एप्रिलपर्यंत संपूर्ण तूर खरेदी करणार
-जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह
*तातडीने बारदाणा उपलब्ध करून देणार
*शेतकऱ्यांनी घाई न करण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 10 : केंद्र शासनाच्या आधारभूत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यात तुरीची खरेदी करण्यात येत आहे. बारदाणा उपलब्ध नसल्याने ही खरेदी बंद करण्यात आली आहे. तूर खरेदी तातडीने सुरू व्हावी, यासाठी बारदाणा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कारवाई करण्यात आली आहे. येत्या काळात शेतकऱ्यांजवळील संपूर्ण तर एप्रिलपर्यंत खरेदी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.
आधारभूत किंमतीने तुरीच्या खरेदीचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. सध्यास्थितीत जिल्ह्यात खरेदी केलेली तूर ठेवण्यसाठी गोदामातील जागा पुरेशी असून भविष्यात गोदामाचा तुटवडा भासू शकतो. यापुढे अधिक प्रमाणात तूर खरेदी होणार असल्याची बाब विचारात घेऊन महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, केंद्रीय वखार महामंडळ, नाफेड व कृषि उत्पन्‍न बाजार समिती यांचे सचिव यांना गोदामाची अतिरिक्त व्यवस्था करण्याबाबत आणि भाडेतत्वावर गोदान घेण्याचे नियोजन करण्याबाबत सुचित करण्यात आले आहे.
जिल्ह्यात 83 हजार 256 क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात 30 हजार क्विंटल तूर आवक झालेली आहे. आणखी तुरीची आवक सुरूच राहणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बारदाणा आवश्यक आहे. ही बारदाणा तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशनचे सचिव तथा व्यवस्थापकी संचालक यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे गडचिरोली येथील आदिवासी विकास महामंडळ आणि अकोला येथील जिल्हा मार्केटींग अधिकारी यांच्याकडून 30 हजार नग बारदाणा अतितात्काळ मागविण्यात येऊन जिल्ह्यातील 11 खरेदी केंद्रावर प्रत्येकी 2 हजार 500 नग पाठविण्यात आले आहे. 25 हजार बारदाणा नग मागविण्यात आले असून तो शनिवार, दि. 11 मार्च पर्यंत उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यात बारदाणा कमी पडणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. जिल्ह्यातील तुरीची खरेदी 15 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी घाई करू नये, कृषि उत्पन्न बाजार समितीतर्फे देण्यात आलेल्या टोकनानुसारच दिलेल्या तारखेला आपली तूर विक्रीसाठी आणावी. तसेच शेतकऱ्यांनी आधारभूत किंमत 5 हजार 50 रूपयापेक्षा कमी दरात तूर विक्री करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
00000
लग्नासाठी मालमत्ता जाहीर करण्यावर प्रतिबंध
यवतमाळ, दि. 10 : हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीस लग्नाच्या उद्देशाने पाल्यांची मालमत्ता जाहीर करण्यावर प्रतिबंध करता येणार नाही.
हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 मधील कलम 4 ब नुसार कोणतीही व्यक्ती. कोणत्याही वृत्तपत्र, नियतकालीक, जर्नल किंवा इतर कोणत्याही माध्यमातून त्याची मालमत्ता किंवा पैसा, व्यवसायात आपल्या मुली, मुलाचा किंवा इतर कोणत्याही नातेवाईकाचा हिस्सा, शेअर्स लग्नाच्या उद्देशाने जाहिरात प्रकाशित करू शकणार नाही. कोणतीही व्यक्ती या बाबीचे उल्लंघन करून जाहिरातीचे प्रकाशन, प्रसिद्धी किंवा वितरण करीत असल्यास संबंधित व्यक्तीस सहा महिन्यापेक्षा कमी नसेल परंतु 5 वर्षांपर्यंत वाढविता येईल एवढ्या शिक्षेस किंवा 15 हजार रूपयांपर्यंत वाढविता येईल एवढ्या दंडास पात्र असणार आहे, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.
00000


महिला दिनानिमित्त कायदे प्रशिक्षण कार्यशाळा
यवतमाळ, दि. 10 : राज्य महिला आयोग आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्ताने महिला कायदे विषयक प्रशिक्षण कार्यशाळा बचतभवनात आयोजित करण्यात आली. कार्यशाळेत कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 बद्दल माहिती देण्यात आली.
जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले. यावेळी यवतमाळच्या नगराध्यक्ष कांचन चौधरी, जिल्हा सरकारी अभियोक्ता निती दवे, जिल्हा कारागृह अधीक्षक किर्ती चिंतामणी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अर्चना इंगोले, डॉ. लिला भेले आदी उपस्थित होते.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005च्या प्रशिक्षण कार्यशाळेस सुरूवात करण्यात आली. यात अधिनियमाची पार्श्वभूमी, संरक्षण अधिकाऱ्यांची भूमिका, कर्तव्ये, जबाबदारी याबाबत अकोला येथील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी करूण महंतारे यांनी मार्गर्शन केले. दुसऱ्या सत्रात ॲड. अर्चना वानखेडे यांनी कौटुंबिक हिंसाचार अधिनियम अंतर्गत तरतुदी आणि अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणीबाबत मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत स्थानिक अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, संरक्षण अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला कर्मचारी यांनी सहभाग घेतला. कार्यशाळेनंतर पांढरकवडा, पुसद, दारव्हा पोलिस ठाणेस्तरावरील कार्यरत समुपदेशन केंद्रातील कौटुंबिक हिंसाचार प्रकरणासंदर्भात जनसुनावणी घेण्यात आली. ही जनसुनावणी ॲड. मेहता, शासकीय निरीक्षण गृहाचे अधीक्षक व्ही. बी. पाटील, विधी तथा परीविक्षा अधिकारी महेश हळदे, करूणा महंतारे, लिला भेले, संरक्षण अधिकारी कविता राठोड, अर्चना इंगोले यांनी प्रकरणांचा आढावा घेतला.
00000
जिल्ह्यातील स्थानिक सुट्ट्या जाहिर
        यवतमाळ, दि. 10 : यवतमाळ जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी यांनी 2017 या वर्षीच्या तीन स्थानिक सुट्टया  जाहिर केल्या आहेत.
            राजनैतिक सेवा विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांना स्थानिक सुट्ट्यांचे अधिकार प्रदान करण्यात आले आहे. त्यानुसार 2017 या वर्षाकरिता अक्षय तृतीया, शुक्रवार, दि. 28 एप्रिल, ज्येष्ठा गौरी पूजन, बुधवार, दि. 30 ऑगस्ट 2016 आणि सर्वपित्री अमावस्या, मंगळवार, 19 सप्टेंबर या दिवशी स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या सुट्ट्या जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालय व अधिकोष यांना लागू राहणार नाही.
00000
जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू
            यवतमाळ, दि. 10 : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्ह्यात मुंबई पोलिस अधिनियमातील तरतुदीनुसार प्रतिबंध आदेश लागू करण्यात आले आहे. या आदेशानुसार जिल्ह्यात 19 मार्चपर्यंत जमावास बंदी राहणार आहे.
या आदेशान्वये जिल्ह्यात जमाव करणे, शस्त्र बाळगणे, माणसांचे एकत्रिकरण व पुतळ्याचे प्रदर्शन करणे आदी प्रकारांवर बंदी घालण्यात आली आहे. या कलमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मुंबई पोलिस कायदा 1951 च्या कलम 37 (1) (3) नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी कळविले आहे.
00000
तहसिल कार्यालयात बुधवारी ग्राहक दिन
यवतमाळ, ता. 10 : जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय आणि तहसिल कार्यालयातर्फे बुधवार, दि. 15 मार्च रोजी दुपारी 12 वाजता जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने ग्राहक प्रबोधन आणि प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह अध्यक्षस्थानी राहतील.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्ष ॲड. आश्लेषा दिघाडे उद्घाटक म्हणून उपस्थित राहतील. अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी राजेंद्र देशमुख, जिल्हा ग्राहक पंचायतचे अध्यक्ष नारायण मेहरे, चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष राजेंद्र निमोदिया, अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे प्रदेश उपाध्यक्ष राजू कट्यारमल, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी एस. बी. भराडी, तहसिलदार सचिन शेजाळ यांनी केले आहे.
00000
सहकारी संस्थांनी माहिती सादर करण्याचे आवाहन
यवतमाळ, ता. 10 : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांनी माहिती सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मनरेगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार कार्य करण्यास इच्छुक असलेल्या सेवा सहकारी संस्थांनी आपले इच्छापत्र 15 मार्च 2017 पर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ या कार्यालयात सादर करावे, याबाबत अधिक माहितीसाठी 07232-244395 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ यांनी केले आहे.
00000

दारू, हातभट्टीवर कारवाई
यवतमाळ, दि. 10 : जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्‍क विभागाने अवैध दारू विक्रीवर कारवाई केली आहे. यात विविध ठिकाणी छापे टाकून 50 गुन्ह्यांची नोंद केली आहे.
जिल्ह्यात 1 ते 10 मार्च  दरम्यान अवैध दारूविरूद्ध विशेष मोहिम राबविण्यात आली. यात अवैध देशी, विदेशी दारू विक्री, वाहतूक आणि हातभट्टी दारू विक्री धंद्यावर कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्काचे अधीक्षक पराग नवलकर यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत 50 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. यात 21 आरोपींना अटक करण्यता आली आहे. यात एक लाख 49 हजार 450 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच विशेष मोहिमेत 4 हजार 622 लिटर मोहाफुल सडवा नष्ट करण्यात आला. यात 196 लिटर हातभट्टी, 56 लिटर देशी दारू, 4 लिटर विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे.
होळी आणि धुलीवंदना सणानिमित्ताने 13 मार्च कोरडा दिवस जाहीर करण्यात आला आहे. भारी, करडोह, वाघापूर, गोदनी, लोहारा, डेहणी, माणिकवाडा, किन्ही, कृष्णनगर, काळी दौ., हुडी, मधुकरनगर, मोहदा, राळेगाव, रावेरी रोड, सिंघला, झरीजामणी, वणी, वरोरा रोड वणी आदी ठिकाणी कारवाई करण्यात आली. ही कारवाई श्री. नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ए. बी. झाडे, यू. एन. शिरभाते, दुय्यम निरीक्षक के. जी. आखरे, के. एन. कुमरे, एस. एन. भटकर, ए. बी. पवार, व्ही. एस. वरठा, ए. वाय. खांदवे, अविनाश पेंदोर, एस. जी. घाटे, आर. एम. राठोड, जवान ए. ए. पठाण, एन. डी. दहेलकर, एम. रामटेके, महेश खोब्रागडे, एस. दुधे, पी. एच. राठोड, श्री. मसराम, राम पवार, श्री. मनवर, मनोज शेंडे, श्री. मेश्राम, श्री. साठे, श्री. भोंडे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
00000



Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी