आर्णी, नेर, पांढरकवडा एमआयडीसीच्या अडचणी
सोडविण्यासाठी पाठपुरावा करा
                   - सचिंद्र प्रताप सिंह
* जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक
* औद्योगिक क्षेत्रातील अतिक्रमण काढा 
       यवतमाळ, दि.21 : आर्णी, नेर व पांढरकवडा येथे मंजूर झालेले औद्योगिक क्षेत्र तातडीने कार्यरत करण्यासाठी या ठिकाणी भुखंड हस्तांतरणाची कार्यवाही गतीने करावी. सदर क्षेत्रात उद्योग सुरू होण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करा, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार सिंगला, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यस्थापक शिवकुमार मुद्दमवार, उपविभागीय अधिकारी राजेंद्र देशमुख, वीज वितरणचे अधिक्षक अभियंता विजय भटकर, उद्योजक महेंद्र दर्डा यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व उद्योजक उपस्थित होते.
            आर्णी येथे एमआयडीसी मंजूर आहे. परंतु भुखंड हस्तांतरण झाले नसल्याने उद्योग सुरू करता येत नाही. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी यासाठी स्वतंत्र बैठक घेऊन हा मुद्दा निकाली काढावा व एमआयडीसी तातडीने सुरू करावे, असे ते म्हणाले. नेर येथीलही काम हस्तांतरणामुळे थांबले आहे. याबाबतही तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
            एमआयडीसी क्षेत्रात अतिक्रमनाच्या तक्रारी वारंवार प्राप्त होतात. सदर अतिक्रमाण मोहिम घेऊन काढून टाकावे. कालमर्यादेत ही कार्यवाही न झाल्यास संबंधितांना जबाबदार धरून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल. यवतमाळ एमआयडीसीला होत असलेल्या दुषित पाण्याच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन शुध्द पाणी पुरवठ्याची दक्षता घेतली जावी. औद्योगिक क्षेत्रात सुविधा निर्माण केल्या नसतांना भुखंड देतांना सर्व रक्कम उद्योजकांकडून वसुल करण्यात आली आहे. अशा ठिकाणी उद्योग स्थापनेसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
            जे प्लॅाट विनावापर आहेत ते ताब्यात घेऊन इतरांना वितरीत करण्यात यावे तसेच औद्योगिक क्षेत्रात वीज पुरवठा नियमीत रहावे, अशा सुचनाही त्यांनी दिल्या. यावेळी उद्योजकांनी उपस्थित केलेल्या समस्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री.मुद्दमवार यांनी बैठकीत माहिती सादर केली.
00000000

ग्राहकाने आपल्या हक्कासाठी जागृत होणे आवश्यक
                   - सचिंद्र प्रताप सिंह
* जागतिक ग्राहक हक्क दिन कार्यक्रम
यवतमाळ, दि.21 : प्रत्येक व्यक्ती ग्राहक म्हणून काही ना काही खरेदी करीत असतो. त्यामुळे प्रत्येक जण हा ग्राहकच आहे. या ग्राहकाने आपल्या हक्कासाठी जागृत होणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी  सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.
तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात जागतिक ग्राहक हक्क दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचच्या अध्यक्षा ॲड. आश्लेषा दिघाडे यांच्याहस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी एस.बी.भराडी, तहसिलदार सचिन शेजाळ, जिल्हा ग्राहक पंचायतचे अध्यक्ष डॉ.नारायण मेहरे, चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष राजेंद्र निमोदिया आदी उपस्थित होते.
ग्राहक म्हणून प्रत्येकाने जागृत होणे आवश्यक आहे. आपले हक्क ग्राहकाने समजून घेतले पाहिजे, असे पुढे बोलतांना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी डॉ.मेहरे, ॲड.दिघाडे यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक तहसिलदार सचिन शेजाळ यांनी केले. ग्राहक हक्क दिनानिमित्त तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात लावण्यात आलेल्या ग्राहक संबंधी विविध स्टॉलचे उद्घाटनही जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे  संचालन माधुरी नेव्हारे यांनी केले तर आभार पुरवठा निरिक्षक योगीराज निवल यांनी मानले. कार्यक्रमास ग्राहक तथा ग्राहक चळवळीशी संबंधीत व्यक्ती व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000000
अनुज्ञप्तीधारकांसाठी आक्षेपाची सुविधा
यवतमाळ, दि.21 : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे 500 मिटरच्या आत असणाऱ्या मद्यविक्री अनुज्ञप्ती रद्द करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रीय, राज्य मार्गापासून 500  मिटर अंतरावर असलेल्या अनुज्ञप्तींची मोजणी करण्यात आली असून या मर्यादेत असलेल्या अनुज्ञप्तींची यादी जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. अंतर मोजमापाबाबत काही आक्षेप असल्यास दिनांक 27 मार्च दुपारी 12 पर्यंत राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, यवतमाळ येथे सादर करावे, असे कळविण्यात आले आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय, राज्य मार्गापासून 500 मिटरच्या आत असणाऱ्या अनुज्ञप्तींचे अंतर मोजण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने मोजमाप करून आतमध्ये असलेल्या अनुज्ञप्तींचे यादी तयार केली आहे. सदर यादी www.yavatmal.nic.in या संकेतस्थळावर तसेच राज्य उत्पादन शुल्क, यवतमाळ या शिर्षकामध्ये प्रसिध्द केली आहे. अंतर मोजमापाबाबत काही आक्षेप असल्यास दिनांक 27 मार्च रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय यवतमाळ येथे सादर करावे, असे अधीक्षक पराग नवलकर यांनी कळविले आहे.
00000000
लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियमांतर्गत कार्यशाळा
यवतमाळ, दि.21 : कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम 2013 अंतर्गत माहिती देण्यासाठी दिनांक 23 मार्च रोजी कोल्हे मंगल कार्यालय सभागृह यवतमाळ येथे सकाळी 10  वाजता पासून एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या अधिनियमाबाबत महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये जाणीव जागृती करण्याच्या दृष्टीने शासकीय कार्यालयात अधिनियमांतर्गत गठीत करण्यात आलेल्या तक्रार समितीमधील सदस्यांकरीता ही कार्यशाळा आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयातील गठीत करण्यात आलेल्या अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या सदस्यांनी  कार्यशाळेला सकाळी 10 वाजता उपस्थित रहावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.
00000000
 आश्रमशाळेत विद्यार्थ्‍यांची सर्वोतोपरी काळजी घ्‍या
* जिल्‍हाधिकारी सचिन्‍द्र प्रताप सिंह
* आश्रमशाळेत अप्रिय घटना घडता कामा नये
यवतमाळ, दि. 21: जिल्‍हयात नुकतीच  झटाळा आश्रमशाळेतील दहावीतील विद्यार्थ्‍यांचा दुर्दैवी मृत्‍यू झाला. त्‍यामुळे अशा प्रकारच्‍या अप्रिय घटना आश्रमशाळेत वा इतर शाळेत घडू नये. यासाठी शाळांनी सर्व सुविधा पुरवून शिक्षकांनी सर्वोतोपरी विद्यार्थ्‍यांची काळजी घ्‍यावी. असे आवाहन जिल्‍हाधिकारी सचिन्‍द्र प्रताप सिंह यांनी केले  आहे. 
जिल्‍हयातील आश्रमशाळांतील मुख्‍याध्‍यापक, अधीक्षक, शिक्षकांनी विद्यार्थ्‍यांना शाळा व्‍यतिरिक्‍त वेळेस वा सुटीच्‍या दिवशी आपल्‍या आश्रमशाळेच्‍या परीसरातून बाहेर जाण्‍यास प्रतिबंध करावा. आश्रमशाळा सभोवतलच्‍या परीसरात खदान, तलाव, नाला, नदी, रहदारीचा मुख्‍यमार्ग असल्‍यास या ठिकाणी जाण्‍यास अटाकाव टाकण्‍यात यावा, जणेकरून भविष्‍यात होणा-या अनुचित घटना टाळता येतील. तसेच विद्यार्थ्‍यांना शाळेत शासनाने दिलेल्‍या सुविधांची पूर्तता करावी जेणेकरून विद्यार्थ्‍यांना कुठल्‍याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. तसेच पालकांनीही आपल्‍या पाल्‍यांना शाळेत गेल्‍यानंतर आश्रमशाळा परीसरातच रहावे, इतरत्र कुठेही जावू नये अशा सुचना कराव्‍यात. असे आवाहन जिल्‍हाधिकारी सचिन्‍द्र प्रताप सिंह यांनी केले आहे.  
00000000
आता नागरिकांना व्‍हॉट्सअॅप्‍स,
एसएमएसवरही तक्रार नोंदविता येणार
* नागरिकांना आवाहन 
* जिल्‍हा प्रशासनाकडून ९४०५४२२२०० क्रमांक कार्यान्वित
यवतमाळ, दि.21 : जिल्‍हयातील शेतक-यांना, नागरिकांना सहजरित्‍या आपल्‍या रखडलेल्‍या कामांच्‍या  तक्रारी नोंदविता याव्‍यात. शासकिय कार्यालयात होणारी पायपीट थांबावी यासाठी जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने  ९४०५४२२२००हा मोबाईल क्रमांकवर व्‍हॉट्सअॅप्‍स, एसएमएस करण्‍यासाठी कार्यान्वित करण्‍यात आलेला आहे. त्‍यामुळे नागरिकांनी,  शेतक-यांनी आपल्‍या तक्रारी या क्रमांकावर नोंदवाव्‍यात, असे आवाहन जिल्‍हाधिकारी सचिन्‍द्र  प्रताप सिंह यांनी केले आहे.
         जिल्ह्यातील नागरिक विविध माहितीसाठी शासकीय कार्यालयावर अवलंबून असतात. नागरिकांना हवी असलेली माहिती मिळविण्यासाठी तालुका तथा जिल्ह्याच्या शासकिय कार्यालयात यावे लागते. यात नागरिकांचा वेळ व पैसा खर्च होतो. तसेच काहीवेळा शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी बैठकांमध्‍ये व्‍यस्‍त असतात. तर कधी दौ-वर असतात.  त्‍यामुळे संबंधित अधिकारी, कर्मचारी उपलब्‍ध  होत नसल्यास, अचूक माहितीअभावी नागरिकांना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे अशा विविध कारणास्तव त्यांच्‍या कामास विलंब होतो. अशा अनेक कारनामुळे नागरिक त्रस्‍त होऊन तक्रार करतात. मात्र, आता नागरिकांना घरूनच या क्रमांकावर ९४०५४२२२००  या क्रमांकावर व्‍हॉट्सअॅप्‍स किंवा एसएमएस करून आपली तक्रार नोंदवू शकनार आहे. तक्रार नोंदवितांना नागरिकांनी आपले संपूर्ण नाव, पत्ता, तक्रारीचे स्‍वरूप, संबंधीत कार्यालय, संपर्क क्रमांक देण्यात यावा. असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाने केले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी