पाणीटंचाई निवारण कामाला सर्वाधिक प्राधान्य द्या
                   - महसूल राज्यमंत्री संजय राठोड
* नेर येथे पाणी टंचाई आढावा
* आवश्यक तेथे पुरक योजना घ्या
       यवतमाळ, दि. 1 : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उद्भवणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच आवश्यक उपाययोजना करा. टंचाईच्या कामाला सर्वाधिक प्राधान्य देणे आवश्यक आहे. गावकऱ्यांच्या पाणी मिळत नाहीअशा तक्रारी येता कामा नयेअसे निर्देश महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिले.
            पंचायत समिती नेरच्या सभागृहात श्री.राठोड यांनी तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाई व त्यावर उपाययोजनेच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला पंचायत समिती सभापती भरत मसरामउपसभापती माधुरी शेटेजिल्हा परिषद सदस्य भिमराव राठोडपंचायत समिती सदस्य मिना खांदवेउपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवाडतहसिलदार श्री.गेडामगटविकास अधिकारी युवराज मेहत्रे तसेच नवनिर्वाचित पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.
            यावेळी श्री.राठोड यांनी गावनिहाय पाणी टंचाईचा आढावा घेतला. गावाचे सरपंच, ग्रामसेवक व गावकऱ्यांकडून त्यांनी टंचाईची स्थिती जाणून घेतली. ज्या ठिकाणी तातडीने टंचाई उपाययोजना करणे आवश्यक आहे. तेथे पुरक पाणी पुरवठा योजना, विहीर खोलीकरण, विंधन विहीरी, नवीन विहीरींचे खोदकाम आदी कामे घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
            ज्या गावांमध्ये नरेगाच्या विहीरी अर्धवट स्थितीत आहे तसेच जलपुर्ती योजनेचे काम काही कारणास्तव थांबलेले आहेत, तेथील कामे तातडीने करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. गावात टंचाईची कामे करतांना गावास कायमस्वरूपी पाणी पुरवठा होईल, अशा योजना प्राधान्याने घेण्याच्या सुचना त्यांनी केल्या. कोणत्याही गावात टंचाईच्या तक्रारी येता कामा नये. अशा तक्रारी आल्यास ग्रामसेवकास जबाबदार धरण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
            यावेळी श्री.राठोड यांनी तालुक्यातील चारा टंचाईचा आढावाही घेतला. बैठकीला संबंधित विभागाचे जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
                                                                           00000                             

शेतीवर आधारीत रोजगार निर्माण व्हावा
-किशोर तिवारी
*तुरीवर प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी सहकार्य
*मुद्रा योजनेचा लाभ गावपातळीवर देणार
यवतमाळ, दि. 1 : शेतकऱ्यांना यावर्षी डाळवर्गीय पिकांकडे वळविण्यात यश मिळाले, मात्र शेतमाल हाती येताच हमी भावापेक्षाही कमी दर तुरीला बाजारात मिळत आहे. त्यामुळे तुरीतून अधिक उत्पन्न मिळण्यासाठी शेतीवर आधारीत रोजगार निर्माण करण्यासाठी प्रक्रिया उद्योगासाठी शेतकऱ्यांना सहकार्य करण्यात येणार असल्याची माहिती वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर‍ तिवारी यांनी दिली.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील गार्डन सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक सिंगला, पांढरकवड्याचे उपविभागीय अधिकारी दिपककुमार मिना, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड आदी उपस्थित होते.
श्री. तिवारी म्हणाले, तुरीचे दर कोसळल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. त्यामुळे त्याला धीर देणे आवश्यक आहे. शेतीतून चांगले उत्पादन झाले असले तरी दर नसल्याने शेतकरी विवंचनेत आला आहे. यासाठी त्याचे उत्पन्न वाढावे, जिल्ह्यात डाळीचे क्लस्टर तयार करण्याचा मानस आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या आवश्यकतेनुसार दालमिल देण्यात येणार आहे. जिल्ह्यात पेसा आणि मानव विकास मिशनमधून दाळमिल वाटप करण्यात येणार आहे. यातून त्यांचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा पैसा थेट बँक खात्या जमा करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. त्यामुळे बाजार समितीजवळ असणाऱ्या अनधिकृत व्यवसायांना आळा बसण्यास मदत होईल. ग्रामीण भागात उद्यमशिलता वाढावी यासाठी गटविकास अधिकारी यांच्यामार्फत प्रत्येक गावात दहा युवकांना रोजगारासाठी मुद्रा योजनेतून कर्ज वाटप करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
ग्रामीण भागात आरोग्याचा मोठा प्रश्न आहे. आरोग्य यंत्रणेवर विशेष लक्ष देण्याचे गरज आहे. शासकीय रूग्णालयातील कालबाह्य झालेल्या आणि नादुरूस्त यंत्रे बदलविण्यात यावी. यासाठी जिल्हा नियोजन मधून प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात यावा. चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी. वेळप्रसंगी वॉक इन इंटरव्ह्यू करून ही पदे तातडीने भरण्यात यावी. जिल्ह्यातील नव्याने ग्रामीण रूग्णालय तयार झालेल्या ठिकाणी असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र इतरत्र हलविण्याबाबत तातडीने कारवाई करावी. आरोग्यासोबतच शिक्षण ही महत्त्वाची बाब आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अद्ययावत यंत्रणा आहे. या शाळांमधील पटसंख्या कमी झाल्यास गटविकास अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचे श्री. तिवारी यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. खून, दरोडे, सोनसाखळी हिसकाविणे यासारख्या घटनांमध्ये वाढ होण्यासोबतच जुगार आणि मटकाही वाढत आहे. शेतकऱ्यांकडे पैसा आल्यानंतर अशा प्रकारामध्ये वाढ होत असल्यामुळे या प्रकारांना आळा घालणे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारावर पोलिस यंत्रणेने नियंत्रण करावे, अशा सूचनाही श्री. तिवारी यांनी दिल्या.
00000
जलयुक्तची कामे मार्चपूर्वीच करावीत
-जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह
*संपूर्ण निधी खर्च करण्याचे नियोजन
*दर्जेदार कामावर भर देण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 1 : जिल्ह्यात यावर्षीही जयलुक्तच्या कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे ही कामे याच आर्थिक वर्षात पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी, दि. 28 फेब्रुवारी रोजी जलयुक्त शिवार अभियानाचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गायकवाड आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान हे राज्य शासनाने जाणीवपूर्णक राबवित आहे. यातील कामांसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून या अभियानाचे दृष्य परिणाम दिसू लागले आहेत. जिल्ह्याचा विचार करता पाण्याच्या उपलब्धतेमुळे रब्बी पिकाखालील क्षेत्र वाढले आहे. याचा लाभ शेतकऱ्यांना होणार असून त्यांचे उत्पन्न वाढविण्यास मदत होणार आहे. पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेतकरी उन्हाळी पिकही घेण्याचा विचार करू शकतील. जिल्ह्यात जलयुक्त शिवाराचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळे उर्वरीत ठिकाणी हे अभियान चांगल्या पद्धतीने राबविल्यास त्याचा सार्वत्रिक परिणाम दिसून येण्यास मदत होईल.
पहिल्या वर्षी 413 आणि दुसऱ्या वर्षात 225 गावे जलयुक्तसाठी निवडण्यात आली आहे. या गावात प्रामुख्याने पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांना फायदा झाला आहे. तसेच पाण्याची उपलब्धता असल्यामुळे रब्बी पिक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यावर्षी सव्वातीन लाख हेक्टरवर रब्बीच्या पिकाचे नियोजन करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने हरभरा आणि गहूचे उत्पादन होणार आहे. उत्पादन वाढीसोबतच शेतकऱ्यांना याचा मोबदलाही मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.
यावर्षी 225 गावांतील कामे पूर्ण करण्यासोबतच इतरही कामेही पूर्ण करण्यात येत आहे. जलयुक्त शिवार अभियानाला शासनाकडून निधी मिळाला आहे. त्यामुळे मार्चपूर्वी ही कामे पूर्ण करून उपलब्ध निधी खर्च करावा. ही कामे करीत असताना बंधाऱ्याची कामे उत्कृष्ट दर्जाची करावीत, कामे पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध पाणीसाठ्यावर फळशेती करण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.
00000

चौतीस हजार शेतकऱ्यांना तातडीची मदत
*पेरणी, आजारपणासाठी गावातच बिनव्‍याजी कर्ज
यवतमाळ, दि. 1 : जिल्‍ह्यातील शेतक-यांना तातडीने गावातच मदत मिळावी, यासाठी बळीराजा चेतना अभियानांतर्ग १८४८ गावात ग्रामस्‍तरीय समित्‍या गठित करण्‍यात आल्‍या. या समितीअंतर्गत जिल्‍हयातील ३४ हजार ५९६ शेतक-यांना गावातच पेरणीसाठी, आजारपण, आकस्मिक, बिनव्‍याजी, हातऊसणवारीची मदत वितरीत करण्‍यात आली. हंगामात ऐनवेळेवर गावातच थेट मदत मिळल्‍याने शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  
जिल्‍ह्यात बळीराजा चेतना अभियानाच्‍या माध्‍यमातून शेतक-यात आत्‍मविश्‍वास निर्माण करून  त्‍यांच्‍यात जगण्‍याची उमेद निर्माण करण्‍याचे काम सुरू आहे. या अनुषंगाने अभियानाच्‍या वतीने विविध योजना, उपक्रम राबविण्‍यात येत आहे. जिल्‍हयातील शेतक-यांच्‍या दारापर्यंत हे अभियान पोहचल्‍याने शेतक-यांच्‍या समस्‍या सोडविण्‍यास मोठा हातभार लागला आहे. गावातील शेतक-यांना कुठलिही अडचण, समस्‍या आल्‍यास ती गावातच सोडविल्‍या जात आहे. शेतक-यांना पेरणीसाठी, आजारपण, बिनव्‍याजी कर्ज समितीमार्फत मिळत आहे. त्‍यामुळे ही समिती शेतक-यांचे मनोधैर्य वाढविण्‍़यासाठी मोलाची भूमिका पार पाडणार आहे.
            समितीअंतर्गत गावातील एका शेतक-याला पाच हजार अशा सहा शेतक-यांना तीस हजार रुपये पेरणी, बीयाणेकरिता दिल्‍या जात आहे. त्‍याचप्रकारे गरीब कुटुंबातील शेतक-यास अचानक अपघात व आजार आल्‍यास एका शेतक-यास पाच हजार अशा सहा शेतक-यांना तीस हजार रुपये वितरीत करण्‍यात येत आहे. त्‍याचबरोबर गावात सार्वजनिक उत्‍सवातून शेतक-यांत जनजागृती होईल, प्रगतशील शेतक-यांचे मार्गदर्शनपर कार्यक्रम, गावातील शेतकरी हंगामात लागवडीसाठी सावकाराच्‍या दारी जावून कर्ज मागू नये यासाठीही तजवीज शासनाने या समितीमार्फत केली आहे. यामध्‍ये दोन-तीन महिण्‍याकरिता एका शेतक-यास पाच हजार रुपये अशा चार शेतक-यांना वीस हजारापर्यंत रक्‍कम ग्रामस्‍तरीय समिती देत आहे. समितीमार्फत गतवर्षभरात ३४ हजार ५९६ शेतक-यांना थेट गावातच मदत मिळाल्‍याने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.
00000

कर्करोगग्रस्‍तांच्‍या उपचारासाठी पंचवीस लाख रूपये वितरीत
*बळीराजा चेतना अभियान
*250 कुटुंबाला अभियानाचा आधार
यवतमाळ, दि. 1 : शेतक-यांना सर्वाधिक चिंता असते ती कुटुंबातील सदस्‍यांच्‍या आजारपणावरील खर्चाची. त्‍यामुळे अशा आजारग्रस्‍त शेतकरी कुटुंबाना दिलासा मिळावा, त्‍यांच्‍या आजारपणावरील खर्चाचा ताण कमि व्‍हावा, यासाठी बळीराजा चेतना अभियान समितीकडून मागील वर्षभरात 25 लाख रूपये उपचारासाठी मदत निधी म्‍हणून 250 शेतकरी कुटुंबाला वितरीत करण्‍यात आले. या मदत निधीच्‍या आधारामुळे शेतकरी कुटुंबाला दिलासा मिळाला असून उपचारासाठी मोठी मदत झाली आहे.     
            जिल्‍हयातील शेतक-यांना तातडीने थेट मदत करता यावी, यासाठी बळीराजा चेतना अभियान समिती गठित करण्‍यात आली आहे. या समितीमध्‍ये लोकवर्गणीतून जमा झालेल्‍या निधीतून चालविण्‍यात येणा-या ‘कर्करोग पिडितांना बळीराजा चेतना अभियानाची मदत’ या योजनेतून जिल्‍हयातील 250 शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत करून बळीराजा चेतना अभियान समितीने मोठा आधार दिला आहे. बळीराजा चेतना अभियानांतर्गत जिल्हयातील केवळ शेतीवरच उपजिविका असणा-या शेतकरी कुटुंबातील एखादा सदस्य कर्करोगाने पिडित असेल, अशा व्‍यक्‍तींच्या उपचारासाठी 10 हजार रूपये बळीराजा चेतना अभियान समितीच्‍या खात्‍यामध्‍ये जमा झालेल्‍या लोकवर्गणी निधीमधून देण्यात येत आहे. कर्करोग उपचारासोबत तपासणी, औषध, तज्ज्ञ वैद्यकीय अधिका-यांकडे तपासणीकरिता वाहतूक खर्च, औषधोपचार यावर ब-याच प्रमाणात खर्च होतो. अशा अनेक कारणामुळे शेतकरी कुटुंबांना उपचार घेता येत नाही. याचा सारासार विचार करून अभियानातून अशा शेतक-यांसाठी ही योजना राबविण्‍यात येत आहे. 
जिल्‍ह्यात आजपर्यत 250 शेतकरी कुटुंबे मदतीसाठी पात्र ठरले आहे. त्‍यांना 10 हजारांचा धनादेश संबंधीत तहसीलदार यांच्‍याकडून वितरीत करण्‍यात आले आहे. या आर्थिक मदतीमुळे शेतकरी कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे. जिल्‍हयातील इतर कर्करोगग्रस्‍त शेतकरी कुटुंबीयांनी उपचार सुरू असल्याचे वैद्यकीय अधीका-यांचे तपासणी कागदपत्रे, उपचार सुरू असलेल्या वा उपचारासाठी जात असलेल्या वैद्यकिय अधिका-यांचे नाव आदी माहिती संबंधीत तससील कार्यालयात सादर केल्‍यानंतर जिल्‍हास्‍तरीय समितीकडून पात्र शेतकरी कुटुंबांना मदत वितरीत करण्‍यात येते. 
या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या शेतकरी कुटुंबांचा उदरनिर्वाह केवळ शेतीवरच अवलंबून असने आवश्यक आहे. तसेच यासाठी आपल्या गावातील ग्रामस्तरीय समितीची शिफारस असणे बंधनकारक ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्या शेतकरी कुटुंबाकडे शिधापत्रिका असावी किंवा शेतीचा ७/१२चा उतारा असावा लागणार आहे. शेती असूनही  शासकिय, निमशासकिय नोकरी वा व्यावसायिक असलेल्या शेतक-याला याचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे ‘कर्करोगग्रस्तांना बळीराजा चेतना अभियानाची मदत’ या योजनेचा लाभ शेतकरी कुटुंबीयांनी घ्यावा, असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाने  केले आहे.
00000
लोकसेवा आयोगाच्या परिक्षा केंद्रावर जमावबंदी
यवतमाळ, दि. 1 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवार, दि. 12 मार्च रोजी पोलिस उपनिरीक्षक पुर्व परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेदरम्यान अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी फौजदारी दंड प्रक्रिया सहिंता 1973 चे कलम 144 जारी केले आहे.
या कलमातील तरतुदीनुसार परीक्षा केंद्राच्या 200 मिटर परिसरातील झेरॉक्स केंद्र बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच परीक्षेच्या दिवशी परीक्षा चालू असताना सकाळी 8 ते सायंकाळी 6 या कालावधीत परिक्षार्थी आणि परिक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी आणि कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीस परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करता येणार नाही, असेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे.
00000
आपले सरकार पोर्टलवरील सेवांचा लाभ घ्यावा
-जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह
यवतमाळ, दि. 1 : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत आपले सरकार पोर्टलवरील ऑनलाईन सेवांचा जिल्ह्यातील नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत नागरीकांसाठी आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन स्वरूपात 33 विभागाच्या 340 सेवा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. तसेच भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 30 (1) सह अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थाकरिता राष्ट्रीय आयोग अधिनियम 2004च्या कलम 2 (जी) नुसार अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था स्थापन करून चालवित असलेल्या ट्रस्ट, सोसायटी, फर्म यांना धार्मिक, भाषीक अल्पसंख्याक दर्जा प्रदान करण्याबाबत आपले सरकार या वेबपोर्टलवर ऑनलाईन सेवा 2 ऑक्टोबर 2016 पासून उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. जिल्ह्यातील नागरीकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी