खरेदीदार, विक्रेता संमेलन उत्साहात
यवतमाळ, दि. 27 : जागतिक बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पांतर्गत खरेदीदार विक्रेता संमेलन शुक्रवारी, दि. 24 मार्च रोजी उत्साहात पार पडले.
आत्माचे प्रकल्प संचालक यांच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र गाडे होते. डॉ. राजेंद्र गाडे यांनी पीक उत्पादन वाढीची सूत्रे सांगितली. त्यांनी कृषि माल प्रक्रियेचे महत्त्व विषद केले. खरेदीदार व विक्रेता यांनी एकमेकांच्या गरजानुरूप प्रामाणिक व्यवहार केल्यास दोघांचाही फायदा होत असल्याचे सांगितले.
संमेलनात उपस्थित विविध उद्योजकांनी आपल्या प्रक्रिया उद्योगाची माहिती देऊन प्रकल्पासाठी आवश्यक शेतमालाची गरज, दर्जा याबाबत माहिती दिली. यात हिंगणघाटच्या सुगुणा फुडस यांनी सोयाबीन, हेमंत बेंबारे सोयाबीन, सुमित राऊत कोरफड, श्री. डेहणकर, श्री. उत्तरवार सिताफळ, कुणाल जानकर भाजीपाला, माधव राऊत तूर, धनाजी जाधव तूर, चना शेतमालाची आवश्यकता प्रतिपादन केली.
उत्पादक सतीश माणलवार यांनी हळद, आले, विजय राठोड, युवराज चव्हाण, शिवाजी तोरकड, अशोक धाडवे, सुरेश देशमुख, विजल आलट, जनार्दन विरूटकर यांनी तूर, चना, सोयाबीन या शेतमालाची उपलब्धता, दर्जा, प्राथमिक प्रक्रिया सुविधा याबाबतची माहिती दिली. यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. अनिल ठाकरे यांनी गुणवत्तापूर्ण शेतमाल उत्पादनाची माहिती दिली.
आत्माचे प्रकल्प संचालक बी. एल. पाटील यांनी प्रास्ताविकातून एमएसीपी प्रकल्पाचा उद्देश, प्रकल्पाची सद्यस्थिती आदींबाबत माहिती दिली. खरेदीदार विक्रेता संमेलन हे पुरवठा करणारा आणि खरेदी करणारा या दोघांनीही आपली जबाबदार प्रामाणिकपणे पार पाडावी, असे आवाहन केले. प्रकल्प उपसंचालक डी. बी. काळे यांनी सूत्रसंचालन केले. कृषि पणन तज्ज्ञ जगदिश कांबळे यांनी आभार मानले.
00000
स्वाधार योजनेच्या अर्जासाठी मुदतवाढ
यवतमाळ, दि. 27 : राज्य शासनाने अनूसुचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे. या योजनेत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नसल्यास अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेण्यासाठी थेट बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची मुदत आता 31 मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे.
वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांनी स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी ती रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट उपलब्ध करण्यासाठी शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे. यासाठी किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे. तसेच पालकाचे उत्पन्न अडीच लाख रूपयांपेक्षा कमी असावे. शासकीय वसतिगृहातील प्रचलित नियमाप्रमाणे दहावी, बारावी, पदवीनंतरच्या अभ्यासक्रमासाठी केवळ प्रथम वर्षात प्रवेश घेतलेला विद्यार्थीच या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी www.maharashtra.gov.in, www.sjsa.maharashtra.gov.in, www.mahaeschol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज डाऊनलोड करून भरावे लागणार आहे किंवा सहायक आयुक्त समाज कल्‍याण यांच्या कार्यालयातून विद्यार्थ्यांस उपलब्ध होतील. पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त यांनी केले आहे.
00000
मागणीनुसार पाणी देण्याचे नियोजन
*लाभाधारकांनी पाणीपट्टी भरणा करण्याचे आवाहन
            यवतमाळ, दि. 27 : उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील 119 किलोमीटरचा इसापूर उजवा मुख्य कालवा आणि 84 किलोमीटर डाव्या कालव्याच्या वितरण व्यवस्थेंतर्गत लाभक्षेत्रातील लाभधारकांना पिके घेण्यासाठी पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
            उन्हाळी हंगाम 2016-17 मध्ये उपलब्ध पाणी साठ्यातून तीन आवर्तने मार्च ते जून 2017 या कालावधीत लाभधारकांच्या मागणीनुसार देण्याचे नियोजन करण्यात आले. परंतु लाभधारकाकडील थकीत रक्कम आणि अग्रीम पाणीपट्टीच्या रक्कमेबाबत मागणी करूनही शाखा कार्यायात भरणा करण्यात येत नाही. त्यामुळे उन्हाळी हंगाम राबविण्यास अडचणी येत आहे.
            लाभधारक आणि पाणी वापर संस्था यांनी मागील थकबाकीच्या 1/3 आणि चालू हंगामाची 50 टक्के अग्रीम रक्कम संबंधित शाखा कार्यालयास भरणा करावी. तसेच प्रकल्पांतर्गत बिगर सिंचन पाणी वापर करणाऱ्या अभिकरणास विशेषत: जिल्हा परिषद यवतमाळ, नगर परिषद उमरखेड यांनी देखील त्यांच्याकडील थकीत बिगर सिंचन पाणीपट्टी व चालू आरक्षणाच्या 50 टक्के अग्रीम रक्कम जलसंपदा खात्याकडे भरणा करावे. अन्यथा थकबाकीदारांना या पाणी आवर्तनामध्ये पाणी देणे शक्य होणार नाही, असे उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र. एकचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी