परिवहन कार्यालयातील दलालांना पायबंद घाला
                   -जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह
* अन्यथा फौजदारी दाखल करा
* सीसीटीव्हीवरून पटवा दलालांची ओळख 
       यवतमाळ, दि. 6 : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दलालांचा मुक्त वावर असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त होत आहे. दलालांमुळे सामान्य वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड पडण्यासोबतच त्यांची फसवणूकही होते. यावर प्रतिबंध घालण्यासाठी तत्काळ अशा दलालांना पायबंद घाला, सीसीटीव्ही फुटेजद्वारे दलालांची ओळख पटवून प्रसंगी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा समन्वय समितीची बैठक घेतली. विविध विभागाच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासंदर्भात त्यांनी आवश्यक निर्देश दिले. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार सिंगला, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, उपवनसंरक्षक विजय हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काटपल्लीवार, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता विजय भटकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्यासह आदी अधिकारी उपस्थित होते.
            परिवहन कार्यालयामध्ये दलालांचा वावर असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहे. या दलालांवर पायबंद घालण्यासाठी उपाययोजना आखा, कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. ज्या दलाल व्यक्ती वारंवार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आढळून येतील, अशा दलालांची ओळख पटवून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
            यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीटंचाईही आढावा घेतला. उन्हाळ्यात शहरात नियमित पाणी पुरवठा होईल, यासाठी जीवन प्राधिकरणाने आतापासूनच तयारी करावी, असे ते म्हणाले. संपुर्ण जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होणार नाही, यासाठी दक्ष राहावे. पाणी उपलब्धता अहवाल दर आठवड्याला सादर करण्याचे निर्देशही त्यांनी जलसंपदा विभागास दिले.
            शंभर कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत यावर्षी राज्यात पाच कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ठ आहे. जिल्ह्यालाही लक्षांक प्राप्त झाले आहे. यावर्षी 106 नर्सरीतून विभागांना रोपांचा पुरवठा होणार आहे. विभागांनी मर्यादेत आपली मागणी नोंदवावी. ज्या ठिकाणी वृक्षारोपण केले जात आहे, तेथे वनविभागामार्फत वृक्ष पुरविले जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
00000

 लोकशाही दिनातील तक्रारींच्या पाठपुराव्यासाठी वरिष्ठ अधिकारी
                          -जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह
* बचत भवन येथे लोकशाही दिन कार्यक्रम
* प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देश 
यवतमाळ, दि. 6 : सामान्य नागरीक आपल्या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी लोकशाही दिनात निवेदने दाखल करत असतात. या निवेदनांवर तातडीने कार्यवाही करून सामान्यांना दिलासा देणे आवश्यक आहे. त्यामुळेच या दिवशी दाखल तक्रारींचा पाठपुरावा करून त्या निकाली काढण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रारी सोपविण्यात येत आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रारींचा मागोवा घेऊन त्या तातडीने निकाली कशा निघेल, यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे लोकशाही दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. महिन्याच्या प्रत्येक पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावरील लोकशाही दिन घेतला जातो. आज झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाभरातील अनेक नागरीकांनी आपल्या समस्या, तक्रारी, निवेदने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केली.   
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार सिंगला, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, उपवनसंरक्षक विजय हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काटपल्लीवार, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता विजय भटकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आपल्या समस्या घेऊन आलेल्या प्रत्येकाशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व संबंधित विभागांना तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
प्रत्येक लोकशाही दिनी मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल होत असतात. त्या तक्रारी कालमर्यादेत निकाली निघणे आवश्यक असताना त्या निघत नाही. ज्या विभागांना तक्रारी कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतात त्या तक्रारींचा पाठपुरावा करून त्यावर अंतिम कार्यवाही करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रारी सोपविण्यात येत आहे. त्या अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून त्या निकाली निघण्यासाठी प्रयत्न करावे, असे त्यांनी सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांनी काही तक्रारींचा आढावाही घेतला.
00000
नागरीकांनी उन्हापासून बचाव करावा
*जिल्हा प्रशासनाचे आवाहन
*उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक
यवतमाळ, दि. 6 : यावर्षीच्या उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असणार आहे. यापासून कोणत्याही प्रकारची जिवीतहानी होऊ नये, यासाठी मार्गदर्शक सूचना प्रसारीत करण्यात आल्या आहे. या सूचनांचे पालन करून नागरीकांनी उन्हापासून बचाव करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे शारिरीक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता असते. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना सूचविण्यात आल्या आहे. तहान लागलेली नसली तरीही जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे, हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बुट व चपलाचा वापर करावा, प्रवासात पाण्याची बॉटल सोबत ठेवावी, उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान आणि चेहरा झाकण्यात यावा, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू-पाणी, ताक आदींचा नियमित वापर करावा, अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम आदींपासून उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखवित आणि चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा, गुरांना छावणीत ठेवण्यात यावे, तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे, घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर आणि सनशेडचा वापर करण्यात यावा, रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात, पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा, तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे, कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, सुर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे, पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा, बाहेर कामकाज करीत असताना मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करण्यात यावा, गरोदर कामगार आणि आजारी कामगारांनी अधिक काळजी घ्यावी, रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणासाठी शेड उभारावेत, जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी, अशा उपाययोजना सूचविण्यात आल्या आहे. तसेच लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये, दुपारी बारा ते साडेतीन या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे, गडद, घट्ट आणि जाड कपडे घालण्याचे टाळावे, बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत, दुपारी बारा ते साडेतीन या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे, उन्हा्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी असे सूचविण्यात आले आहे.
00000
जिल्ह्यात स्वाधार योजना सुरू
*अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश
*60 टक्के गुणांची अट राहणार
यवतमाळ, दि. 6 : राज्य शासनाने अनूसुचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडर स्वाधार योजना सुरू केली आहे. या योजनेत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नसल्यास अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेण्यासाठी थेट बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे.
वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसल्यास अशा विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी ती रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधर संलग्न बँक खात्यामध्ये थेट उपलब्ध करूरण्यासाठी शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे. यासाठी किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे. तसेच पालकाचे उत्पन्न अडीच लाख रूपयांपेक्षा कमी असावे. शासकीय वसतिगृहातील प्रचलित नियमाप्रमाणे दहावी, बारावी, पदवीनंतरच्या अभ्यासक्रमासाठी केवळ प्रथम वर्षात प्रवेश घेतलेला विद्यार्थीच या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे.  यासाठी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी www.maharashtra.gov.in, www.sjsa.maharashtra.gov.in, www.mahaeschol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज डाऊनलोड करून भरावे लागणार आहे किंवा सहायक आयुक्त समाज कल्‍याण यांच्या कार्यालयातून विद्यार्थ्यांस उपलब्ध होतील. हे अर्ज 16 मार्च 2017 पर्यंत समाज कल्याण कार्यालयास सादर करावे लागणार आहे. यासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त यांनी केले आहे.
00000
माजी सैनिकांसाठी सैनिक दरबाराचे आयोजन
यवतमाळ, दि. 6 : जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवा पत्नी, सेवारत सैनिक, त्यांच्या परिवार आणि अवलंबितांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दि. 18 मार्च रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी यांच्या दालनात सैनिक दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील माजी सैनिक, सेवारत सैनिक आणि त्यांचा परिवार, अवलंबितांच्या काही अडीअडचणी असल्यास त्यांनी त्या लेखी स्वरूपात सर्व कागदपत्रांसह दुरध्वनी क्रमांक व पत्यासह दोन प्रतीमध्ये दिनांक 9 मार्चपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात दाखल करून टोकन प्राप्त करून घ्यावे. मुदतीनंतर अथवा ऐनवेळी दिलेल्या अर्जाचा विचार पुढील सैनिक दरबाराच्यावेळी करण्यात येईल. मोघम स्वरूपाच्या समस्यांचे निवेदन, तसेच न्याय प्रविष्ठ असलेली प्रकरणे सादर करू नये. जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, अवलंबितांनी या दरबाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी धनंजय सदाफळ यांनी केले आहे.

00000
बचत खाते आधारशी संलग्न करावे
*जिल्हा प्रशासनाचे आवाहन
यवतमाळ, दि. 6 : जिल्ह्यातील नागरीकांनी त्यांचे विविध बँकांमधील बचत खाते आधार आणि मोबाईल क्रमांकाशी संलग्न करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये बचत खाते आधार आणि मोबाईल क्रमांकाशी जोडण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी सर्व खातेदारांनी आधार कार्ड आणि बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत आणि खालील बाजूस आपला मोबाईल क्रमांक लिहून आणि स्वाक्षरी करून संबंधित खाते असलेल्या बँकेत 24 मार्च 2017 पूर्वी जमा करावे. तसेच ही माहिती ग्रामस्थित पोलिस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांना देण्यात यावी, त्यांनी ही माहिती संबंधित बँकेत जमा करावी. ही माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तलाठी, पोलिस पाटील, ग्रामसेवक यांनी गावात दवंडी देऊन लोकांना माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत देशपांडे यांनी केले आहे.

00000 

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी