जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित
यवतमाळ, दि. 7 : जिल्हास्तर युवा पुरस्कार सन 2016-17 या वर्षाकरीता अर्ज मागविण्यात आले असून इच्छुकांनी दिनांक 7 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्याच्या युवा धोरण 2012 नुसार जिल्हास्तरावर युवक आणि युवती तसेच संस्थेला पुरस्कार देण्यात येणार आहे.
पुरस्कार वर्षात अर्ज करणाऱ्या युवक-युवतीचे वय 1 एप्रिल रोजी 13 वर्षे पुर्ण आणि 31 मार्च रोजी 35 वर्षे या दरम्यान असावे. जिल्हास्तर पुरस्कारासाठी जिल्ह्यात सलग 5 वर्षे, तर राज्यस्तर पुरस्कारासाठी राज्यात 10 वर्षे वास्तव्य असले पाहिजे. पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थेस विभागुन दिला जाणार नाही. तसेच मरणोत्तर पुरस्कार जाहिर करण्यात येणार नाही. अर्जासोबत केलेल्या कार्याचे पुरावे (वृत्तपत्रीय कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती आणि फोटो इत्यादी) जोडणे आवश्यक आहे. पुरस्कार मिळल्यानंतर किमान दोन वर्षे क्रियाशिल राहत असल्याचे हमीपत्र अर्जदाराला द्यावे लागेल. अर्जदार व्यक्तीने केलेले कार्य स्वयंस्फुर्तीने केले असावे. एका जिल्ह्यात पुरस्कारप्राप्त व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा युवक पुरस्कारासाठी अर्ज करणास पात्र राहणार नाही. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी, विद्यापीठांतर्गत महाविद्यालयातील अध्यापक कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.
संस्थांनी या पुरस्कारासाठी केलेल्या कामाचे पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. (वृत्तपत्रीय कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती आणि फोटो इत्यादी) अर्जदार संस्थेने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्षे क्रियाशील कार्यरत राहण्याचे हमीपत्र देणे आवश्यक आहे. अर्ज करणारी संस्था पंजीबद्ध असावी. तसेच संस्था नोंदणी झाल्यानंतर किमान पाच वर्षांचा कालावधी झाला असावा. एका जिल्ह्यात पुरस्कारप्राप्त झालेली संस्था राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा युवा पुरस्कारासाठी पात्र राहणार नाही. अर्जदार संस्थेचा पोलिस विभागाने प्रमाणित केलेला चारित्र्याचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.
जिल्हा, राज्यस्तर पुरस्कारासाठी लाभार्थ्यांनी करावयाचा नमुना अर्ज अर्जदारांनी क्रीडा व युवक संचालनालयाच्या संकेतस्थळावर www.sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत, वरील अटी व शर्ती पुर्ण करणाऱ्या युवक-युवती तसेच संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह 7 एप्रिल 2017 पुर्वी अर्ज सादर करावे, अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटीये यांनी केले आहे.
00000
क्रीडा सवलत गुणासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 7 : दहावी आणि बारावीसाठी क्रीडा सवलतीचे प्रस्ताव 15 मार्च 2017 पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग आणि प्राविण्यप्राप्त खेळाडूंना 25 गुण, राष्ट्रीय स्पर्धेसाठी 20 गुण, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी 15 गुण देण्यात येणार आहे.
क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव खेळाडू विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्यास उत्तीर्ण होण्यास जितके गुण  कमी पडत असतील तेवढे गुण देय असलेल्या गुण विभागणी प्रमाणे गुण एक किंवा सर्व विषय कमाल मर्यादेत विभागून देण्यात येईल. उर्वरीत शिल्लक गुण संबंधित खेळाडू विद्यार्थ्यांच्या एकूण टक्केवारीत जमा करण्यात येणार आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना देय असलेले गुण एकूणात प्रचलित पद्धतीनुसार दर्शविण्यात येणार आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 1 जून ते 28 फेब्रुवारी हा कालावधी ग्राह्य मानण्यात येणार आहे. ही सवलत केवळ नियमित विद्यार्थ्यांनाच लागू होणार आहे.
क्रीडा गुण सवलत मिळविण्यासाठी प्रमाणपत्रावर अनुक्रमांक, घटनेचा नोंदणी क्रमांक, स्पर्धेचा कालावधी, स्थळ, वयोगट यांचा उल्लेख असणे आवश्यक आहे. एकापेक्षा अधिक खेळात सहभागी झालेले असल्यास त्या विद्यार्थ्याला उच्चतम एकाच खेळाच्या प्रमाणपत्राचे गुण ग्राह्य धरण्यात येईल. एकविध क्रीडा संघटनांनी दहावी आणि बारावीसाठी 14 वर्षावरील कोणत्याही दोन गटातच राज्य, राष्ट्रीयस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या असाव्यात. खुल्या गटातील क्रीडा स्पर्धा आणि निमंत्रित क्रीडा स्पर्धा ग्राह्य धरण्यात येणार नाही. अधिकृत राज्य संघटनांनी आयोजित केलेल्या राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा खेळाडूंची यादी त्या संघटनांनी अध्यक्ष, सचिव यांच्या स्वाक्षरीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावी लागणार आहे. हा प्रस्ताव सादर करताना प्रमाणपत्रावर अध्यक्ष किंवा सचिव यांच्यापैकी एकाची स्वाक्षरी आवश्यक आहे.
क्रीडा धोरण समितीच्या शिफारशीनुसार नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना देखील क्रीडा गुण सवलत देण्यात येईल. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे प्रमाणित करून शाळेस पाठविण्यात येईल. पाहिली ते आठवीच्या शारिरीक शिक्षण परिक्षेत जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे 25, 50, 75, 100 इतके अधिक गुण देण्यात येतील. हे गुण विषयाच्या एकूण बेरजेत घेण्यात येणार आहे, मात्र गुणांची सरासरी 100 टक्क्यापेक्षा जास्त होणार नाही.
या क्रीडा गुण प्रस्तावाच्या अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटीये यांनी केले आहे.
00000
अनधिकृत पार्किंगवरील वाहनांवर कारवाई
*नागरीकांनी वाहने योग्यरित्या पार्किंग करावेत
यवतमाळ, दि. 7 : जिल्हा आणि शहरातील अनधिकृत पार्किंगमध्ये पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी टोईंग वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या वाहनाच माध्यमातून वाहतुकीस अडथळा केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे.
वाहतुकीच्या रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे वाहन, दुचाकी, तिनचाकी, चारचाकी, ट्रक, मालवाहू ट्रॅव्हल्स, बस, वाहने हातगाड्या उभी करून अडथळा निर्माण करतात आणि त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन किरकोळ आणि गंभीर अपघात घडून येतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी वाहन चालकांनी आपली वाहने अस्ताव्यस्तरित्या उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी अनधिकृत पार्किंग विरोधी कृती पथक वाहन क्रमांक एमएच 29 ए 9081 ची नियुक्ती करण्यात आली आहे. या वाहनात अनधिकृत पार्किंग केलेले वाहन चढविल्यावर त्याचा शुल्क रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी ठरवून दिल्याप्रमाणे 100 रूपये वाहन उचलण्यासाठी द्यावे लागतील. तसेच भारतीय मोटार वाहन कायदा 1988 व केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 तसेच मुंबई पोलिस कायद्याप्रमाणे कार्यवाही व तडजोड शुल्क आकारण्यात येईल. त्यामुळे सर्व वाहनधारकांनी आपली वाहने अनधिकृतपणे वाहतुकीस अडथळा होईल, अशाप्रकारे वाहन पार्किंग करू नये, वाहने शिस्तीत पार्क करावीत, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राकुमार आणि जिल्हा वाहतुक शाखेने केले आहे.
00000
लोकशाही दिनी 36 निवेदने दाखल
यवतमाळ, दि. 7 : बचत भवन येथे आयोजित लोकशाही दिन कार्यक्रमात जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांनी 36 निवेदन आणि तक्रार अर्ज दाखल केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक सिंगला, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्यासह सर्व खाते प्रमुख अधिकारी उपस्थित होते. प्राप्त झालेल्या निवेदनांमध्ये महसूल 7, पोलिस 3, कृषि 2, पाटबंधारे 2, जिल्हा परिषद 6, नगर परिषद 3, भूमी अभिलेख 1, उपविभागीय अधिकारी यवतमाळ 2, वनविभाग 1, जीवन प्राधिकरण 1, अग्रणी बँक 1, सार्वजनिक बांधकाम विभाग 1, रोहयो 2, जिल्हा खनीकर्म 4, इतर 2 अर्जांचा समावेश आहे. लोकशाही दिनात प्रलंबित असलेली 68 प्रकरणे निकाली काढण्यात आले आहे.
00000
जागतिक महिला दिनानिमित्त स्तन कर्करोग तपासणी सप्ताह
*17 मार्चपर्यंत बाह्यरूग्ण विभागात तपासणी
यवतमाळ, दि. 7 : जागतिक महिला दिनानिमित्ताने येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय येथील बाह्यरूग्ण विभागात 8 ते 17 मार्च पर्यंत सकाळी 9 ते दुपारी एक वाजेपर्यंत स्तन कर्करोग तपासणी आणि उपचार सप्ताह राबविण्यात येत आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या निर्देशानुसार महिलांसाठी विनामुल्य स्तन कर्करोग तपासणी सप्ताह राबविण्याचे निर्देश दिले आहे. ऑक्टोबर महिना जागतिक स्तन कर्करोग जागृती महिना म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शासकीय रूग्णालयाच्या बाह्यरूग्ण विभागातील पहिल्या माळ्यावरील कक्ष क्र. 68 मध्ये स्नन कर्करोग तपासणी आणि उपचार कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. जतकर, डॉ. अरूणा पवार, डॉ. हिंगवे, डॉ. वऱ्हाडे, डॉ. हिवरकर ही तज्ज्ञ चमू सेवा देतील. याठिकाणी ब्रेस्टस्कॅन ही मशिन शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात आली त्याद्वारे महिलांची स्तनरोगाची तपासणी करण्यात येईल. याव्यतिरिक्त सोनोग्राफी, एफएनएसी, बायप्सी, सीटीस्कॅन आदी तपासण्या देखील आवश्यकतेनुसार विनामुल्य करण्यात येतील. जिल्ह्यातील महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी केले आहे.
00000
खासगी टँकरसाठी निविदा आमंत्रित
यवतमाळ, दि. 7 : यावर्षीच्या उन्हाळ्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाई निवारणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनेमध्ये खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी खासगी टँकरसाठी निविदा मागविण्यात आल्या आहे.
पाणी टंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनेंतर्गत गावे, वाड्या, तांडे या क्षेत्रात खासगी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावयाचा आहे. यासाठी इच्छुक टँकरधारकांकडून ई-निविदा मागविण्यात आल्या आहे. याबाबतच्या अटी व शर्तीची माहिती mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दि. 14 ते 29 मार्च पर्यंत उपलब्ध राहतील. या निविदा दि. 30 मार्च रोजी सकाळी 11 वाजता एनआयसी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय येथे घडण्यात येतील, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
00000
जीवन प्राधिकरणाच्या संपात पाणीपुरवठा सुरळीत
यवतमाळ, दि. 7 : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघर्ष समितीतर्फे प्राधिकरणातील कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी यांनी बेमुदत संप पुकारलेला आहे. या संपातही शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार आहे.
अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन, सेवानिवृत्ती वेतनाची हमी राज्य शासनाने घ्यावी, यसाठी 6 मार्चपासून कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलेला आहे. या संपकाळात यवतमाळ येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पाठिंबा असून संपात सहभागी आहे. परंतु जनतेच्या हितासाठी शहरातील पाणीपुरवठा बंद होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे, असे जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता अजय बेले यांनी कळविले आहे.
00000
मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी अर्ज आमंत्रित
*अर्ज करण्यासाठी 10 मार्चपर्यंत मुदत
यवतमाळ दि. 7 : जिल्ह्यातील मदरशांमध्ये फक्त पारंपारिक धार्मिक शिक्षण देण्यात येत आहे आणि ज्यांना आधुनिक शिक्षणाकरीता शासकीय अनुदान घेण्याची इच्छा आहे, अशा मदरशांकडून दिनांक 10 मार्च पर्यंत डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे.
मदरसा चालविणारी संस्था धर्मादाय आयुक्त अथवा महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असावी. विहित नमुन्यातील परिपुर्ण अर्ज आणि कागदपत्रांसह जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे स्विकारण्यात येईल. यासाठी 3 डी. एड., बी. एड. शिक्षकांना मानधन अनुज्ञेय आहे. या योजनेत विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी आणि ऊर्दू हे शिकविण्यासाठी शिक्षकांना मानधन देण्यात येणार आहे. तसेच पायाभूत सुविधा आणि ग्रंथालयासाठी अनुदान देण्यात येणार आहे. ग्रंथालय आणि शैक्षणिक साहित्यासाठी फक्त पहिल्या वर्षी 50 हजार आणि त्यानंतर प्रति वर्षासाठी 5 हजार अनुदान देय आहे. पायाभूत सुविधांसाठी दोन लाख रूपये अनुदान देण्यात येणार आहे. तसेच यापूर्वी अनुदान घेतलेले असल्यास त्या प्रयोजनासाठी पुन्हा अनुदान घेता येणार नाही. केंद्र शासनाच्या मदरशांन्या गुणवत्तापुर्ण शिक्षण या योजनेंतर्गत लाभ मिळालेल्या मदरशांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही. अर्ज नमुना, आवश्यक कागदपत्र व अधिक माहितीसाठी maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील 11 ऑक्टोबर 2013 रोजीचा शासन निर्णय पहावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
00000
घाटंजी, झरीसाठी 58 लाखांचे बीज भांडवल
* मानव विकास अंतर्गत अर्थसहाय
*गौण, वनौपजांसाठी अर्थसहाय उपलब्ध
*दोन तालुक्यातील दहा गावांचा समावेश
यवतमाळ, दि. 7 : मानव विकास कार्यक्रमांतर्गत गौण आणि वनौपजांचा उपभोग घेण्यासाठी घाटंजी आणि झरी जामणी या दोन तालुक्यातील दहा गावांसाठी 58 लाख रूपयांचे बीज भांडवल वितरीत करण्यात आले आहे. याआधी मारेगाव, केळापूर आणि घाटंजी तालुक्यासाठी 4 कोटी 12 लाख रूपयांचे बीज भांडवल एकवेळी देण्याचे अर्थसहाय म्हणून उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यातील तीन तालुक्यातील 72 गावांना ही मदत वितरीत करण्यात आली आहे.
जिल्हयाचा मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी, तसेच मानव विकास कार्यक्रमाची व्याप्ती वाढविणे आणि मानव विकासावर आधारत योजना राबविण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात मानव विकास कार्यक्रम राबविण्यात येत. गौण वनौपज गौळा करण्यासाठी  विकास कार्यक्रमांतर्गत 2016-17 साठी मारेगाव 16 लाख (2 गावे), पांढरकवडा 3 कोटी 56 लाख (64 गावे), घाटंजी 40 लाख (6 गावे) याप्रमाणे चार कोटी 12 लाख रूपयांचा निधी वितरण करण्यात आल होते. या आता घाटंजीसाठी 22 लाख (4 गावे), झरीजामणी 36 लाख (6 गावे) रूपये वितरीत करण्यात आले आहे.
पेसा आणि वनहक्काची मान्यता कायद्यातील तरतूदीनुसार अनुसूचित क्षेत्रांतील गौण वनोपजे गोळा करणे तसेच लघु पाणीसाठयातील मासेमारी करता यावी, यासाठी संबंधित ग्रामसभेला अथवा अनुसूचित जमाती व इतर पारंपारीक वननिवासी यांना मानव विकास कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनांव्यतिरिक्त उत्पन्न वाढ योजनांमध्ये गौण व वनौपजांचा उपभोग घेण्यासाठी बीज भांडवल म्हणून झरीजामणी, आर्णी, घाटंजी केळापूर (पांढरकवडा) आणि मारेगाव तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या कायद्यातील तरतूदीनुसार गौण वनोपजे गोळा करण्यासाठी तसेच लघु पाणीसाठयातील मासेमारीचे हक्क वापरण्यात येत आहेत किंवा वापरले जाणार आहेत अशा गावाच्या ग्रामसेभेला अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते.
वनहक्क कायदा आणि पेसा अंतर्गत गौण वनौपजावर हक्क प्रस्थापित करण्यासाठी गठत गाव समित्यांना हे अर्थसहाय देण्यात येते. या योजनेचा गावाना लाभ घ्यावयाचा असल्यास ग्रामसभनी त्यांच्या उपक्रमाचा प्रस्ताव सादर करावा. या प्रस्तावासोबत ग्रामसभेच्या निव्वळ नफयाचा भाग शासनाकडून मिळणाऱ्या अर्थसहायातून उभारलेल्या बीज भांडवलात जमा करण्याची तयारी असल्याचा ठराव जोडणे आवश्यक आहे. तसेच गौण वनोपजाच वापर करताना वनौपजांचे संवर्धन करण्याची तयारीही ग्रामसभेने गट विकास अधिकारी याच्यातर्फे जिल्हाधिकारी यांना दर्शवावी लागणार आहे.
सध्या राज्या अनुसूचित क्षेत्रातील सुमारे 2 हजार 800 ग्रामपंचायती असून त्यामध्ये समारे 5 हजार 900 गावांचा समावेश होतो. या क्षेत्राना पेसा कायदा तसेच वनहक्क कायद्याचे सर्व अधिकार लागू आहेत. पेसा कायद्यामध्ये समाविष्ठ 59 गटापैकी 45 गटांचा समावेश मानव विकास कार्यक्रमात होतो. या 45 गटातील अनुसूचित क्षेत्रातील गावाना ही योजना लागू आहे. या योजनेतून 500 पेक्षा कमी लोकसंख्या असलेली गावे परंतू जेथे तेंदू किंवा बांबू व्यतिरिक्त इतर गौण वनौपजांचा तसेच लघु पाणीसाठ्यातील मासेमारीच्या व्यवसायासाठी 2 लाख 500 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेली गावे परंतू जेथे तेंदू किंवा बांबू व्यतिरिक्त इतर गौण वनौपजांचा तसेच लघु पाणीसाठ्यातील मासेमारीच्या व्यवसायासाठी 4 लाख 500 पेक्षा कमी लोकसंख्या असलेली गावे परंतू जेथे तेंदू किंवा बांबू व इतर गौण वनौपजांचा तसेच लघु पाणीसाठ्यातील मासेमारीच्या व्यवसायासाठी 4 लाख 500 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेली गावे परंतू जेथे तेंदू किंवा बांबू आणि इतर गौण वनौपजांचा तसेच लघु पाणीसाठ्यातील मासेमारीच्या व्यवसायासाठी 8 लाख रूपये अर्थसहाय्य देण्यात येते.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी