शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी नद्यांचा उपयोग व्हावा
                                                                                                -गृह राज्यमंत्री हंसराज अहीर
* केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांकडून आढावा
       यवतमाळ, दि. 14 : शेतक-यांच्या सिंचन वाढीसाठी शासन विविध प्रकारच्या योजना राबवित आहे. नदी जोड प्रकल्प त्यातीलच एक भाग आहे. या नदयांचा सिंचनासाठी उपयोग व्हावा त्या दृष्टीने जलसंपदा विभागाने कार्यवाही करावे असे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे त्यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला आमदार डॉ.अशोक उईके, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह, जिल्हा पोलीस अधिक्षक आर राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, वणीचे नगराध्यक्ष राजेंद्र बोरडे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, डॉ.नितीन व्यवहारे, विज वितरणचे अधिक्षक अभियंता विजय भटकर, उत्पादन शुल्कचे अधिक्षक पराग नवलकर आदी उपस्थित होते.
            विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमाचा आढावा घेतांना जिल्हयातील जास्त काम झालेले अर्धवट प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नदी जोड प्रकल्पाचा आढावा घेतांना या प्रकल्पातंर्गत शेतक-यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे असे ते म्हणाले. मुद्रा बँक योजनेअंतर्गत कर्ज वाटपाचा आढावा घेतांना जुन्या व्यवसायीकांना कर्ज देतांनाच बेरोजगार युवकांना प्राधान्याने कर्ज दया असे ते म्हणाले.  या योजनेतंर्गत तीनशे कोटीच्या वाटपाचे उदिष्ट ठेवा असे त्यांनी सांगितले.
            धडक सिंचन व नरेगातून धडक मध्ये वर्ग करण्यात आलेल्या विहीरींचाही त्यांनी आढावा घेतला.  या विहीरी तातडीने पूर्ण करुन शेतक-यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करावे. धडक मधून पूर्ण झालेल्या विहीरींना विज कनेक्शन देण्याची विशेष मोहिम विज वितरण विभागाने राबवावी अशा सूचनाही त्यांनी केल्या. विज वितरणच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी दिनदयाल उपाध्याय ही योजना राबविली जात असून या योजनेतंर्गत मंजूर प्रस्तावातील कामे वेगाने करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
            यावेळी अवैधमद्ये वाहतूक तसेच जनावरांच्या अवैध वाहतूकीचाही आढावा त्यांनी घेतला. जनावरांची वाहतूक करणा-यावर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकुल बांधकाम कामाचाही आढावा त्यांनी घेतला.
                                                            00000 

गर्भलिंग निदानाची माहिती देणाऱ्यास 25 हजारांचे बक्षीस
यवतमाळ, दि. 14 : राज्यातील गर्भलिंगनिदान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गर्भलिंगनिदानाची माहिती देणाऱ्यास 25 हजार रूपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टी. जी. धोटे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी सचिंद्र  प्रताप सिंह यांच्या सूचनेनुसार जनसामान्यांपर्यंत गर्भलिंगनिदान चाचणीची माहिती पोहोचवावी, यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली. महसूल भवनात घेण्यात आलेल्या या पत्रपरिषदेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. के. झेड. राठोड, विधी सल्लागार ॲड. श्वेताली लिचडे आदी उपस्थित होते.
डॉ. धोटे यांनी, गर्भधारणा पूर्व आणि प्रसवपूर्व निदान यंत्रे हा लिंग निवडीस प्रतिबंध कायदा 1994 पासून अस्तित्वात आला आहे. मुलींचे कमी होत असलेले प्रमाण आणि स्त्रीभृण हत्या थांबविणे आणि गर्भलिंग परिक्षणास प्रतिबंध घालण्यास मदतगार ठरला आहे. या कायद्यानुसार सर्व सोनोग्राफी मशिनला मशीन रजिस्ट्रेशन सर्टीफिकेट देण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 117 मशिनला हे सर्टीफिकेट देण्यात आले आहे. सर्व केंद्रांना गर्भवती महिलांचे एफ फॉर्म ऑनलाईन भरण्याची सक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात सुमारे 70 हजार अर्ज प्रत्येक वर्षाला भरले जात आहे. राज्यातील गर्भलिंग निदानाच्या घडलेल्या पार्श्वभूमीवर 15 मार्चपासून सर्व सोनोग्राफी आणि गर्भपात केंद्रांची प्राधिकारीमार्फत 88 केंद्रांची तपासणी करण्यात येणार आहे.
गर्भलिंग निदान होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर डॉक्टरांची माहिती देणाऱ्या खबऱ्यास 25 हजार आणि स्टींग ऑपरेशनसाठी तयार होणाऱ्या गर्भवती महिलेस 25 हजार रूपयांचे मानधन देण्यात येणार आहे. याबाबत माहिती देण्यासाठी 1800 233 4475 हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. जिल्ह्यात मुलींचे प्रमाण 2014 मध्ये 915, 2015 मध्ये 955 आणि 2016 मध्ये 951 आहे. ज्या तालुक्यांमध्ये मुलींच्या प्रमाणात अधिक घट झाली आहे, त्या तालुक्यांवर या कारवाईमध्ये लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. जिल्ह्यात वणी आणि पुसद तालुक्यातील दोन डॉक्टरांवर या कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. तसेच एका प्रकरणी शिक्षा झाली आहे, याप्रकारची उच्च न्यायालयात अपिल करण्यात आले आहे, तर एका प्रकरणी मुक्तता करण्यात आली आहे. उर्वरीत तीन प्रकरणे प्रलंबित आहेत, अशी माहिती डॉ. धोटे यांनी दिली.
00000
कृषि विज्ञान केंद्रात अझोला निर्मिती तंत्रज्ञान प्रशिक्षण
यवतमाळ, दि. 14 : येथील कृषि विज्ञान केंद्रात बुधवारी, दि. 8 मार्च रोजी कृषि विकास योजनेंतर्गत अझोला निर्मिती तंत्रज्ञान या विषयाचे प्रशिक्षण पार पडले­.
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गायकवाड अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून आत्माचे प्रकल्प उपसंचालक डी. बी. काळे उपस्थित होते.  यावेळी श्री. काळे यांनी उन्हाळी पिक नियोजनाविषयी मार्गर्शन केले. डॉ. नरेंद्र देशमुख यांनी शेतकऱ्यांना अझोला निर्मिती तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले. अंजली गहरवार यांनी फळबाग व्यवस्थपनाविषयी माहिती दिली. श्री. गायकवाड यांच्या हस्ते कृषि विकास योजनेंतर्गत अझोला प्रात्यक्षिक किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिल ठाकरे यांनी प्रास्ताविकातून प्रशिक्षणाचे महत्व आणि पिक संरक्षणाविषयी उपाययोजनेबाबत मार्गदर्शन केले. मयुर ढोले यांनी सूत्रसंचालन केले.
00000
व्यवसाय परीक्षेचे वेळापत्रक जाहिर
यवतमाळ, दि. 14 : शिकाऊ उमेदवारी योजनेंर्तगत 105वी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा दि. 18 ते 22 एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
या परीक्षेस 15 एप्रिल 2017 पर्यंत शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पुर्ण करणारे सर्व प्रशिक्षणार्थी पात्र असणार आहे. त्यामुळे सर्व पात्र आणि माजी अनुत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी 18 मार्चपर्यंत परीक्षा फार्म, परीक्षा शुल्क आणि सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्ससह मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगीक सुचना केंद्रद्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सादर करावे. 31 मार्चपर्यंत प्रत्येक दिवसाला 20 रूपये, तर 12 एप्रिलपर्यंत दर दिवसाला 50 याप्रमाणे विलंब  शुल्क आकारण्यात येणार आहे.परीक्षा फार्म विहित मुदती न भरलेला नसल्यास प्रशिक्षणार्थ्यांना परिक्षेस बसता येणार नाही. तसेच ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी ऑक्टोबर 2016 परीक्षेचे फॉर्म यापूर्वीच सादर केले आहेत, त्या सर्वांची परीक्षा 18 ते 22 एप्रिल या कालावधीत होणार आहे.
ज्या आस्थापनेवर शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण घेत आहेत, त्या आस्थापनेचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन होणे आवश्यक आहे. ज्या आस्थापनांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेले नाही, अशा आस्थापनांवरील शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही. शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षणार्थ्यांनी याची नोंद घेऊन परीक्षा फॉर्म सादर करावे, आवाहन मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगीक सुचना केंद्राचे अंशकालीन प्राचार्य आर. बी. सावळे यांनी केले आहे.
00000
काचबिंदूवर वेळेच उपचार करावा
- जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. टी. जी. धोटे
            काचबिंदूमुळे कायमची दृष्टी जाण्याचा धोका असतो. त्यामुळे काचबिंदूवर वेळीच उपचार करावा. अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत काचबिंदू या आजाराबाबत नागरीकांमध्ये जनजागृती करण्यासाठी जागतिक काचबिंदु सप्ताहानिमित्ताने काचबिंदुची माहिती सांगणारा हा लेख.
काचबिंदु
डोळा अचानक दुखू लागणे, लाल होणे व दृष्टी कमी होणे.
डोळ्यात असणारा ताण वाढला असता डोळा अचानक दुखू लागतो, तसेच डोळा लाल होतो आणि दृष्टी अचानक कमी होऊ लागते. नेत्र रोगातील काचबिंदु हा एकमेव रोग असा आहे, की ज्यावर तातडीने उपचार न केल्यास डोळा जाण्याची शक्यता आहे.
काचबिंदू कोणाला होउ शकतो.
आपले वय ४० वर्षापेक्षा जास्त असेल. आपल्या चष्म्याचा नंबर वारंवार बदलत असेल, आपल्या घरात कोणाला आधीपासून काचबिंदू असेल, डायबेटीज, ब्लडप्रेशर असेल, दृष्टी संकुचित होत असेल. यापैकी कोणताही त्रास होत असेल, तर काचबिंदू असण्याची शक्यता आहे. या आजाराबाबत वेळेवर तपासणी आणि औषधोपचार केला नसल्यास कायमची दृष्टी जाण्याचा धोका संभवतो.
डोळ्यांची काळजी घ्या
भारतातील अंधत्वाच्या प्रमुख कारणांपैकी काचबिंदू हे एक प्रमुख कारण आहे. डोळ्याच्या आतील दबाव वाढणे व डोळ्याची मुख्यप्रकाश संवेदना वाहून नेणारी नस खराब होते. ही प्रक्रिया हळुवार होते यामध्ये रोग्याला विशेष त्रास होत नाही. परंतु नजर कमी झाल्यावर काचबिंदूवरील उपचारांचा फायदा होत नाही.
प्रमुख लक्षणे
काचबिंदूमुळे रोग्याला विशेष त्रास होत नसला, तरी काही लक्षणे या रोगाची कल्पना देतात. जसे की वारंवार चष्म्याचा नंबर बदलणे. आजूबाजूची नजर कमी होणे. गाडी चालवितांना बाजूचे न दिसणे. प्रकाश दिव्याभोवती इंद्रधनुष्यासारखे बलय दिसणे. डोके दुखणे आदी. मधुमेही वयस्कर व कुटुंबात काचबिंदू असताना या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता असते. म्हणून नेत्रतज्‍ज्ञांकडून डोळ्याची तपासणी होणे गरजेचे आहे.
काचबिंदूचे निदान कसे कराल
मधुमेह, ४० वर्षावरील व्यक्ती, कुटुंबात काचबिंदू असणाऱ्यांनी डोळ्याची तपासणी नियमित करून घ्यावी.
उपाय
जर काचबिंदूचे निदान योग्यवेळी झाले, तर त्यावर उपचार करणे शक्य आहे. डोळ्यात टाकले जाणारे ड्रॉप्स, डोळ्याच्या आतील द्रव कमी करतात व त्याद्वारे पुढील हानी टाळता येते. आय ड्रॉपचा उपयोग नेहमी करावा. ज्याद्वारे अंधत्व टाळता येईल. लेसर किरण किंवा शस्त्रक्रियेद्वारे काचबिंदूवर उपचार करता येतो. नेत्रतज्‍ज्ञांच्या सल्ल्याने काचबिंदूमध्ये उपचार करावे, हे लक्षात ठेवावे की काचबिंदूच्या उपचाराने नजर वाढणे शक्यच आहे. परंतु पुढील नजरेची हानी आणि अंधत्व टाळणे शक्य आहे. भारतात दीड कोटी लोकांना काचबिंदू आहे. त्यापैकी अर्धेअधिक लोकांना ते या रोगाने पिडीत असल्याची कल्पनासुद्धा नाही.
या रोगाची लक्षणे सुरूवातीच्या काळात दिसत नाहीत. सद्या जगात ६.६ कोटी लोक या रोगाने त्रस्त आहेत. भारतातील १३ टक्के अंध काचबिंदूमुळे आहे. १२ ते १८ मार्च हा जागतिक काचबिंदु सप्ताह म्हणून साजरा केला जातो. सर्वसामान्य नागरीकांत या रोगाची माहिती देणे आणि त्याचे प्रारंभिक अवस्थेत निदान करणे हा उद्देश आहे
काचबिंदु कसा टाळाल
कोणत्याही आजारावरील उपचाराची सुरूवात ही जीवन शैलीमधील बदलाने होते. काचबिंदूही त्याला अपवाद नाही. परंतु जीवन शैलीतील बदलाने विशिष्ट आजार बरा होत नसेल, तर शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाही. काचबिंदूच्या उपचारामध्ये यश व शाश्वती किती हा प्रश्न कायम विचारला जातो. निदान किती लवकर झाले, आजार कोणत्या टप्प्यात आहे, व्यक्तीची जीवनपद्धती व इतर धोकादायक आजार या सर्व गोष्टींवर हे अवलंबुन असते. सर्वसाधारणपणे पहिल्या टप्प्यातील आजार थांबविता येतात, मध्यम टप्प्यातील आजारांची प्रगती थांबविता येते आणि तिसऱ्या टप्प्यातील आजारामुळे येणारे अंधत्व लांबविता येते. तरीही ५ टक्के रूग्णांमध्ये अपयश शक्य आहे. काचबिंदु होण्याचे नेमके एकच कारण नसते आणि त्यातील काही कारणांवर आपण पुर्ण उपचार करू शकत नाही.
जीवनपद्धती
जीवनपद्धती बदलविणे हे सर्वांगीण आरोग्याबरोबरच काचबिंदूसारख्या आजारात निश्चितच उपयुक्त आहे. हे शास्त्रीय पाहणीत सिद्ध झाले आहे. झोप, व्यायाम, फळे, पालेभाज्यायुक्त शाकाहारी आहार, नैसर्गिक जीवनसत्वांचा समावेश, धुम्रपान, दारू, तंबाखू आणि तत्सम व्यसनाधिनता डोळ्यांच्या शिरेचा नाश करते. त्यामुळे कोणत्याही औषधाचा परिणाम होत नाही. मानसिक ताणतणावाचा डोळ्यांच्या शिरेच्या रक्तपुरवठ्यावर परिणाम होतो. रक्तवाहिन्यांतील चरबीमुळे रक्तपुरवठा असुरक्षित होतो. हे लक्षात ठेवले पाहिजे.
शस्त्रक्रियेचा पर्याय
ज्या रूग्णांचा अंतर्दाब नियमीत औषधाने आटोक्यात राहात नाही, जे रूग्ण औषध नियमीत टाकु शकत नाही किंवा ज्यांना तपासणीला नियमीत येणे अशक्य आहे आणि दृष्टी हळूहळू कमी होतेय, अशा रूग्णांवर शस्त्रक्रिया करणे जरूरीचे असते. शस्त्रक्रियेचा फायदा असा की, डोळ्यातील दाब कमी करण्याचा सुक्ष्म अंतर्गत मार्ग तयार केला जातो. त्यामुळे दाब कायम कमी राहू शकतो.
00000
रेती घाट परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
यवतमाळ, दि. 14 : जिल्ह्यातील रेतीघाटांवरील रेतीचे अवैध उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंध घालण्यासाठी जिल्ह्यातील 106 या घाटांवर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील पैनगंगा, वर्धा, बेंबळा, अरूणावती, निर्गुडा, वाघाडी, खुनी, विदर्भ इत्यादी नदीनाला पात्रांमध्ये लिलाव झाले नसलेले 65 आणि लिलाव झालेल्या 41 रेतीघाटातून विना परवानगीने यांत्रिक साधनांचा वापर करून अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र या घाटांवरील अवैध रेती उत्खननाचे  प्रकार निदर्शनास येत आहे. यावर  प्रतिबंध घालण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नदी, नालेपात्रात ट्रक, ट्रक्टर, टिप्पर व तत्सम वाहनांना रेती, वाळूचे अवैध उत्खनन, वाहतूक करणे यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे.
अपर जिल्हा दंडाधिकारी राजेश खवले यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये प्राप्त अधिकारानुसार या ठिकाणी विनापरवानगी वाहनास प्रवेश करण्यास बंदी घातली असून तसे आदेश जारी केले आहे. या घाटांवरून अवैध उत्खनन, वाहतूक व साठवणूक होणार नाही यासाठी उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तालुका दंडाधिकारी यांनी दक्षता घ्यावी, असे सुचित केले आहे. उत्खनन, वाहतूक किंवा साठवणूक आढळल्यास संबंधीत वाहन चालक, मालक यांच्याविरुध्द भादंवि 379, 188 आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 48 (7) व (8) नुसार कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. हे प्रतिबंधात्मक आदेश 8 मार्चपासून 30 दिवसांसाठी लागू राहतील.
00000
जलजागृती सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम
यवतमाळ, दि. 14 : जिल्ह्यात जलजागृती सप्ताह 16 ते 22 मार्चदरम्यान राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
16 मार्च रोजी जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात सकाळी दहा वाजता होणार आहे. 19 मार्च रोजी पोस्टल मैदान येथे सकाळी साडेसात वाजता जलदौड होणार आहे. 22 मार्च रोजी बचत भवनात समारोप कार्यक्रम होणार आहे, असे यवतमाळ पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काटपल्लीवार यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी