विविध विकास कामे वेळेत पूर्ण करा
- पालकमंत्री मदन येरावार
* पालकमंत्र्यांकडून विविध विकास कामांचा आढावा
       यवतमाळ, दि.3 : जिल्ह्यात सुरु असलेले विविध विकास कामे वेळेत पूर्ण करा. मार्चपूर्वी आवश्यक कामे पूर्ण झाली पाहिजे, असे निर्देश पालकमंत्री मदन येरावार यांनी दिले.
            महसूल भवन येथे त्यांनी विविध विकास कामांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला पालकमंत्र्यांसह वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक कुमार सिंगला, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अशोक राठोड, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहेत्रे, जिल्हा नियोजनर अधिकारी डी.टी.राठोड, कार्यकारी अभियंता श्री.लाखानी यांच्यासह राष्ट्रीय खाद्य महामंडळ, खनिकर्म आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
            यावेळी श्री.येरावार यांनी जिल्ह्यात तुर खरेदी केंद्र व खरेदीचा आढावा घेतला. वैद्यकीय महाविद्यालयाचे विविध समस्या जाणून घेवून त्या सोडविण्यासाठी मुंबई येथे स्वतंत्र बैठक घेण्याबाबत त्यांनी सांगितले. यवतमाळ येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, महाविद्यालयातील टिचर्स स्टाफ, अर्धवट निवासस्थाने, एमआरआय सुविधा यावर त्यांनी आढावा घेतला.
जिल्‍ह्यातील जलपुर्तीच्या अर्धवट सिंचन योजनाचा आढावा घेतांना या योजना वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. खनिकर्म विकास निधीतून घ्यावयाची कामे, ग्रामपंचायत, इमारतींचे बांधकाम तसेच जिल्ह्यातील पर्यटन विकासाच्या बाबींचा त्यांनी आढावा घेतला. यवतमाळ नगरपरिषद क्षेत्रात वैशिष्ठ्यपूर्ण योजना, ठोक तरतुद योजना व नगरविकास विभागाच्या निधीतून करावयाच्या कामांची माहिती त्यांनी जिल्हा प्रशासन अधिकारी व यवतमाळ नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांकडून घेतली.
0000000000


पाणी पुरवठ्याची कामे तातडीने पूर्ण करा
                   - महसूल राज्यमंत्री संजय राठोड
* दारव्हा येथे पाणी, चारा टंचाई आढावा
* स्व: मालकीच्या विहिरी कराव्यात
यवतमाळ, दि. 3 : येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवू शकते, अशा ठिकाणी अपूर्ण असलेल्या पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण कराव्यात, असे निर्देश महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिले. आज दारव्हा येथील बचत भवनात आयोजित पाणी, चारा टंचाई संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी दारव्हाचे उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, तहसिलदार प्रकाश राऊत आदी उपस्थित होते.
श्री. राठोड म्हणाले, गेल्या दोन-तीन वर्षांपासून पाणीटंचाई निवारणासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र गाव पातळीवर कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही. असंख्य गावाच्या पाणी पुरवठा योजना निधी असूनही अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे पाणीटंचाईची झळ पोहोचण्याआधी येत्या काळात या योजना तातडीने पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचातीने पावले उचलावीत. उन्हाळ्यातील पाणीटंचाईला समोरे जाण्यासाठी आतापासूनच उपायोजना करणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतीने स्वत:च्या मालकीचे पाण्याचे स्त्रोत शोधावे, असलेले स्त्रोत बळकट करावे. पाईपलाईन किंवा टाकीसाठी निधी मागण्याआधी विहिरी खोदून त्यामध्ये बारा महिने पाणी उपलब्ध राहिल याची खातरजमा करावी. ज्या गावांमध्ये बारमाही पाण्याचे सार्वजनिक स्त्रोत आहे, त्या गावांसाठी पाण्याची टाकी आणि पाईपलाईनसाठी लागणारा संपूर्ण निधी देण्यात येईल.
गावातील पाणीपुरवठा योजनेसाठी चौदावा वित्त आयोग, टंचाई निवारण, जलयुक्त शिवार आदी माध्यमांतून निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. निधी उपलब्ध असताना ही कामे अर्धवट असल्यास संबंधित ग्रामसेवकाला जबाबदार धरण्या येईल. सुचना देऊनही काम पूर्ण केलेले नसल्यास ग्रामसेवकाविरूद्ध पोलिस तक्रार करण्यात येणार आहे. पाणीटंचाईची कामे करीत असताना लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या उपाययोजना स्विकारण्यात याव्यात, अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. पिण्याचे पाणी ही अत्यंत महत्त्वाची बाब असून तो सोडविण्यासाठी वन विभागाने मुबलक पाणी असणाऱ्या जागा त्यांच्याकडे उपलब्ध असल्यास विहिरीसाठी वन विभागाची जागा उपलब्ध करून द्यावी. रोजगार हमी योजनेतून विहिरी खोदण्याची परवागनी देण्यात येत आहे. त्यामुळे टंचाई निवारणाची कामे तातडीने हाती घेऊ पूर्ण करावीत. ज्या गावांमध्ये पाणीपुरवठा योजना पुर्ण झाल्या आहेत, त्या ग्रामपंचायतीने हस्तांतरीत करून चालविण्यास घ्याव्यात. एकही पाणीपुरवठा योजना अपूर्ण राहू नये, अशी आपली भावना आहे, योजनेच्या पुर्ततेसाठी संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे श्री. राठोड यांनी सांगितले.
00000

विहिर अधिग्रहणावरील अवलंबित्व कमी करणार
                   - महसूल राज्यमंत्री संजय राठोड
* दिग्रस येथे आढावा
यवतमाळ, दि. 3 : दरवर्षी उन्हाळ्यात काही ठराविक गावांमध्ये खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात येतात. या अधिग्रहणापोटी संबंधिताला आर्थिक मोबदला द्यावा लागतो, तसेच शेतावरील विहिर असल्यास त्याच्या ओलिताच्या पिकाला फटका बसतो, त्यामुळे गावातच सार्वजनिक विहिर खोदून खासगी विहिरींवरील अधिग्रहणाचे अवलंबित्व कमी करावे, असे आवाहन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले.
दिग्रस येथे गुरूवारी, दि. 2 मार्च रोजी आयोजित पाणी, चारा टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती संगिता राठोड, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, तहसिलदार किशोर बागडे आदी उपस्थित होते.
श्री. राठोड म्हणाले, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तात्पुरत्या योजनांवर भर देण्यात येत आहे. यात प्रामुख्याने खासगी विहिरी अधिग्रहित करण्यावर भर देण्यात येतो. यामुळे शासनाला दरवर्षी निधी उपलब्ध करून द्यावा लागतो. या अधिग्रहणामुळे तात्पुरती सोय होत असली तरी टंचाईवर कायमस्वरूपी मात करता आलेली नाही. त्यामुळे यावर्षी पाणीपुरवठा योजनांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पाण्याची टाकी, पाईपलाईन, विहिरी खोदण्यासाठी रोजगार हमी योजनेतून मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी पाणीटंचाई दूर करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर भर द्यावा. यासाठी लागणारा संपूर्ण निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
गावामध्ये मुबलक पाणीसाठे नसल्यास भुजल सर्व्हेक्षण विभागाच्या मदतीने ज्या ठिकाणी बारमाही पाणीसाठी उपलब्ध असतील त्याठिकाणी विहिरी घेण्यात याव्यात, या विहिरीपासून पाण्याची टाकी आणि गावातील नळ जोडणीसाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देण्यात येतील. कोणत्याही परिस्थिती खासगी विहिरी अधिग्रहित करू नये. गावात कायमस्वरूपी योजना झाल्यास खासगी पाण्याच्या स्त्रोतावरील अवलंबित्व कमी होणार असल्याने ग्रामपंचायतींनी यासाठी पुढाकार घ्यावा. शासनाकडून लागणाऱ्या प्रशासकीय मान्यता पाठपुरावा करून तातडीने मंजूर करून घेण्याच्या सूचनाही श्री. राठोड यांनी यावेळी केल्या.
00000
केबल ऑपरेटर निवडीसाठी आज अमरावतीत सोडत
यवतमाळ, दि. 3 : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात केबल जोडणीच्या संदर्भात विनाक्रम (रॅन्डम) सर्वेक्षण करण्याकरीता केबल ऑपरेटर आणि बहुविध यंत्रणा परिचालकाची निवड शनिवारी, दि. 4 मार्च रोजी अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृह क्रमांक 1 येथे दुपारी 12.30 वाजता काढण्यात येणार आहे.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी सोडत काढून तीन केबल ऑपरेटर व एक बहुविध यंत्रणा परिचालकाची निवड करण्यात येणार आहे. सोडतीकरीता जिल्ह्यातील सर्व केबल ऑपरेटर आणि बहुविध यंत्रणा परिचालकांनी उपस्थित रहावे, असे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.
00000
आदिवासी युवकांना थेट मदत, प्रशिक्षणाचा कार्यक्रम
यवतमाळ, दि. 3 : पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे आदिवासींच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. यात सन 2016-17 साठी न्युक्लिअस बजेट योजनेचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार योजनांसाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
न्युक्लिअस बजेटमधून आदिम जमातीसाठी 100 टक्के अनुदानावर सोलार लॅम्प, आदिवासी शेतकऱ्यांना स्प्रे पंप, बी-बियाणे, 85 टक्के अनुदानावर अनुसूचित आदिवासी शेतकऱ्यांना ताडपत्री, आदिवासींच्या घराचे विद्युतीकरण, आदिवासी अपंग लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर स्वयंचलीत तीनचाकी सायकल, अपघातग्रस्त आदिवासी कुटुंबांना अर्थसहाय्य तसेच प्रशिक्षण योजनांमध्ये पीईटी, पीएमटी, एनईईटी परीक्षेचे निवासी पुर्व प्रशिक्षण आदी योजना सुरू करण्यात आल्या आहे.
या प्रशिक्षण योजनांसाठी इच्छुकांना 15 मार्चपर्यंत अर्ज सादर करावे लागतील. लाभार्थ्यांनी एकापेक्षा जास्त योजनांसाठी अर्ज केले असले तरीही एका लाभार्थ्याला कोणत्याही एकाच योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 07235-227436 वर संपर्क करावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी दिपककुमार मिना यांनी केले आहे.
00000
सोमवारी लोकशाही दिन
यवतमाळ, दि. 3 : मार्च महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवारी, दि. 6 मार्च रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित करण्यात आला आहे.
तक्रारदारांनी सकाळी 10 वाजता आपले अर्ज दाखल करावेत, तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्जाचे निरसण झालेले नसल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज सादर करावे, तसेच तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्ज केल्याची पोच यावेळी सादर करण्यात यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
00000
आर्णी मार्गावरील कामामुळे पर्यायी रस्ता वापरावा
*बांधकाम विभागाचे आवाहन
यवतमाळ, दि. 3 : यवतमाळ बसस्थानक ते वनवासी मारोती या आर्णी मार्गावरील रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरीकांनी काम पूर्ण होईपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन बांधकाम विभागातर्फे करण्यात आले आहे.
नागपूर-बोरी-तुळजापूर रस्त्याच्या यवतमाळ शहरातील बसस्थानक ते वनवासी मारोती मंदिरपर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरणाचा करारनामा झाला आहे. या कामाला लवकरच सुरवात होणार आहे. रस्त्याचे चौपदरीकरण असल्यामुळे अस्तित्वातील डांबरी पृष्ठभागाच्यामधून रस्ता दुभाजकाची जागा सोडून काम सुरू करण्यात येणार आहे. काम सुरू झाल्यानंतर या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना वाहतुकीचा त्रास होणार आहे. यासाठी रस्त्याच्या मध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅरीकेडींग करण्यात येणार आहे. परंतु रस्त्याच्या अर्ध्या भागातून वाहतूक जाणार असल्यामुळे वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी या रस्त्याच्या समांतर असणाऱ्या रस्त्यांवरून जाण्यासाठी नागरीकांना सुचित करण्यात आले आहे. तसेच रस्त्यांवर फलकही लावण्यात आले आहे.
नागरीकांनी वनवासी मारोती मंदिर, यवतमाळ वळण रस्ता ते जांब रस्ता, यवतमाळ जांब रस्ता ते राणाप्रताप गेट रस्ता, राणा प्रताप गेट रस्ता ते ओम सोसायटी रस्ता आणि सत्यसाईज्योत मंगल कार्यालय रस्ता, सत्यसोईज्योत मंगल कार्यालय रस्ता ते आयुर्वेदिक महाविद्यालय रस्ता आणि गोधडीवाला धाम रस्ता, आयुर्वेदिक महाविद्यालय ते जिल्हा परिषद व बसस्थानक रस्ता या पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन विशेष प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता वाय. एल. लाखाणी यांनी केले आहे.
00000
ध्वनी प्रदुषणाबाबतचे नियम पाळावेत
*पोलिस प्रशासनाचे आवाहन
यवतमाळ, दि3 : मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिकेच्या अनुषंगाने सार्वजनिक सण आणि उत्सवाच्या वेळी ध्वनीप्रदुषण होऊ नये, गाव आणि सोसायटीमध्ये मोठ्याने लाऊड स्पिकर वाजवू नये, तसेच नागरीकांनी ध्वनी प्रदुषणाचे नियम पाळावेत असे आवाहन जिल्हा पोलिस प्रशासनाने केले आहे.
पर्यावरण संरक्षण कायदा 1986 आणि ध्वनी प्रदूषण अधिनियम 2000 मधील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे. त्यानुसार रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत लाऊड स्पिकर, फटाके, वाद्ये वाजविण्यास सक्त बंदी केलेली आहे. तसेच विहित कालावधीत आवाजाची मर्यादा घालून दिलेली आहे.
ध्वनी प्रदुषण नियंत्रण कायद्यानुसार दिवसा औद्योगिक क्षेत्रात 75 डेसिबल, व्यापार क्षेत्रात 65, निवासी 55, दवाखाना, शाळा आणि धार्मिक ठिकाणी 50 डेसिबल तर रात्री औद्योगिक क्षेत्रात 70 डेसिबल, व्यापार क्षेत्रात 55, निवासी 45, दवाखाना, शाळा आणि धार्मिक ठिकाणी 40 डेसिबलपेक्षा जास्त ध्वनीचा वापर झाल्यास संबंधिताविरूद्ध कायदेशिर कार्यवाही करण्यात येणार आहे.
ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्यास पाच वर्षे कैदेची शिक्षा आणि एक लाख रूपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. तसेच शिक्षा होऊनही असे गुन्हे चालू ठेवल्यास पुढील प्रत्येक दिवसासाठी पाच हजार रूपये दंडाची शिक्षा आहे. शिक्षा होऊन एक वर्षाच्या काळात पुन्हा असे गुन्हे केल्यास सात वर्षेपर्यंत शिक्षा होऊ शकते. हे गुन्हे दखलपात्र, अजामिनपात्र आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात चालतील. तसेच न्यायालयाचा अवमान केला म्हणूनही कारवाई होऊ शकते. ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नागरीकांनी आपल्या तक्रारी सर्व पोलिस ठाणे, पोलिस नियंत्रण कक्ष, यवतमाळ येथील हेल्पलाईन क्रमांक 100 तसेच व्हॉटसॲप क्रमांक 7264897772 किंवा 9011899888 वर नोंदवावी तसेच ई-मेल pidsb.ytml@mahapolice.gov.in वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
महिला दिनानिमित्त महिला मतदारांची नोंदणी
* निवडणूक आयोगाचा उपक्रम
*ओळखपत्र देऊन गौरविणार
यवतमाळ, दि3 : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भारत निवडणूक आयोगातर्फे महिला मतदारांच्या नोंदणीचा विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
महिला दिनाच्या कार्यक्रमात मतदार छायाचित्र ओळखपत्र देऊन महिलांना सन्मानित करण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात 2011च्या जणगणनेनुसार एक हजार पुरूषांमागे 947 महिला आहेत, या तुलनेत एक हजार पुरूषांच्या मागे 914 महिला मतदार आहेत. त्यामुळे ज्या महिलांची नावे मतदार यादीत नाहीत, अशा 1 जानेवारी 2017 रोजी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या महिलांनी 8 मार्च रोजी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे किंवा संबंधित तहसिल कार्यालयात नमूना 6 भरून द्यावा. ज्या भागात महिला मतदारांची संख्या कमी आहे, अशा भागांमध्ये विशेष लक्ष दिले जाणार आहे. ग्रामीण भागात विवाह झाल्यानंतर महिलांची नोंदणी होत नाही. अनेकवेळा महिलांकडे जन्म तारखेचा दाखला नसतो. तसेच माहेरी मतदार यादीत असलेले नाव कमी केले जात नाही. अशा कारणांमुळे महिला मतदारांची नोंदणी कमी होते. याबाबी लक्षात घेऊन निवडणूक विभाग जन्म तारखेचा दाखला उपलब्ध नसल्यास रेशनकार्ड, लग्नपत्रिका किंवा प्रतिज्ञापत्राच्या आधारे देखील नाव नोंदणी करून घेणार आहे. त्यामुळे महिलांनी मतदान नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी