, एड्सविषयी 20 गावात कलापथकतर्फे लोककलेच्या माध्यमातून 15 मार्चपासून जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान जिल्हा एड्स नियंत्रण पथक, जिल्हा सामान्य रूग्णालय आणि नवचैतन्य बहु‍विकास संस्था यांच्या माध्यमातून लक्ष्यगट हस्तक्षेप, स्वयंसेवी संस्था यांच्या सहयोगाने यशस्वीरित्या राबविण्यात येईल.
00000
गौण खनिजाचा वसुलीसाठी शुक्रवारी आढावा
यवतमाळ, दि. 15 : गौण खनिजाच्या वसुलीसाठी शुक्रवारी, दि. 17 मार्च रोजी आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
शासकीय आणि निमशासकीय विभागातर्फे दरवर्षी विविध कामे करण्यात येतात. त्या कामांमध्ये गौण खनिजाचा वापर करण्यात येतो. शासकीय कामाच्या अंदाजपत्रकानुसार मंजूर केलेल्या गौण खनिजाच्या परिमानाप्रमाणे देय रॉयल्टी शासन जमा होणे आवश्यक आहे. त्यानुसार देय रॉयल्टी शासन जमा झाली किंवा नाही, याबाबत तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याकरीता लेखा परिक्षण पथक नियुक्त करण्यात आले आहे. सदर पथकांमार्फत मागील चार महिन्यात विविध शासकीय कार्यालयाचे लेखा परिक्षण करण्यात आले. या तपासणीमध्ये 11 कोटी 62 लाख रूपयांची थकबाकी असल्याचे लेखा परिक्षण पथकाने अहवाल सादर केलेला आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी 10 मार्च रोजी संबंधित कार्यालय प्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली. ही रक्कम 20 मार्चपर्यं जमा करणे आवश्यक आहे. या रक्कम वसुलीचा आढावा शुक्रवारी आयोजित बैठकीत घेण्यात येणार आहे, असे अपर जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
00000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी