धावंडा नदी सौदर्यीकरणासाठी 98 लाखाचा निधी
-राज्यमंत्री संजय राठोड
यवतमाळ, दि. 11 : दिग्रस येथील धावंडा नदीच्या सौदर्यीकरणासाठी 98 लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे काम तातडीने सुरू करावे, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. आज येथील विश्रामगृहात आयोजित बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.
दिग्रस शहरालगत तीन ते चार किलोमीटरपर्यंत धावंडा नदीचे पात्र आहे. या नदीच्या पात्रात शहरातील सांडपाणी सोडण्यात येते. नदी वाहती नसल्यामुळे हे सांडपाणी त्याचठिकाणी साचून राहत असल्यामुळे दुर्गंधी आणि नदीचे विद्रुप स्वरूप पहावयास मिळते. शहराला लागूनच असल्यामुळे शहरातील नदीच्या काठी राहणाऱ्या नागरीकांना याचा त्रास होत आहे. नदीचे हे बकाल स्वरूप बदलविण्यासाठी संजय राठोड यांनी 98 लाख 76 हजार रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून सांडपाणी वाहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. नदीच्या पात्रात मोठ्या संख्येने डोह असल्यामुळे हे पाणी वाहून जाण्यास अवरोध निर्माण होत आहे. याबाबत हे डोह बुजविण्यात यावे किंवा चर खोदून एका डोहातून दुसऱ्या डोहात पाणी सोडण्याची व्यवस्था करावी. शहरातील हे सांडपाणी शहराबाहेर कोणत्याही परिस्थितीमध्ये काढण्यात यावे, अशा सूचना श्री. राठोड  यांनी दिल्या. शहरातील सांडपाणी याच नदीवर असलेल्या अरूणावती प्रकल्पात जाणार असल्यामुळे यांचाही आक्षेप येणार आहे. यावर उपाय म्हणून शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे सांडपाणी नदीपात्रात सोडण्यात यावे, यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
शहराच्या सौदर्यीकरणासाठी ही कामे होणे अत्यावश्यक आहे. नदीपात्राच्या कामासोबतच नदीकाठी नागरीकांनी संरक्षण भिंतीची मागणी केली आहे, हे काम तातडीने मार्गी लावावे, असे निर्देश श्री. राठोड यांनी दिले. यावेळी अरूणावती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. वद्देवार उपस्थित होते.
00000
महाराष्ट्र शासन
उप माहिती कार्यालय, उमरखेड



व्यापा-यांनी घाबरु नये, शासन त्यांच्या पाठीशी आहे
                                                            -महसूल राज्यमंत्री संजय राठोड
उमरखेड, दि. 11 : महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे काही दिवसाआधी सकाळी 9.30 च्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. या घटनेमुळे तेथील व्यापा-यांमध्ये भितीचे वातावरण निमार्ण झाले. या भितीमुळे व्यापार बंद ठेवावा लागला होता. अशावेळी व्यापा-यांनी घाबरुन जावू नये, शासन त्यांच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले. ते आज फुलसावंगी येथे व्यापारी संघटनेच्या बैठकीत बोलत होते.
यावेळी उपविभागीय महसूल अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बंसल, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर,  जि. प. सदस्य डॉ. बी. एम. चव्हाण आदी उपस्थित होते.
            राज्यमंत्री श्री. राठोड म्हणाले, गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती असली पाहिजे. त्यासाठी गुन्हेगार असलेल्या व्यक्तीची तक्रार पोलीस प्रशासनाकडे निडर होवून करावी. अवैध गौन खनिज चोरी करणा-या चोरांवर आणि गावातील अतिक्रमण काढण्यासाठी उपविभागीय महसूल अधिकारी यांना कारवाई करावी. गुन्हगारी व अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी गावात पोलीस चौकी उभारण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना सांगीतले. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व्यापा-यांनी सुद्धा सक्षम व्हावे, असेही त्यांनी यावेळी सांगीतले. यावेळी फुलसावंगीतील सर्व व्यापारी उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी