बँकांनी 31 मे पूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या
                          - किशोर तिवारी
* पीककर्ज व विविध विषयांचा आढावा
* पीककर्ज नाकारल्यास कार्यवाही करु
यवतमाळ, दि. 31 : येत्या हंगामात जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. जे शेतकरी बँकांच्या नेटवर्कमधून सुटले आहे अशांना परत बँकांना जोडण्यासोबतच येत्या 31 मे पर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करणे आवश्यक आहे, असे  निर्देश वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे त्यांनी पीककर्जासोबतच आरोग्य सुविधा, जोड व्यवसाय, शेतकऱ्यांसाठी विविध  प्रकारचे क्लस्टर, शैक्षणिक सुविधा येत्या खरीप हंगामात पेरणीखालील क्षेत्रात वाढ करण्यासोबतच उत्पादकतेत वाढ करण्याबाबत संबंधीत विभागाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीला जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक कुमार सिंगला, उपमुख्य संरक्षक श्री.हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता विजय भटकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.टी.जी.धोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.के.झेड. राठोड, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी प्रांजली बारस्कर, माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, अग्रणी बँक प्रबंधक प्रशांत देशपांडे आदी उपस्थित होते.
बँकांच्या कर्ज सुविधेपासून वंचित शेतकऱ्यांना बँकांशी जोडणे आवश्यक आहे. या शेतकऱ्यांना कर्ज दिले गेले पाहिजे. जुन मध्ये शेतकऱ्यांच्या पेरणीस सुरुवात होते. त्यापुर्वी कर्ज मिळाल्यास आवश्यक तयारी शेतकरी करून ठेवू शकतो. त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांना 31 मे पूर्वीचे  पीककर्ज वाटप झाले पाहिजे. जिल्ह्याला यावर्षी कर्ज वाटपाची उद्दिष्ठ 1836 कोटी रूपयांचे देण्यात आले आहे. हे वाटप तातडीने पूर्ण करा, असे श्री.तिवारी म्हणाले.
पीककर्ज वाटपात हयगय करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर कार्यवाही करू. वाटपाची टक्केवारी वाढविण्यासाठी  बँकस्तरावर पीककर्ज वाटपाचे मेळावे आयोजित करा. प्रत्येक शाखा ठिकाणी पीककर्ज वाटप सुरु असल्याचे फलक दर्शनी भागात लावण्याचे नियोजनही त्यांनी दिले. मोहिम म्हणून प्रशासनाने कर्ज वाटपाची कार्यवाही करावी, असेही ते म्हणाले.
यावेळी आरोग्य विभागाचा आढावा घेतांना आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य सुविधात वाढ करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ज्या ठिकाणी दुरुस्तीची आवश्यकता आहे, अशा केंद्रांची जुनपूर्वी दुरुस्ती केल्या जावी. काही ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पाहिजे त्या प्रमाणात दिसून येत नाही. अशा ठिकाणच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना विशेष सुचना देवून आरोग्य सेवेत सुधारणा करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. रुग्णांना कोणत्याही प्रकारची अडचण भासल्यास त्याबाबत तक्रार करता यावे म्हणून सर्व शासकीय रुग्णालयांवर 104 हा टोल फ्री क्रमांक ठळक अक्षरात नोंदविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या कृषी कंपन्या स्थापन होणे आवश्यक आहे. कृषी विभागाने जिल्हा परिषद सर्कलनिहाय किमान शेतकऱ्यांची एक कंपनी स्थापन होईल यापध्दतीचे नियोजन करून काम करावे. येत्या खरीप हंगामाच्या लागवडीचे नियोजन करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रकल्पातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
00000

बेरोजगारांना स्वयंरोजगार देण्याचे काम सेंट ग्रामीण संस्थेने करावे
                       - जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह
*सेंट ग्रामीण संस्थेच्या इमारतीचे उद्घाटन
यवतमाळ, दि. 31 : सेंट ग्रामीण स्वंयरोजगार प्रशिक्षण संस्था केंद्र शासनाचा एक उत्कृष्ठ उपक्रम आहे. या उपक्रमाद्वारे संस्थेने ग्रामीण भागातील सुशिक्षीत बेरोजगार युवकांना  स्वंयरोजगार देण्याचे काम करावे, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चौकात 1 कोटी 29 लक्ष रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या संस्थेच्या इमारतीचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ क्षेत्रिय प्रबंधक विपन कुमार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शिवकुमार मुद्दमवार, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक प्रविण मेश्राम, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, अग्रणी बँक प्रबंधक प्रशांत देशपांडे, संस्थेचे संचालक एस.बी.मिटकरी आदी उपस्थित होते.
सुरुवातीस फित कापून मान्यवरांनी इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी पुढे बोलतांना जिल्हाधिकाऱ्यांनी संस्थेने युवकांना चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण देवून त्यांना स्वत:हाच्या पायावर उभे करण्याचे कार्य करावे. ही जबाबदारी संस्था उत्कृष्ठरित्या पार पाडेल असे सांगितले. विपन कुमार यांचेही यावेळी अध्यक्षीय भाषण झाले. इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी  इमारत व तेथील सुविधांची  पाहणी केली.
सदर इमारत दोन मजली असून या दोन मजल्याचे एकूण क्षेत्र 10 हजार 500 स्केअर फुट इतके आहे. याठिकाणी दोन प्रशिक्षण कक्ष, एक संगणक कक्ष, एक लायब्ररी तसेच विद्यार्थ्यांच्या निवासासाठी देान वेगवेगळे कक्ष निर्माण करण्यात आले आहे. याशिवाय मेडीटेशन कक्ष, स्वयंपाक कक्ष व भेाजन कक्ष आदी सुविधा आहे. याठिकाणी प्रशिक्षणार्थ्यांना विनामुल्य प्रशिक्षण दिल्या जाते. निवास व भेाजन व्यवस्थाही विनामुल्य आहे.
कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन संस्थेचे प्रशिक्षक आमिर मलनस यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वित्तीय साक्षरता केंद्राचे समुह उपदेशक एस.एस.बोबडे, निकीता तांबुडे, अजय देशमुख, पुजा गुरदे यांनी सहकार्य केले.
00000
 आरटीओचे तालुकास्तर कॅम्प निश्चित
यवतमाळ, दि. 31 : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने एप्रिल ते जुनपर्यंत तालुकास्तरावरील कॅम्प घेण्याच्या तारखा निश्चित केल्या आहे.
एप्रिलमध्ये दारव्हा 3, दिग्रस 6, 15, पुसद 7, 20, 27, उमरखेड 21, वणी 11, 18, 25, पांढरकवडा 29, राळेगाव 13, मे मध्ये दारव्हा 3, दिग्रस 5, 15, पुसद 6, 20, 26, उमरखेड 20, वणी 9, 17, 24, पांढरकवडा 30, राळेगाव 11 जुनमध्ये दारव्हा 2, दिग्रस 6, 15, पुसद 6, 20, 27, उमरखेड 21, वणी 9, 17, 23, पांढरकवडा 29, राळेगाव 13 या तारखांना कॅम्प घेण्यात येतील.
या शिबिर कार्यालयात नवीन मोटार वाहन, जे वैध तात्पुरत्या नोंदणी प्रमाणपत्रावर आले असेल आणि त्या मोटार वाहन मालकांचा पत्ता संबंधित तालुक्यातील असेल तर त्या शिबिर कार्यालयात अशा वाहनांच्या नोंदणीसाठी तपासणी करण्यात येतील. इतर नवीन मोटार वाहन नोंदणीसाठी तपासणी परराज्यातून येणाऱ्या वाहनांची तपासणी व पाच वर्षापेक्षा जुन्या वाहनांची योग्यता प्रमाणपत्रासाठी चाचणी आदी कामे केली जाणार नाहीत. तसेच शिबिर कार्यालयात प्रत्येकी 100 शिकाऊ परवाने आणि पक्के परवाने देण्यात येतील, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी